‘परसेप्शन’ म्हणजे ‘दृष्टिकोन’. पंचेंद्रियांमधून बघण्याची-ऐकण्याची-स्पर्शज्ञानाची किंवा गोष्टी समजून घेण्याची क्षमता म्हणजे ‘परसेप्शन’. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला, तर त्या सर्व प्रक्रिया (स्मरणशक्ती संकट), ज्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रेरणांचा अर्थ लावू शकतो व त्यांना उत्तर देऊ शकतो, त्या म्हणजे ‘परसेप्शन’. या प्रक्रियांमुळे आपण बाहेरील संवेदनाचा आपल्याला उपयोगी असा अर्थ लावू शकतो.

उदाहरणार्थ, जर डोळे बंद करून आपल्याला एक फळ खायला दिले तर त्याचा आकार  कसा आहे (स्पर्श ज्ञान), त्याचा वास कसा आहे (घ्राणेंद्रियाचे ज्ञान) त्याची चव काय आहे, या सर्व संवेदनावरून आपण निष्कर्षावर पोहोचू शकतो की ते सफरचंद आहे की संत्र. यामध्ये स्मरणशक्तीचीदेखील गरज पडते. (ती चव/ तो आकार माहीत असणे गरजेचे असते, तरच निष्कर्षापर्यंत पोहोचता येते.)

शाळेतील मुलांचा विचार केला तर मुख्यत: Visual perception आणि Auditory perception याचाच सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. परंतु काही मुलांना बाकी ज्ञानेंद्रियांचादेखील अभ्यासात उपयोग होऊ शकतो.

Visual perception साठी एक प्रयोग करून बघू:   

वरील चित्रात, उजव्या बाजूला दिलेल्यांपैकी कोणती आकृती पूर्ण केल्यावर डाव्या बाजूचा आकडा तयार होईल? उजव्या बाजूच्या अर्धवट आकृती पूर्ण करता येणे व त्या  कशा दिसतील हे कळणे, हा बघण्याच्या क्षमतेसाठीचा महत्त्वाचा भाग आहे.

फळ्यावर लिहिलेली माहिती पटापट उतरवून घेण्यासाठी मुलांना याची खूप आवश्यकता असते. तसेच तोंडी सांगितलेली उत्तरे लिहून घेण्यासाठी ऐकण्याच्या क्षमतेची गरज असते.

उदा. वर्गात दंगा चालू असताना रस्त्यावरचे आवाज येत असताना, शिक्षकांनी सांगितलेल्या वाक्यांवर कसे लक्ष द्यायचे यासाठी ऐकण्याची क्षमता आवश्यक असते.

अशा बर्‍याच कृती (activities) आपण घेऊ शकतो, ज्यामुळे आपण मुलांची बघण्याची वाढवू शकतो.   

     - दडलेले शब्द/ वस्तू शोधणे.

     - दोन चित्रांमधील फरक ओळखणे.

     - दिलेले चित्र पूर्ण करणे (L - चौकोन बनवा, - त्रिकोण बनवा.)

अशी कार्यपत्रके आपण शब्दशोध या सदरात देत असतो.

लहान मुलांना गाणी शिकवणे हा त्यांचे ऐकण्याची क्षमता वाढवण्याचाच एक भाग आहे. गाण्याची चाल आणि त्यातील यमक यामुळे मुलांची फक्त आकलनशक्तीच नाही, तर कल्पनाशक्तीदेखील वाढते. त्यांचे उच्चार सुधारतात व दोन शब्दांमधील फरक त्यांना पटकन कळू लागतो. संस्कृत श्लोक ऐकणे व पाठांतर करणे याचादेखील ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयोग होतो.

एखाद्या वस्तूला स्पर्श करून, त्याची माहिती लक्षात घेऊन नंतर त्याचा वापर करता येणे म्हणजे ‘स्पर्शज्ञान’ काही मुलांचे आकलन लवकर होते, जर त्यांना गोष्टी हाताळायला मिळाल्या तर. म्हणूनच आजकाल बर्‍याच शाळांमध्ये लहान मुलांना शिकवायला sandpaper पासून बनवलेली अक्षरे वापरली जातात.

यामुळे त्या अक्षरांचा आकार कसा आहे, त्याचे वळण कसे आहे हे मुलांना समजते. पालकांनी व शिक्षकांनी जर हे जाणून घेतले की मुलांना कुठल्या प्रकारे समजावणे सगळ्यात सोपे आहे तर मुलांचे शिक्षण सहज आणि मजेदार होईल.

 

-प्रियांका जोशी

[email protected]