वाघोबाशी गाठ

दिंनाक: 06 Oct 2017 17:16:26


जंगली जयगड पाहायला जाऊ या, म्हणून रामकाकांनी जाहीर केलं, तेव्हा आमचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. दर वर्षी रामकाका दिवाळीच्या सुट्टीत आम्हाला कोणत्या ना कोणत्यातरी गडावर घेऊन जायचे. कोकणातल्या चिपळूण या छोट्या शहराच्या अवतीभवती अनेक गड-किल्ले होतेच. अंजनवेल इथला गोपाळगड, गोवळकोट इथला गोविंदगड, खेडजवळचा रसाळगड, महिपतगड, हर्णेचा सुवर्णदुर्ग, सगळे एका-एका दिवाळीच्या सुट्टीत पाहून झाले होते. या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत जंगली जयगडला जायचं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे एके दिवशी आम्ही रामकाकांच्या सोबत टेंपोमधून निघालो. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गडावर जायचं; म्हणजे पुरेशी तयारी हवीच. म्हणून आम्ही सोबत काठी, पाण्याची बाटली, खाऊ व दिवाळीतल्या फटाक्यांपैकी काही फटाकेही घेतले होते. पाणी, खाऊ हे सगळं ठीक; पण फटाके कशाला? असा प्रश्‍न मनात आला होता, पण रामकाकांचा आदेश होता ना, फटाके सोबत घ्या, पण वाजवू नका. ते आणीबाणीची परिस्थिती असेल, तरच वाजवायचे. फटाके वाजवायचे नाहीत, मग सोबत कशाला घ्यायचे? असाही प्रश्‍न मनात आला, पण तो रामकाकांना विचारायचं धाडस झालं नाही. ठरल्याप्रमाणे आमचा टेंपो कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याकडे जाणार्‍या रस्त्याने निघाला. प्रकल्पाला वळसा मारून घाटरस्त्याने डोंगरमाथ्यावर येऊन पोहोचला. रामकाकांनी टेंपो थांबवला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत दिसणारा कोयना विद्युत प्रकल्प आणि त्याचे स्वीचयार्ड पाहून डोळे दिपले. अतिशय सुंदर असे ते विहंगम दृश्य पाहून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. घाटमाथ्यावर आता दोहो बाजूंस घनदाट जंगल होतं. घाटरस्त्याने थोडं पुढे गेल्यावर ‘रामबाण’ नावाचा बोर्ड वाचून आम्ही थांबलो. पुन्हा थोडं जंगलात शिरून एका विशाल खडकाच्या पोटातून पाझरणारं पाणी पाहिलं. जणू बाण मारूनच त्या खडकाच्या पोटातून पाणी काढलं असावं. घनदाट जंगलातला तो प्रचंड खडक आणि वाहणारं पाणी पाहून आम्ही आश्‍चर्यचकित झालो. रामकाकांनी घाई केली नसती, तर अजूनही काही वेळ आम्ही तिथेच थांबलो असतो. परंतु, अजून जंगली जयगड पाहायचा असल्याने आम्ही पुन्हा डांबरी रस्त्यावर टेंपोपाशी खाली उतरलो. टेंपोपासून थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे जंगली जयगडकडे जाणारी पायवाट होती. इथून अर्धा-पाऊण तास चालावं लागणार होतं. दुपारचे साडेबारा वाजले होते. भर दुपारचं ऊन मात्र जाणवत नव्हतं, इतकी झाडं-झुडपं आमच्या सभोवार होती. टेंपोजवळच थोडं खाऊन घेऊन आम्ही जंगली जयगडकडे निघालो. जंगलातला हा पडका किल्ला पाहून, पुन्हा चार वाजेपर्यंत परत यायचं, असा रामकाकांचा विचार होता. वरच्या डोंगराकडे जाणारी जंगली जयगडची पायवाट जिथून सुरू होत होती, तिथेच टेंपो उभा करून, आम्ही झपाझप जंगल जयगड पाहायला निघालो. गर्द जंगलातली ती पायवाट इतकी सुंदर होती की, भान हरपून आम्ही आजूबाजूचा निसर्ग पाहण्यात मशगूल झालो होतो. पुढे रामकाका, मध्ये आम्ही आणि आमच्या मागे टेंपो ड्रायव्हर अशी आमची रांग पुढे निघाली होती. पडक्या किल्ल्याच्या बुरुजापाशी येऊन पोहोचलो आणि पायवाटेवर आडव्या आलेल्या झाडाच्या फांदीवर एक ‘बांबू पिट व्हायपर’ नावाचा विषारी साप, ज्याला हरा-नाग असंही म्हणतात, तो दिसला. त्याला अजिबात डिस्टर्ब न करता, आम्ही पायवाट सोडून थोडं खालच्या बाजूला येऊन गडाकडे गेलो. पडक्या भिंती पाहिल्या. रामकाकांकडून गडाविषयी माहिती जाणून घेतली. बिस्कीटं खाऊन पाणी प्यायलो, तोपर्यंत साडेचार वाजले होते. आता भराभर परत जायला हवं होतं. आमच्या सोबत आलेला तिसरीमधला अमित तर मघाशी साप