अबोल विनू

दिंनाक: 06 Oct 2017 15:15:11


"विनूss ए विनूss !" असा आईचा आवाज ऐकताच दीड वर्षाचा विनय दुडदुडत आपल्या आईपाशी येऊन पोहोचला.त्याला पाहताच आईने अगदी प्रेमाने त्याला उचलून घेतले आणि विचारले, ",भातू खाणार ना तू? "विनूने मानेनेच होकार दर्शविला आणि लगबगीने खाली उतरून जेवणाच्या पाटावर जाऊन बसला. आपल्या मुलाकडे कौतुकाने बघताना आईला आपल्याच या सुखाचा हेवा वाटला. दीड वर्षापूर्वी झालेले विनूचे आगमन म्हणजे आईसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी अत्यानंदाची गोष्ट होती. त्याच्या आगमनाने त्यांचे साऱ्यांचे आयुष्य भरभरून गेले. त्याच्या बाललीलांनी घराला घरपण मिळवून दिले. विनू म्हणजे साऱ्यांचाच जीव. त्याचे गोड हसू, अबोल पण चेहऱ्याने बोलण्याची सवय याचे साऱ्यांनाच कौतुक होते. विनू जसजसा मोठा होऊ लागला तसतशी आईला एक चिंता जाणवू लागली. विनू साऱ्या गोष्टी, चेहऱ्यावरचे हावभाव अथवा हातांच्या हालचालीतून सांगत असे. तोंडातून एकही शब्द बाहेर पडेना. 'आई' ही हाक ऐकायला आतुर झालेली आई आता मात्र या बाबतीतले गांभीर्य समजून चुकली. तातडीने तिने विनूला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मलच आले. विनूशी त्यांनी संवादही साधला. पण या संवादात ते एकटेच बोलत होते, विनू मात्र नेहमीप्रमाणे हातवारे करत त्यांच्याशी बोलत होता. डॉक्टरांंनाही  त्याच्या या वागण्यामागचे कोडे उलगडेना.
       विनूच्या या समस्येचा उलगडा काही होईना. जसजसे दिवस जात होते, विनू मोठा होत होता, तसतसे आईची चिंता वाढत होती. सगळे प्रयत्न करून सारे कुटुंब थकले. विनूच्या तोंडून शब्द बाहेर पडावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र पदरी निराशाच पडत होती. विनू मात्र आपल्या या लहानश्या विश्वात खूश होता. त्याला जे हवे असे तो ते हातवारे करत मिळवत असे. डॉक्टरांकडून मिळणारी निराशाजनक उत्तरे ऐकून आई खचली होती. एकदा आपल्या मुलाकडे पाहत असताना तिच्या मनात काहीतरी चमकले. काहीतरी उमगल्याची जाणीव तिला झाली. चेहऱ्यावर एक स्मित उमटले. मनाशी काहीतरी निश्चय करत ती जागेवरून उठली. आई या नात्याने आपल्या मुलांची समस्या आपणच सोडवली पाहिजे या विचाराने तिने एक निर्णय घेतला.
       आई जेवढी प्रेमळ तेवढीच मुलाच्या हितासाठी कठोरही बनते. आईने आपल्या मनावर दगड ठेवला व आपल्या वर्तनात बदल घडवला, तिने सकाळपासून विनूकडे लक्ष दिले नाही. विनू आजूबाजूला घुटमळत असतानाही तिने मात्र दुर्लक्ष केले. विनूला तिच्या वागण्याचे कोडे उलगडेना. थोड्याच वेळात विनूला भूक लागली. तो सवयीप्रमाणे आईकडे हाताने खाणाखुणा करत जेवण मागू लागला. आईने त्याच्या या मागणीला दुजोरा दिला नाही. तिने त्याला "तोंडाने बोल, तरच तुला जेवण मिळेल", असे बजावले आणि ती आपल्या कामात पुन्हा व्यग्र झाली. विनू आता भुकेने व्याकूळ झाला होता. त्याला आता रडू येऊ लागले. आईजवळ गयावया करूनही, भोकाड पसरूनही ती लक्ष देईना. विनूकडे काही पर्यायच उरला नाही. शेवटी "आई ! भातू " हे शब्द आईच्या कानी पडले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपल्या विनूने आपल्याला पहिल्यांदाच 'आई' हाक मारले हे ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपल्या लाडोबाला कवटाळत तिने त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले. विनूलाही आपली चूक लक्षात आली. न बोलताही सगळं साध्य होताना पाहून बोलण्याचा आळस करणाऱ्या विनूला आईने थोडे कठोर वागत मूळ पदावर आणले होते. विनूला बोलल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही याची जाणीव झाल्याने आता तो मोकळेपणे बोलू लागला. घर पुन्हा एकदा आनंदाने नाचू लागले. विनूच्या अखंड बडबडीने व भन्नाट प्रश्नांनी घरचे पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. पण हा त्रास सुखावणारा आहे.
 
-सावली म्हात्रे
          [email protected]