नमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण समजायला थोडं किचकट पण एकंदर आकाशाचं गणित समजून घेतलं. आकाशात एखादा तारकासमूह नक्की कुठे आणि वर्षाच्या कोणत्या महिन्यात दिसेल याची पुसटशी कल्पना तुम्हाला नक्की आली असेलच. आणि अशी आशा आहे की तुम्ही कोणती नक्षत्रे मिळून कोणती राशी बनते याचं गणितसुद्धा नक्की मांडलं असेल.

आता प्रस्तुत लेखात आपण आपल्या रोजच्या जीवनात या आकाशाचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊ. आपला आणि या आकाशाचं पहिलं नातं येतं ते सूर्याबरोबर. सूर्य हा आपल्या सूर्यमालेतला एकमेव तारा आहे. पृथ्वीवर सर्व प्रकारचे जीवन कार्यरत राहण्यासाठी लागणारी जवळजवळ सर्व प्रकारची उष्णता आपल्याला सूर्याच्या रूपानेच मिळते. त्यामुळेच आपल्यासाठी आकाशातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेला सूर्य हा एकमेव तारा आहे. सूर्याच दुसरं महत्त्व म्हणजे पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्यामुळे आणि सूर्यामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टीस सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे “ऋतुचक्र” सुरू झालं आणि त्यामुळेच हिवाळा, उन्हाळा असे ऋतू तयार झाले. आता यात अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सूर्य - पृथ्वी हे अंतर हे सजीव सृष्टीच्या टिकावासाठी परिपूर्ण आहे. म्हणजे या अंतरामुळेच पृथ्वीवर शुक्र ग्रहासारखी अतिउष्णता नाही किंवा प्लुटोसारखं अतिशीत तपमान नाही. सध्याच्या घडीला आकाश संशोधन संस्था पृथ्वीसदृश्य ग्रह (Exo-Planets) शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यासाठी ते अशाच अंतरांचं गणित मांडतात. अशा त्या तारकामालिकेतील मुख्य तारा आणि ग्रह हे अंतर सूर्य-पृथ्वीप्रमाणे परिपूर्ण असेल तर तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता असते. अशा अंतरांना (Goldi-Lock Zones) असं म्हणतात.

आता हे झालं सूर्याचं महत्त्व, आता आपण पाहणार आहोत आपल्या आकाशातील दुसर्‍या पण सजीवांसाठी सर्वांत महत्त्वाच्या आकाशीय वस्तूचं म्हणजेच चंद्राचं महत्त्व. शास्त्रज्ञांच्या मतानुसार चंद्राच्या उत्पत्तिमुळेच (चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे) पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग मंदावला आणि त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील दिवस आणि रात्र साधारण समान झाली. चंद्राचा सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये असलेला सर्वांत मोलाचा वाटा म्हणजे समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी. याच भरती आणि ओहोटीमुळे कधीतरी मासे असलेले आपले पूर्वज हे उभयचर बनले असावेत आणि मग उत्क्रांतीची प्रक्रिया चालू झाली असावी. या भरती-ओहोटीच सुद्धा एक सोप्पं गणित आहे ते असं – आपण मागील लेखांमध्ये पाहिलं की चंद्राच्या वेगवेगळ्या कला दिसतात त्याला आपण प्रतिपदा, द्वितीया, इ. ते पौर्णिमा/अमावास्या म्हणतो. आता प्रतिपदेला एक मानलं तर पौर्णिमेपर्यंतचे आकडे हे १५ पर्यंत येतात. आता तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी भटकंती करायला गेलात आणि तुम्हाला भरती आणि ओहोटीच्या वेळा शोधायच्या असतील तर अगदी सोप्पं गणित मांडू शकता. म्हणजे त्या दिवशी जी तिथी असेल त्याला जर ०.८ नी गुणले तर जो पूर्णांक येईल साधारण तितके वाजता भरती असते. म्हणजे जर आज एकादशी (११) असेल तर -  ११ x ०.८ = ८.८ म्हणजेच त्या दिवशी सकाळी आणि रात्री ८ वाजता पूर्ण भरती असेल आणि ८ नंतर ६ तासांनी म्हणजेच दुपारी २ आणि रात्री २ ला पूर्ण ओहोटी असेल. आता पटापट गणित करा आणि एक भरती आणि ओहोटीचा तक्ता तयार करून ठेवा!

आता हे झालं चंद्र-सूर्याचं. हे सोडून इतकं अखंड आकाश पसरलंय याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तर हे समजून घ्यायला अनेक उदाहरणे देता येतील त्यापैकी मोजकी इथे सांगतो. आपले सर्व मराठी महिने (चैत्र, वैशाख, इ.) हे पौर्णिमेस चंद्र कोणत्या नक्षत्राजवळ आहे यावरून ठरतात. जसे की चैत्र पौर्णिमेस चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. कार्तिक महिन्यात पौर्णिमेस तो कृत्तिका जवळ असतो. आता महिने १२ आणि नक्षत्र २७ असं कसं, याच कारण तुम्ही नक्की शोधून काढा ! याचप्रमाणे पूर्वी शेती करताना साधारण आर्द्रा नक्षत्र पाहून करायचे. आर्द्रा नक्षत्राच हे नावच आर्द्रता म्हणजेच (Humidity)वरून आलंय. त्याचप्रमाणे कोकण भागात पूर्वी एक म्हण प्रचलित होती ती म्हणजे “पडेल हस्त तर भात पिकेल मस्त” म्हणजेच चंद्र हा हस्त नक्षत्राजवळ असताना जर पाउस पडला तर भात शेतीसाठी तो उत्तम मानला जाई. या व्यतिरिक्त आकाश आणि आपण यातील एक अनोखा संबंध म्हणजे हेलियम आणि हायड्रोजन यानंतर आवर्त-सारणीमधील जवळपास सर्वच मूलद्रव्ये ही Big-Bangमुळे आणि त्यानंतर विश्व उत्पत्तीच्या दरम्यान ताऱ्यांचे जे स्फोट झाले (Supernova) त्यामुळेच तयार झाली आहेत. त्यामुळे एका अर्थी आपणसुद्धा ताऱ्यांचे वंशजच (STAR-People) आहोत. चला तर मग आकाश आणि आपण यांच्यातील ही आणि अशी अनेक नाती तुम्हीसुद्धा शोधून काढा आणि लवकरात लवकर कळवा. भेटू पुढील लेखात !!!

आकाशात रोज काय बदल होतात आणि थोड्या माहितीने सुद्धा आकाश कसे ओळखता येते वाचा खालील लिंकवर 

लेख ३ : आकाशाची रचना – आकाशात कुठे, कधी आणि काय दिसेल

 

-अक्षय भिडे

[email protected]