पाहूनच घाबरला होता. त्याच्या मागे सातवीत शिकणारा मी होतो म्हणून बरं. कारण आठवी-नववीतली मोठी मुलं टणाटणा उड्या मारत रामकाकांच्या मागे चालली होती. लहान अमितला सांभाळायला कुणीच तयार नव्हतं. परतीच्या मार्गावरही तसंच झालं. रामकाका झपाझप गड उतरू लागले. मागे मोठी मुलं झपाझप चालू लागली. अमित बिचारा काहीसा मागे पडला. सर्वांत शेवटी असलेला टेंपो ड्रायव्हर मध्येेच एका वळणावर मला आणि अमितला ओलांडून पुढे निघून गेला. रामकाकांनी त्याला ‘सगळ्यात शेवटी ये’, असं बजावून सांगितलं होतं, तरीही तो पुढे गेला. कारण खालचा डांबरी रस्ता आणि टेंपो आता दिसू लागला होता. आता जवळच तर आहे, असं म्हणत सगळे पुढे गेले. फक्त मी आणि लहानगा अमित दोघेच मागे राहिलो. चालताचालता गर्द जंगलात शिरलो आणि पुन्हा तो टेंपो आणि डांबरी रस्ता दिसेनासा झाला. उतरणीवरच्या पायवाटेवरून आम्ही दोघं म्हणजे मी आणि लहानगा अमित भराभरा चालत होतो. आता जंगल दाट होऊ लागल्याने पायवाटेवरही अंधारून आलं होतं. पुढे चालणारी मुलं पुढच्या वळणाआड लुप्त झाल्यावर आम्ही त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या हाका त्यांना बहुधा ऐकू गेल्या नसाव्यात. आम्ही त्या वळणापाशी आलो. पाहातो, तर पायवाटेला आणखी एक फाटा फुटलेला होता. आता कुठल्या वाटेने जायचं? क्षणभर विचार करून आम्ही डावीकडे जाणारी वाट पकडून चालू लागलो आणि तिथेच घोटाळा झाला. आम्ही वाट चुकलो आणि पुन्हा वरच्या जंगलात गेलो. वरून टेंपो दिसतो का, डांबरी रस्ता दिसतो का, हे पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु उंच झाडा-झुडपांमुळे काहीच दिसेना. मग दोघंही घाबरून पायवाटेकडच्याच एका खडकावर बसलो. एकमेकांना धीर दिला. मी माझ्या जवळच्या पिशवीतून एक बिस्कीटपुडा काढून अमितकडे दिला. बिस्कीटं खाऊन पाणी प्यायलो. पुन्हा नव्या जोमाने रामकाकांना हाका मारत, या अंधारलेल्या पायवाटेवरून पुढे चालू लागलो. परंतु, जसजसं पुढे जावं, तसतशी ती पायवाट अधिकाधिक गर्द जंगलात जाऊ लागल्यावर मात्र घाबरलो. आम्ही वाट चुकलो होतोच, पण आता अंधारही पडू लागला होता. सुमारे पाऊणतास चालल्यावर मात्र मी निर्णय घेतला नि थांबलो. ही जंगलाकडे जाणारी पाऊलवाट सोडून खाली रस्त्याकडे उतरणारी पायवाट शोधायला हवी होती. आमच्या ग्रुपपासून आम्ही खूपच दुरावलो होतो. मी एका खडकाच्या बाजूचं उंच झाड हेरलं. त्या झाडाखाली अमितला उभं करून मी झाडावर चढलो. उंच गेल्यावर मात्र मला दूरवर डांबरी रस्ता दिसला. थोडा प्रयत्न केल्यावर आमचा टेंपोही दिसला; परंतु तो इतका लांब होता की, ओरडूनही काही फायदा नव्हता. तिथवर पोहोचलेली इतर मुलं मला मुंग्यांएवढी छोटी दिसत होती, पण आता मला दिशेचा अंदाज आला होता. ही पायवाट सोडून उजवीकडे खाली सरळ रेषेत उतरत गेलो, तर नक्की आम्ही डांबरी रस्त्यावर उतरणार होतो. मी नीट अंदाज घेऊन खाली उतरलो आणि अमितला घेऊन उजवीकडच्या उतारावरून खाली निघालो, तोवर अंधारून आलं होतं. तिकडे रस्त्यावर आमची शोधाशोध चालली असावी. कारण रामकाकांच्या शिट्टीचा दुरून आवाज येत होता, परंतु आम्ही ओरडून थकलो. आवाज बसला तरी आमच्या हाका मात्र त्यांच्या कानावर जात नव्हत्या. वाढत्या अंधारात एकमेकांचा हात धरून आम्ही उतारावरून उतरत होतो. बस्स, आता एकच टप्पा उतरायचा होता. कारण खालच्या बाजूला अंधुक प्रकाशातही डांबरी रस्ता चमकत होता. आम्ही अगदी रस्त्याच्या वरच्या बाजूला आलो. तिथून घळीमधून खाली उतरलो की, समोरच होता तो रस्ता. घळीपाशी आलो आणि अचानक ‘घुर्रर्र’ असा आवाज ऐकून थबकलो. तिन्हीसांजेच्या अंधारातही आम्ही त्याला ओळखलंच. तो वाघ होता. घळीतली वाट अडवून घळीतच बसला होता. अमित तर थरथर कापायला लागला. मी उसनं अवसान आणून त्याला गप करून, क्षणभर तसाच उभा राहिलो. आम्ही तब्बल दहा मिनिटं थांबलो, तरी वाघोबा वाटेतून हलेना.

