मागच्या भागात आपण नाटकाचं नेमकं प्रयोजन काय आहे हे पाहिलं पण हे नाटक आलं तरी कुठून? त्याचं पितृत्व कोणाकडे जातं? याचा विचार करताना असं लक्षात येत की, भरतमुनींना नाट्यशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. मूळ संस्कृत नाट्यशास्त्र भरतमुनींनी लिहिलं म्हणून त्यांना नाट्यशास्त्राचे जनक म्हटलं जातं.

   “नाट्य भिन्न रुचै: जनस्य बहुधाउप्पेक समाधानम!" 

नाटकाविषयी हे सुंदर वचन भरत नाट्यमंदिरात लिहिले व वाचले आणि पटलंसुद्धा. कारण म्हणजे वेगवेगळ्या अभिरुचीच्या लोकांचं नाटक हेच एकमेव आनंद निधान असतं

६४ कला आणि १४ विद्या यांचा समन्वय असणारं नाटक हे मुख्यत्वेकडून रंगमंचावर आविष्कृत होतं ते आपल्या नटांच्या अभिनयातून, पण नट जरी नाटक सादर करत असेल तरी त्यासाठी पडद्यामागचे अनेक कलाकार प्रचंड मेहनत करून ते उभं करायला खूप भक्कम मदत करतात.

नाटकाला पंचमवेद असं म्हटलं जातं. खुद्द ब्रम्हदेवानं ऋग्वेदातून कथा व शब्द, यजुर्वेदातून अभिनय व प्रॉपर्टी, सामवेदातून संगीतज्ञान आणि अथर्ववेदातून रस घेऊन हा पाचवा वेद निर्माण केला आहे म्हणून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नटराज ही नाट्यकलेची आद्य देवता आहे. म्हणून नाटकाच्या सुरुवातीला नटराजपूजन केले जाते.

नाटक ही आभासी कला आहे हा make beliverचा खेळ आहे. जे नाही ते आहे मानणे. त्यातून मानवी भावनांचे प्रकटीकरण होत असते.  नाटकातून विविध संवेदनाची अनुभूती घेता येते. आपण दृक् संवेदनेने - दृश्याचा आस्वाद घेतो. श्रवण संवेदनेने गीत संगीताचा, शब्दांचा आस्वाद घेतो. पात्रांच्या हालचालीतून स्पर्श-रूप संवेदनाचा दुरूनसुद्धा आस्वाद घेतो. गंध संवेदनाचा अनुभव इथे साक्षात समोर येतो. अशाप्रकारे शब्द्स्पर्श रस-रूप-गंध या पंचवेदांचा एकत्रित अनुभव नाटकाला प्रेक्षकांचे आनंद निधान बनवतो. कारण प्रेक्षक त्यातल्या भावभावनांची एकरूप होऊन जातो.

कल्पना विश्वात रममाण होणं, हा तर मानवी स्वभाव आहे. बालपणीचा तर हा आवडीचा छंद असतो.

लहानपणी “बाहुला-बाहुलीचं लग्न” हा अगदी मुलांचा आवडीचा प्रयोग असे, त्यासाठी अगदी साधी बाहुलीसुद्धा छान सजवली जाई, मुलीचे आई-बाबा मुलाचे आई-बाबा, वरपक्ष-वधूपक्ष त्यातली भांडणे हे सगळं मुलं यथासांग सकारात असत. अगदी त्यातल्या बारीकसारीक तपशीलासकट. कुठून आलं हे सगळं? हे त्यांना कुणी शिकवलं नाही ना, पण हे येतं ते आंतरिक उर्मीनं, निरीक्षणातून या सगळ्या गोष्टी केल्या जातात.

