गरज सुसंवादाची

दिंनाक: 13 Nov 2017 16:51:49


अजय, अपर्णा आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी नेहा हे तसे एक सुखी त्रिकोणी कुटुंब. अजय आणि अपर्णा दोघेही नोकरी करत असल्यामुळे दोघांचीही प्रचंड धावपळ होत असतानासुद्धा नेहाचे भविष्य सुरक्षित असावे, तिला जगातील सगळ्या उत्तम गोष्टी, ज्या आपल्याला मिळू शकल्या नाहीत, त्या देता याव्यात, या हेतूने अजय व अपर्णा माघार न घेता पुढे चालत होते.

आज सुट्टी असल्यामुळे, बरेच दिवस न भेटलेले त्यांचे मित्र शिरीष, प्रिया व त्यांचा मुलगा रोहन अजयच्या घरी आले होते. प्रियाने नेहाची विचारपूस करून रोहनला, ‘‘अरे, इथे बसून काय करतोस? जा ना, नेहाशी खेळ जरा’’, असे म्हणून दोघांना बेडरूमकडे नेले आणि बाहेर येऊन अपर्णाने नुकतेच घेतलेले ड्रेस बघायला सुरुवात केली. तेवढ्यात नेहा धावत धावत बाहेर आली. ‘‘प्रिया मावशी, हे बघ ना, मी परवा डोंगराचे किती मस्त चित्र काढले आहे. प्रियाने, ‘‘अरे व्वा! किती छान’’, असे म्हणून पुन्हा अपर्णाकडे मोर्चा वळवला. मात्र नेहा आणि रोहन अधूनमधून येऊन सतत गप्पांमध्ये लुडबुड करत होते, त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवूनसुद्धा रोहनने आताच्या आता घरी चला म्हणून; तर नेहाने मला बाहेर जायचे असा हट्ट सुरू केला.

‘‘अरे, काय कमाल आहे, यांना काहीही द्या, मुले काही दहा मिनिटे शांत बोलू देत नाहीत. यांना नक्की काय हवंय?’’  शिरीषने कळीचा मुद्दा उपस्थित केला.

‘‘हे समजणे खरेच अवघड आहे. आपण कितीही राबलो तरीही नेहाचे समाधान होतच नाही’’, अपर्णाने सुद्धा तिची बाजू मांडली.

‘‘आपण प्रत्येक गोष्ट मुलांच्या सुखासाठीच करतो, जिवाचा आटापिटा करतो हे शंभर टक्के मान्य, पण आपले प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत का? त्यांचा मुलांना खरेच फायदा होतो आहे का?’’  प्रियाने चर्चेला थोडा वेगळा रंग दिला.

‘‘जरा थांबा. परवाच सतीशची आणि माझी याच विषयावर सोसायटीत फेरफटका मारताना चर्चा झाली. त्याच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे आहेत, कारण नेहाच्याच वयाची त्याची मुलगी देवांगी आम्ही जवळून बघत आहोत.’’ अजयने त्याच्याच सोसायटीत राहत असलेल्या सतीशला बोलावले, परिस्थिती सांगितली आणि सतीशकडे सूत्रे सोपवली.

‘‘पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय प्रयत्न करायचे आणि ते कोणत्या दिशेने करायचे हे समजून घ्यायची, त्यासाठी प्रयत्न करायची तीव्र इच्छा आहे. म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन!’’

मुलांच्या आई-वडिलांकडून असलेल्या अपेक्षा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलतात. त्या समजून घेण्यासाठी त्यांच्याशी उत्तम संवाद असणे ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. स्पर्शाच्या भाषेचा टप्पा ओलांडून शब्दांची भाषा शिकलेली नेहा, देवांगी बोलण्यासाठी आसुसलेली आहेत. नेहा आणि हो रोहनसुद्धा जवळ येऊन जेव्हा काही सांगत असतील, त्या वेळी तू मला जे काही सांगत आहेस ते ऐकून घेण्यामध्ये मला रस आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी ते जेव्हा बोलत असतील, तेव्हा तुमच्या हातात असलेला मोबाईल, पेपर बाजूला ठेवा, टीव्हीचा आवाज बंद करा, त्यांच्या बोलण्याला अनुसरून प्रश्न विचारा. त्यांचे पूर्ण ऐकून घ्या. तुला काय कळते, अजून लहान आहेस, मी सांगतो ते ऐक, ही वाक्य संवादाला सुरुंग लावून उद्ध्वस्त करू शकतात, असे सुरुंग टाळा.

मुलांशी बोलताना शक्यतो मुलांना मान वर करून बोलावे लागणार नाही, हे बघा. तुम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांचाकडे जा, त्यांना बोलावू नका. या गोष्टीमुळे त्यांना आपणसुद्धा महत्त्वाचे आहोत याची जाणीव होते व ती सहजपणे बोलू लागतात. मुलांना गोष्ट सांगा, वाचून दाखवा, त्याविषयी प्रश्न विचारा. छोटे-छोटे खेळ म्हणजे अगदी एकमेकाला उश्या फेकून मारणे हेसुद्धा मुलांशी संवाद वाढवायला मदत करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तू आळशी आहेस, मूर्ख आहेस, विसरभोळा आहेस अशी विशेषणे लावून त्यांना नकळत दूर ढकलू नका, कारण तुम्ही लावलेले विशेषण मुले खूपच गंभीरपणे घेतात.

मला माहिती आहे, तुम्ही सगळे तुमच्या व्यापामध्ये प्रचंड गुंतला आहात, तरीही तुम्ही हे सगळे करू शकता. स्वयंपाक करताना, जेवण करताना, सोबत प्रवास करताना, झोपायची आधी आणि झोपून उठल्यावर दहा मिनिटे, अगदी अंघोळ करताना जरी तुम्ही मुलांना वेळ दिलात तरी तो त्यांच्यासाठी आई-बाबांनी दिलेला सगळ्यात मोठा खजिना असतो. आणि याच खजिन्याचा वापर करून मुले त्यांचे सुख आणि समाधान शोधायला शिकतात.

तुम्हाला काय वाटते. अपर्णा, अजय, शिरीष आणि प्रियाच्या आयुष्यात सतीशशी गप्पा मारल्यामुळे काय फरक पडला असेल. नेहा व रोहन अजून समाधानी झाली असतील का? तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया ऐकायला मीसुद्धा सतीशइतकाच आतुर आहे!

 

 -चेतन एरंडे 

[email protected]