नमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण आकाशातील अंतरे कशी मोजतात ते जाणून घेतलं, तुम्ही सुद्धा नक्कीच ह्याविषयी आधीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. प्रस्तुत लेखात आपण आकाश कसं पाहायचं ह्या विषयीची दुसरी पायरी , म्हणजेच आकाशात रोज काय बदल होतात आणि थोड्या माहितीने सुद्धा आकाश कसे ओळखता येते हे जाणून घेऊयात.

आता सर्वात प्रथम आपल्याला काही बाबी समजून घ्यायला हव्यात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रोज रात्री ठराविक वेळी आकाश पाहिलेत तर काल पाहिलेल्या आणि आजच्या आकाशात एक फरक प्रामुख्याने जाणवतो तो म्हणजे कालचे आकाश आणि आज चे आकाश ह्यातील तारकासमूह साधारण ४ मिनिटे लवकर उगवलेले दिसतात. आता ह्या गोष्टीचे सुद्धा सोप्पे गणित आहे ते असे – पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांमध्ये फिरते , तसेच आपल्या सोयीसाठी पृथ्वीची प्रदक्षिणा कक्षा गोल पकडली तर त्या गोलाचे ३६० अंश , म्हणजेच सोप्प गणित मांडलं तर लक्षात येईल की पृथ्वी रोज तिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेत साधारण १ अंशाने पुढे सरकते. आता अजून एक गोष्ट म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा एक फेरी (३६० अंश) २४ तासात पूर्ण करते , ह्याचं सुद्धा गणित मांडलं तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीला स्वतःभोवती १ अंश फिरण्यास लागणारा वेळ हा ४ मिनिटे इतका येतो. आता वरील दोन गोष्टी लक्षात घेतल्या की असं समजेल की आकाश रोज ४ मिनिटे लवकर दिसते (कारण पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेत १ अंश पुढे सरकते)

आता वरील गोष्ट समजण्यास सोप्पी व्हावी म्हणून अजून एक विवेचन. आता असा विचार करा की तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून उभे आहात आणि पूर्व दिशेपासून ते पश्चिम दिशेकडील क्षितिज हे अंतर अंशात्मक १८० इतकं येतं. एका वेळी आपल्याला आकाशात पूर्व क्षितिजापासून ते पश्चिम क्षितिजापर्यंत सहा राशी दिसतात. म्हणजेच एक रास सुमारे ३० अंश इतकी येते. म्हणजेच पश्चिम क्षितिजावर मेष रास मावळली तर पूर्व क्षितिजावर सहावी रास म्हणजेच कन्या उगवेल. आता हा बदल पाहायचा असेल तर सोप्पं काम करा. आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच सूर्याच्या मागच्या बाजूस मकर रास असते. म्हणजेच मकर संक्रांतीला जेव्हा तुम्ही सूर्यास्तानंतर पूर्व बाजूला पाहाल तेव्हा तुम्हाला मकर पासून सहावी म्हणजे मिथुन रास उगवताना दिसायला पाहिजे. (पण सूर्य मावळल्यावर सुद्धा आकाशात प्रकाश असल्याने अंधार पडल्यावर थोड्या वेळानी तुम्ही पुढची म्हणजेच कर्क ही रास पाहू शकाल). आता बरोबर एका महिन्याने आकाश बघितलंत (१५ फेब्रुवारी) तर तुम्हाला सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर कर्क रास दिसेल. म्हणजेच आपल्याला सोप्प गणित असं मांडता येईल की आकाश रोज ४ मिनिटे लवकर उगवते, त्यामुळे आज जर मला ठराविक वेळेस (समजा ५ नोहेंबर ला रात्री ८ वाजता) पूर्व क्षितिजावर वृषभ (द्वितीय रास) उगवताना दिसली तर त्यापुढील म्हणजेच मिथुन रास त्याच वेळी पूर्व क्षितिजावर उगवताना दिसायला साधारण (३० अंश x ४ मिनिटे = १२० मिनिटे म्हणजेच त्याच दिवशी रात्री १० वाजता) १० वाजतील. म्हणजेच दर २ तासांनी तुम्ही आत्ता पूर्व क्षितिजावर दिसणाऱ्या राशीच्या नंतरची रास पाहू शकाल.

आता आकाश बघण्यास सोप्पे होण्यासाठी मकर संक्रांतीला (१५ जानेवारी) जर साधारणतः ६.१५-६.३० च्या सुमाराला सूर्य मावळताना पूर्वेला क्षितिजावर मिथुन रास असेल तर बरोबर एका महिन्याने म्हणजेच १५ फेब्रुवारीस ६.१५-६.३० च्या सुमाराला सूर्य मावळताना पूर्वेला क्षितिजावर कर्क रास असेल. आता ह्यावरून तुम्हाला कधी कोणती रास पहायची आणि ती कधी दिसेल ह्याचं साधारण गणित नक्की मांडता येऊ शकेल.

आता अजून एक लहानसा भाग म्हणजे नक्षत्र. आपण पाहिलं त्याप्रमाणे आकाशाचे १२ भाग केलेले आहेत आणि त्यांना आपण १२ राशी म्हणतो आणि प्रत्येक राशीला ३६० अंशाचे साधारण समान १२ भाग म्हणजेच ३० अंशाचा एक ह्याप्रमाणे भाग करून दिलेले आहेत. आता नक्षत्र २७ आहेत. म्हणजेच ३६० भागिले २७ नक्षत्र बरोबर १३.३३ अंशाचे एक नक्षत्र!! म्हणजेच एक रास बरोबर सव्वादोन नक्षत्र. आता तुम्ही कधी कोणते नक्षत्र दिसेल ह्याचे वरील प्रमाणे गणित नक्कीच मांडू शकाल !!! सोबत अधिक माहिती म्हणून कोणती नक्षत्रे मिळून कोणत्या राशी होतात हे सुद्धा शोधून काढा!!! भेटू पुढील लेखात !!!

 

अक्षय भिडे

[email protected]