मित्र-मैत्रिणींनो, शब्दांच्या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात, छत्तीसचा आकडा असणे, अकांडतांडव करणे, अंगाची लाही लाही होणे, हे वाक्प्रचार आपण पाहिले. 
आपल्या अवयवांवर आधारित असलेल्या वाकप्रचारांबद्दल बोलायचं झाल्यास, डोळे येणे, डोळा लागणे, डोळ्यात भरणे, डोळे भरून येणे, डोळ्यात तेल घालून लक्ष देणे, डोळे उघडणे, डोळे वटारणे, डोळा मारणे , कायमचे डोळे मिटणे, हे डोळ्यांवर आधारित वाक्प्रचार. 
कान टवकारणे, कान भरणे, कानावर हात ठेवणे, कानाला खडा लावणे, या कानाचे त्या कानाला कळू न देणे, हे कानावर आधारित वाक्प्रचार.
नाकासमोर चालणे , नाकी नऊ येणे, नाक खुपसणे, नाकाला मिरच्या झोंबणे, हे नाकावर आधारित वाक्प्रचार.
डोळे, कान, नाक या अवयवांवर आधारित इतर वाक्प्रचार आठवले तर टिपून ठेवा, या वाक्प्रचारांचे वाक्यात प्रयोगही करा.
तोंड, हात, दात, पाठ अशा इतर अवयवांवरचे वाक्प्रचारही आठवा बरं.
अलीकडे बरेच जण पटकन रागावतात. अगदी लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळेच. 'राग ' संदर्भातही बरेच वाक्प्रचार आहेत. उदा. रागाने धुमसणे, जळफळाट होणे, संताप अनावर होणे, हमरीतुमरीवर येणे, तळपायाची आग मस्तकाला जाणे, त्रागा करणे इत्यादी. असे वाक्प्रचार आठवा आणि मलाही सांगा.
रागाचे विविध रंग तर आपण पाहिले. आता रंगांवर आधारित वाक्प्रचार पाहू या, पांढऱ्यावर काळे करणे, डोळे पांढरे होणे, सोन्याहून पिवळे. आठवा बरं असे वाक्प्रचार.
 'खाणे ' हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. खाद्यपदार्थांवर आधारित वाकप्रचारही आहेत. उदा., दुधात साखर पडणे, मधाचे बोट लावणे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे इत्यादी. 
अतिशयोक्ती असणारे वाकप्रचारही असतात, जसे, आकाशपाताळ एक करणे, कातड्याचे जोडे करणे, रक्ताचे पाणी करणे इत्यादी.
अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्यावरून सुद्धा काही वाक्प्रचार आले आहेत. उदा., भाऊगर्दी होणे, अनागोंदी कारभार, भगीरथ प्रयत्न इत्यादी.
'अनागोंदी कारभार ' संदर्भात, महाराष्ट्र वाकसंप्रदाय कोशात माहिती दिली आहे की, अनागोंदी हे गाव तुंगभद्रा नदीच्या काठी, डाव्या तीरावर, विजयनगरच्या विरुद्ध दिशेस आहे. विजयनगरची स्थापना होण्यापूर्वी इथं राजधानी होती. राज्य लहान पण पोकळ बडेजाव मोठा. या प्राचीन राजधानीतील राजा आपलं वैभव दाखवण्यासाठी, सर्व देशांचा जमाखर्च आपला म्हणून मांडत  असे. सर्व देशांचं उत्पन्न आपल्या खजिन्यात  जमा म्हणून दाखवून, त्या त्या देशांची नावंही टाकत असे. त्यावरून अव्यवस्थेसाठी वाक्प्रचार आला, 'अनागोंदी कारभार'. 
वाकप्रचारांसंदर्भात, आणखीन काही गोष्टी प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात. तुम्हाला अशा काही गोष्टी माहीत असल्यास नक्की सांगा. वाकप्रचारांच्या विविध प्रकारावरही विचार करा आणि या प्रवासात सहभागी व्हा . 
प्रवासाचा हा टप्पा कसा वाटला? पुन्हा भेटूच पुढील स्थानकावर.

दीपाली केळकर.
[email protected]