“या रे या सारे गाऊ या” असे म्हणत आपल्या लडिवाळ कवितांमधून मुलांना आवाहन करणारी ही कवयित्री आहे, डॉ. संगीता बर्वे. संगीताताई या आयुर्वेदाच्या डॉक्टर. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. ही पदवी घेतल्यावर त्यांनी ‘आयुर्वेदिक डायटेटिक्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. आधीपासूनच साहित्याची आवड असल्याने त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए. केले. ‘मृगतृष्णा’ आणि ‘दिवसाच्या वाटेवरून’ या कवितासंग्रहातून त्यांच्यातील सुजाण रसिक, प्रगल्भ आणि सहृदय व्यक्ती वाचकांसमोर येते. २२ वर्षे निम्नवर्गीय लोकांसाठी आरोग्यसेवा देताना अनेकदा त्यांनी खूप व्यथित करणारे अनुभव घेतले. कवितेवरचे उत्कट प्रेम, स्त्रीजीवनाविषयीची तळमळ आणि स्वतःच्या आत्ममग्न मनाचा घेतलेला शोध अशी तिहेरी गुंफण या कवितांमधून दिसून येते.    

त्यांना ‘साहित्यभूषण’, ‘विशाखा’, ‘ग.दि.माडगूळकर’, ‘अन्वय’ यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

निसर्गाप्रमाणेच मुलांमध्ये रमणाऱ्या संगीताताईंनी विपुल बालसाहित्याची निर्मिती केली आहे. कवितांच्या पुस्तकांबरोबरच त्यांचे मुलांसाठीचे गद्य साहित्यही प्रसिद्ध आहे. बालचित्रवाणी, आकाशवाणी या माध्यमातून मुलांना सहभागी करून घेत त्यांनी अनेक कवितांचे कार्यक्रम सादर केले आहेत. मुलांना कवितेची पर्यायाने, साहित्याची गोडी लागावी यासाठी त्यांनी खूपच काम केले आहे. मुलांना भाषेची, कवितांची गोडी निर्माण व्हावी, त्यांनी शब्दांशी खेळावे, स्वतः शब्दरचना करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी संगीताताईंनी कवितांचे शिबिर घेतले. त्यांच्या कवितांच्या ३ सीडी प्रकाशित झाल्या आहेत.

‘गंमत झाली भारी’ आणि ‘या रे या सारे गाऊ या’ या कार्यक्रमांचे २००३, ०४ आणि ०६ साली पुलोत्सवमध्ये सादरीकरण झाले होते. त्यांच्या या बाल साहित्यातील योगदानामुळे २०१५ साली त्यांना अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले होते. कोणत्याही पदांपेक्षा मुलांवरच्या प्रेमापोटी त्या सातत्याने लिहीत आहेत.

'झाड आजोबा', 'खारुताई आणि सावलीबाई', 'हुर्रे हूप', 'उजेडाचा गाव', 'गंमत झाली भारी', 'रानफुले' या कवितासंग्रहातून त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेकविध कविता समोर येतात. लहान मुलांची भाषा वापरून त्यांच्या मनोविश्वात शिरून लिहिलेल्या या कविता असल्याने मुले पटकन त्यांच्याशी समरस होतात.

माणसाला निसर्गाचं वेड असतं, त्याची ओढ असते. ही ओढ दिसते

"मला वाटते व्हावे पान

हिरव्या हिरव्या रंगामध्ये

हरपून जावे माझे भान"

अशा कवितांमधून.

निसर्गात दिसणाऱ्या अनेकविध गोष्टी संगीताताईंच्या कवितेचा विषय झाल्या आहेत. फुलपाखरावर कित्येकांनी कविता लिहिल्या आहेत, पण ताईंनी सुरवंटावरदेखील कविता लिहिली आहे.  

बदकाच्या पिल्लाचे उदाहरण देऊन लहान मुलांनी आई-बाबांचे कसे ऐकायला हवे, ते मुलांसाठी कसे चांगले आहे हे त्या सांगतात. दोन बहिणी, मैत्रिणी यांच्यातले नाते उलगडतात. त्यांच्या कवितांतून ससुल्या येतो, लांबमान्या जिराफ येतो, लठ्ठमुठ्ठ हत्ती येतो. पशू येतात तसे पक्षीही. पिंजऱ्यातला मिठूमियाँ येतो, आपल्या बाळाला घेऊन चिऊताई येते. अगदी मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि सशापासून सिंहापर्यंत सारे सारे येतात आणि फक्त प्राणी-पक्षीच नाहीत बरं का... त्या कवितांमध्ये भूतसुद्धा येते. थोडक्यात काय तर मुलांना जे जे विषय आवडतात, जे जे त्यांना कळायला हवे असे वाटते ते ते सारे कवितांमध्ये येते.