खाली रस्त्यावर आता आमच्या ग्रुपमधल्या मुलांचे आवाज ऐकू येत होते. आम्हाला शोधत ते डांबरी रस्त्याने फिरत होते, पण त्यांना ‘ओ’ कसा देणार? समोर तर वाघोबा वाट अडवून बसलेला. भीतीने मटकन खाली बसलेल्या अमितला कवटाळून मीही ओणवा झालेलो होतो. अचानक मला माझ्या पिशवीची आठवण झाली. त्यात दिवाळीचा फराळ होता, पण वाघोबाला तो फराळ कशाला आवडेल? तो आमचाच फराळ करील; म्हणून तो बाहेर काढला नाही. तेवढ्यात माझ्या हाताला दिवाळीतले आपटबार मिळाले. कडेच्या कप्प्यात मी ते ठेवले होते. रामकाकांच्या सूचनेवरून दिवाळीतले ते फटाकेही आणले होते. मी त्यातला एक आपटबार काढून हातात घेेतला. आता काय व्हायचे ते होओ! वाघ फटाक्याच्या आवाजाला घाबरतो हे ठाऊक होतं. शेजारच्या खडकावर तो आपटबार जीव खाऊन जोरात आपटला. ‘ठोऽऽ’ असा आवाज झाल्यावर मात्र वाघोबा आमच्या वाटेतून हलले आणि कडेच्या जंगलात गायब झाले. तेवढ्यात बॅटर्‍या घेऊन आम्हाला शोधत खालच्या रस्त्यावरून फिरणारी मुलं ओरडू लागली. आपटबारचा आवाज त्यांनाही ऐकू आला होता. आवाजाच्या दिशेने ती वर येऊ लागली आणि मग आम्ही दोघांनीही ओरडून त्यांना जवळ बोलावलं. त्यांची भेट झाली आणि आम्ही सुखरूप रस्त्यावर उतरलो. रामकाका टेंपो घेऊन आलेच आम्हाला शोधत. अमितला जवळ घेत त्यांनी त्याची भीती घालवली आणि प्रसंगावधानराखून, हातातल्या आपटबारचा वापर करून, वाघाला पळवून लावल्याबद्दल माझं अभिनंदन केलं. सगळ्या मुलांनी आम्हाला घेऊन एकच गिल्ला केला. सारे ओरडले -

‘प्रसाद केळकरचा विजय असो.’

माझ्या नावाचा असा जयजयकार झाल्यावर माझी छाती खरंच अभिमानाने भरून आली.

प्रा. सुहास बारटक्के

[email protected]