हाय मित्रांनो! कसे आहात? दिवाळी कशी गेली? छान छान फराळ, मस्त मस्त आकाशकंदील, दिवाळी अंक आणि खूप गप्पा या सगळ्यांचं आनंददायी मिश्रण म्हणजेच दिवाळी. दिवाळीनंतर येतो तो बालदिन. या बालदिनाच्या निमित्ताने शिक्षणविवेक बालदिन सप्ताह साजरा करत आहे. या निमित्ताने निरनिराळ्या बालसाहित्यिकांची माहिती करून घेणार आहोत. एकनाथ आव्हाड हे बाल साहित्यातील आघाडीचे नाव. बालसाहित्य या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या साहित्यप्रकाराच्या माधमातून त्यांनी या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याशी बालदिनाच्या निमित्ताने आम्ही संवाद साधला.

बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमी म्हणतो. या काळात झालेले संस्कार हे पुढे आपलं भविष्य घडवत असतात. एकनाथ आव्हाड यांच्या आईंनी पुस्तकी शिक्षण घेतलेलं नसलं तरी कीर्तन-प्रवचन ऐकायची त्यांना सवय होती. आईबरोबर राहून राहून आव्हाड सरांनाही ते आवडू लागलं. कीर्तनातील निरुपण, रंगवून रंगवून सांगण्याची पद्धत याची गोडी लागली व तेच पुढे मनात रुजलं. "आईने आम्हाला अनावश्यक खर्चासाठी पैसे दिले नसले तरी पुस्तकं विकत घ्यायला मात्र ती पैसे द्यायची.", असं ते आवर्जून सांगतात. इतकंच नव्हे तर पुस्तकं वाचण्यासाठी आवश्यक ती मोकळीकही घरातून मिळाल्याचं ते सांगतात.

मुंबईत चेंबूर येथे सरकारी शाळेत शिक्षक असणारे एकनाथ आव्हाड हे आज लोकप्रिय लेखक म्हणून साहित्यक्षेत्रात स्थिरावले आहेत. साहित्यनिर्मितीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना त्यांनी बालसाहित्य का निवडलं याचीही एक गंमतच आहे. केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकातल्याच नव्हे तर ज्येष्ठ लेखकांच्या अन्य कविता, कथा मुलांना वाचून दाखवायला त्यांना पूर्वीपासूनच आवडायचं. एखादा कठीण धडा किंवा कवितेचं मुलांना लवकर आकलन व्हावं यासाठी ते फायदेशीर ठरायचं. सरांना स्वतःला शाळेत असताना घडलेली घटना, किंवा पुस्तकातली एखादी गोष्ट रंगवून रंगवून मित्रांना सांगायची सवय होती. त्याचाच उपयोग आपल्याला शाळेत झाला असं त्यांना वाटतं. उद्या काय नवीन ऐकवणार असं मुलं रोज विचारायची. एक वेळ अशी आली की वाचलेला, ऐकलेला सगळा साठा संपला आणि मग आव्हाड सर स्वतःच कवितेकडे वळले. कविता, कथा, नाट्यछटा, शब्दकोडी, काव्यात्मक कोडी अशा अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे.

मुलांच्या जाणीवा, बारकावे समजून घेण्याची सवय आणि मुलांच्या भाषेची अचूक सापडलेली नाडी याचा फायदा त्यांना बालकविता, कथा लिहिताना झाला. आयुष्यातली पहिली कविता ही त्यांनी आपल्या विद्यार्थीनीवरच केली होती. "माझ्या बालसाहित्याची सुरुवात माझ्या विद्यार्थ्यांमुळे झाली.", असं सर कौतुकाने सांगतात. बालसाहित्याव्यतिरिक्त अन्यही प्रकार आव्हाड सरांनी हाताळले. मग ते ललित असो, पुस्तक परीक्षण असो, मोठ्यांच्या कविता असोत वा कथा असोत, पण बालसाहित्याला मुलांकडून मिळालेली प्रेरणा, वाचकांनी घेतलेली दखल किंवा आवडलेली धाटणी, अथवा मानाने दिलेला कौल अशा अनेक कारणांसाठी मी बालसाहित्याची वाट स्वतःसाठी निवडली आणि त्यातच रमलो असं ते नमूद करतात. खरं तर मुलांनीच मला बालसाहित्याकडे वळवलं असंही ते सांगतात.

बालसाहित्य हे मुळातच अन्य साहित्यप्रकारांहून वेगळं आहे. हे जाणीवपूर्वक लहानांसाठी, त्यांच्यातील वेगवेगळ्या वयोगटांसाठी लिहिलं जातं. त्याचे लेखनाचे निकष वेगळे असतात, असं आव्हाड सरांना वाटतं. ते सांगतात, “बालसाहित्य हे बाळबोध असून चालत नाही. त्यातून मुलांना आनंद मिळणं अपेक्षित असतं. त्यात संवेदनशीलता असावी लागते, प्रसंगी विनोदही असावा लागतो. त्यात तोचतोचपणा असून चालत नाही. नावीन्य असावं लागतं. सध्याच्या काळातल्या वस्तू, प्रतिमा यांचा वापर करावा लागतो. संगणक, मोबाईल सारख्या इलेक्ट्रोनिक वस्तू, हाय-हल्लो-बाय-सॉलिड सारखे शब्द, आधुनिक वातावरण यांचा अंतर्भाव साहित्यात करावा लागतो. काळानुसार झालेले व्याकरणिक बदल लक्षात घ्यावे लागतात. मोठ्यांसाठी निर्जीव असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या मुलांसाठी सजीव होतात. बाहुली त्यांच्याशी बोलते; एखादी वस्तू बोलते, अशा वेळी त्यांचा संवाद कसा असेल याचा विचार करून मग ते कवितेत वा कथेत उतरवावं लागतं. कथाकथन करताना किंवा नाट्य छटा लिहितानाही याचं भान ठेवावं लागतं. पण हे सगळं करताना मुलांना आनंदासह ज्ञानही मिळेल यांचाही विचार साहित्यिकांना करायचा असतो.”

मुलांवर संस्कार करण्याचं काम करणाऱ्या या बालसाहित्याला अद्यापही साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणलं गेलं नसल्याबद्दल मात्र आव्हाड सर खंत व्यक्त करतात. आजही बालसाहित्याकडे बाळबोध म्हणून पाहिलं जातं. यासाठी बाल साहित्यिकांनीही विचाराच्या कक्षा रूंद करणं आवश्यक आहे. समीक्षकही बालसाहित्याची विशेष दखल घेत नाहीत. समीक्षकांनी-प्रसारमाध्यमांनी पुस्तकांची दाखल घेतली पाहिजे. खरं तर उत्तम बालसाहित्य हे मुलांच्या मनात चांगल्या विचारांची रुजवात करतं, त्यांच्या जाणीव बळकट करतं. त्यांच्या कल्पनेला वाव देतं. बालसाहित्य प्रवाहात मागे राहण्याचा दोष हा फक्त साहित्यक्षेत्राचा नाही. पालक, शाळा, शिक्षक या तिघांचीही ती जबाबदारी असते. ग्रामीण-शहरी शाळांनी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करायला हवं, घरात वाचनासाठी पोषक वातावरण हवं, हल्ली जेवढं महत्त्व छंदवर्गांना दिलं जातं तेव्हढं वाचनाला दिलं जात नाही; ते मिळायला हवं. हे घडलं तर चित्र नक्की बदलेल असं त्यांना वाटतं. आणि हे चित्र उद्याच्या भारतासाठी पोषक असेल हे निश्चित.  

 

- मृदुला राजवाडे

[email protected]