कोणताही शिकवण्याचा आव न आणता सहजपणे त्या जीवनाविषयी खूप काही सांगून जातात. तेही मुलांना समजेल, रुचेल आणि पटेल अशा शब्दांत. मायलेकीच्या नात्यातली गंमत समोर आणतानाच आई घरात काम करून दमते, तिला मुलांनी मदत करायला हवी असे त्या सुचवतात. आपले दप्तर, पुस्तके, खेळ वेळेवर आपणच जाग्यावर ठेवले तर आईला मदतपण होते आणि घरपण छान दिसते, हे सांगताना त्या म्हणतात,

"त्रासलेलं घर अन त्रासलेली आई

आपल्यालाही याचा त्रास होतोच की नाही

म्हणून म्हणतो आपलं डोकं नीट चालवू या

चला तर मग आईला मदत करू या"

संगीताताईच्या कवितांमध्ये खूप वेगळे शब्द आहेत असे नाही. आहेत रोजच्या तुमच्या-आमच्या वापरातलेच; पण काही शब्दयोजना मात्र हटके दिसतात. चीकिमिकी, मिटीमिटी, लपकझपक, धमधमधमाल, टमटमाटम यांसारख्या शब्दांमधून मुलांना गंमत येते.

त्यांनी कवितांमध्ये स्वर्णवर्खी झुंबर, मोरपंखांचे डोंगर, सोनपावलाचे ऊन इत्यादी अतिशय सुरेख उपमादेखील वापरल्या आहेत. ना.धों. महानोर जोंधळ्याला चांदणे लगडले म्हणतात पण संगीताताईच्या कवितेतली आकाशात देवाने शेती केली आणि कणसात दाणे म्हणून चांदण्या आल्या ही कल्पनाच किती रम्य आहे ना?

या सगळ्या चित्रदर्शी नादमधुर कवितांमधून आनंद तर मिळतोच मुलांना, पण त्याचबरोबर शब्दांची जादू घडते, भाषेवरचे प्रेम वाढीस लागते. "भिंतीबाहेर आहे जग किंवा असे जगू, इतुके माझे सारे" अशा कविता जगण्याचा बोध करून देतात.

कवितांबरोबरच त्यांची गद्य पुस्तकेही सुरेख आहेत. बालभारतीच्या इयत्ता ५वी ते १०वी सर्व मराठी कवितांचे रसग्रहण करून त्याची पुस्तके प्रकाशित झाली होती. कवितेचा रसास्वाद याच नावाने असलेली ही पुस्तकमालिका रसास्वादाचे उत्तम उदाहरण आणि अभ्यासकांना उपयुक्त अशीच आहे.

‘पियुची वही’ या आपल्या पुस्तकात त्यांनी एका छोट्या मुलीच्या रोजनिशीतून संवाद साधला आहे. लिहायला लागल्यावर निरीक्षणशक्ती कशी वाढते आणि त्याचा आयुष्याला कसा चांगला उपयोग होतो हे मांडले आहे.

अदितीची साहसी सफर यात मुंगी, हत्तीण आणि माकडीण यांच्या मदतीने एक छोटी मुलगी डायनोसॉरशी यशस्वी लढा देते त्याची कथा आहे तर कचऱ्याचा राक्षस आणि ग्रीनी या नाटकात कचरा समस्या आणि त्यावरील उपाय यांची मनोरंजक पद्धतीने दिलेली माहिती आहे.  

आत्ता नुकत्याच आलेल्या "नल-दमयंती आणि इतर कथा" या १० वर्षांच्या परिश्रमातून आलेल्या पुस्तकात संस्कृतमधील महान ठरलेल्या नाटकांच्या मुलांना समजतील अशा भाषेत कथा आहेत.

अशा या बाल साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या लेखिका-कवयित्री संगीताताईंच्या कार्याला सलाम करताना त्यांच्याच पंक्ती देण्याचा मोह आवरत नाही. पुस्तकांबद्दल त्या म्हणतात,

"जगण्याला आकार देणारं ते एक अभिजात चित्र आहे

पुस्तक आपल्या आयुष्याचा खराखुरा मित्र आहे."

- आरती देवगांवकर

[email protected]