8वीतल्या साईराजची आई त्याला घेऊन समुपदेशनासाठी आली. ‘‘ह्याच्या कितीही मागे लागा, हा अभ्यासाला बसतच नाही, कोणाचं ऐकतच नाही.’’ त्याच्या आईची  ही तक्रार.  याविषयी साईराजशी जेव्हा बोलणे झाले तेव्हा समजले की, त्याला अभ्यासाला बसावसं वाटत नाही. अभ्यासाला बसला तरी त्याला वर्गातल्या गमती-जमती आठवतात. टी.व्ही. बघावासा वाटतो, चॅटिंग करावसं वाटतं, का बरं असं होत असेल त्याला? तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबरोबर काम करताना मला जे उत्तर सापडलं ते असं होतं की अभ्यास करण्याची त्याची इच्छाशक्तीच कमी पडत होती. परिणामी तो लगेच कंटाळायचा. घरच्यांच्या सततच्या सूचनांना तर तो त्रासला होताच. पण त्यामुळे त्याची अभ्यासातली गोडीच कमी झाली होती.

तुमच्या बाबतीही काहीसं असंच घडतंय का? आजच्या लेखात आपण याविषयीच बोलूया.

‘अभ्यास करणं’ हे तुमच्या शालेय आयुष्यातील एक महत्त्वाचं काम आहे. हे मी तुम्हाला पहिल्याच लेखात सांगितलय. ते तुम्हाला पटलं देखील आहे. तरीदेखील आपल्याला अभ्यास का करावासा वाटत नाही त्याची काही कारणं अशी आहेत.

1) एकाच प्रकारच्या अभ्यासाचा आपल्याला लवकर कंटाळा येतो.

2) अभ्यासाला असल्यावर येणार्‍या इतर व्यत्ययांच्या आपण लगेच आहारी जातो. त्यामुळे अभ्यास करावासस वाटत नाही.

3) अभ्यास का करायचा ह्याचा हेतू स्पष्ट नसेल तरीही अभ्यासाचे महत्त्व वाटत नाही.

4) अभ्यास करण्याचा आपला दृढनिश्‍चय कमी पडतो.

5) एखाद्या छोट्याशा अपयशानेही आपण खचून जातो. परिणामी आत्मविश्‍वास कमी झाल्याने आपण अभ्यास करणेच सोडून देतो.

वर्षाच्या सुरुवातीला आपण ज्या जोमाने अभ्यास सुरु करतो. तोच उत्साह वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करता येईल? पुढील काही युक्त्या तुमचा उत्साह इच्छा वाढवण्यासाठी नक्कीच मदतरुप ठरतील.

1) लेगच सुरुवात करा. अभ्यास उद्यावर न ढकलता आज, आत्ता, ताबडतोब या न्यायाने सुरु करा.

2) छोटी व आपल्या आवाक्यातील ध्येय ठरवा. जेणेकरुन तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. (ध्येयनिश्‍चितीबाबत आपण मागच्या लेखात माहिती मिळवली आहे, त्याची मदत घ्या.)

3) अभ्यासतला एकसूरीपणा टाळा.

4) भरकटणार्‍या मनाला लगेच अभ्यासावर केंद्रित होण्याची सवय लावा.

5) एखादी गोष्ट ठरवल्यावर ती पूर्ण करण्याचा ठाम निश्‍चय करा. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.

6) स्वत:ला पारितोषिक द्या. ठरल्याप्रमाणे अभ्यास झाल्यास स्वत:ची पाठ थोपाटा.

या काही उपयांनी तुम्ही अभ्यास करण्यच्या निश्‍चयाचा हा महामेरु सहज उचू शकता. चला तर मग अधिक जोमाने अभ्यासाला सज्ज व्हा!

- रश्मी पटवर्धन