बाहुलीचं हे लग्न म्हणजे छान छान कपडे घालणं, सजणं भोजन, वरात असं सगळं काही त्यातून दाखवलं जात, यातही संवाद असतातच ते खटकेबाज कसे होतील हे त्यातल्या जरा मोठ्या वयाचा मुलगा-मुलगी सांगे व बाकीचे ऐकत. बोलायचे हातवारे कसे करायचे? कोणत्या शब्दांवर जोर द्यायचा? हे त्या त्या पात्राकडून पुन्हा पुन्हा करून घेतलं घेतले जाई. नाटक केले तर पडदे हवेत ते पण जुन्या चादरी, आईच्या साड्या यांचा उपयोग करून तात्पुरते उभे केले जात आणि मग असं हे नाटक रंगत असे निखळ आनंदासाठीच फक्त हे खेळ होते.

पूर्वी आजीची गोष्ट हा रात्री झोपताना होणारा मुलांचा आवडता कार्यक्रम, आजी छान छान गोष्टी सांगायची, मऊ मऊ गोधडी अंगावर घेऊन आजीची ही गोष्ट ऐकताना मुलं रंगून जायची आणि शब्दोच्चार विशिष्ट हेल-लकबी, हातवारे-चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्यांमुळे त्या गोष्टी मस्त रंगायच्या धमाल यायची.

आता काळ बदलला असला तरीही आजही मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात. अभिनय करायला एखादं पात्र भूमिका स्वतः रंगवायला आवडते. शाळेच्या स्नेहसंमेलनात, गणेशोत्सवात अशी संधी मिळतेही. हल्ली मोठ्यांच्या नाटकाप्रमाणे बालनाट्यही सादर होत आहेत. विविध विषयांवर ही नाटके लिहिलेली असतात.

नाट्यनिर्मितीची प्रक्रिया

१)   नाट्यलेखन: प्रथम योग्य घटना व प्रसंगाची निवड केली जाते. त्या विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करून उपप्रसंगाची सुयोग्य गुंफण केली जाते. उत्कृष्ट संवादांनी ते नाट्य फुलवले जाते.

नटांनी अभिनयाच्या माध्यमातून ते संवाद यशस्वीरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरंभ, मध्य आणि शेवट यांची उत्तम सांगड घातली जाते.

२)  दिग्दर्शन: लेखक-दिग्दर्शक-निर्माता एकत्र बसून नाट्यवाचन करतात. त्यावर चर्चा होते. गरजेनुसार फेरफार केले जातात. नंतर दिग्दर्शक पात्रांची निवड करतो. सुयोग्य हालचालीसह त्यांनी त्यांची भूमिका कशी करावी यांची कल्पना देतो.

३)  नेपथ्य: दिग्दर्शक नेपथ्याकाराला आपली कथा/कल्पना सांगून त्याच्याशी चर्चा करतो. नेपथ्याचा आराखडा तयार केला जातो व त्यानुरूप नेपथ्यरचना केली जाते.

४)  रंगभूषा: रंगभूषाकार प्रत्येक पात्र साकार होण्यासाठी त्याला योग्य प्रकारे रंगभूषा निश्चित करतो. रंगभूषेसाठी फाउंडेशन, आयब्रो पेन्सिल, रूज, मेक- अप, पावडर, लीप ग्लॉस, हेअर डाय स्टीक, हेअर व्हाईटनर, क्रेप हेअर, दाढी मिशांसाठी स्पिरीट गम असते.

५)  वेशभूषा: वेशभूषाकार त्या त्या पात्रानुरूप योग्य वेळ ठरवतो, त्याचाही आराखडा तयार करतो आणि त्यानुसार वेशभूषा तयार करतो.

६)  प्रकाशयोजना: प्रकाशयोजनाकार नाटकातील भावना कोणत्या पात्रावर स्पॉट (द्यायचा) – फोकस करायचा, कोणता वापरायचा हे ठरवतो. प्रकाशयोजनेची |(नेमकी|) संकल्पना तयार करतो आणि मग त्या आराखड्यानुसार ती अमलात आणतो.

७)  संगीत संयोजन: योग्य प्रसंगी योग्य प्रकारे भावाभिव्यक्ती होईल अशा प्रकारचे संगीत संयोजक करणे हे संगीत संयोजकाचे काम असते. तो कधी विशिष्ट वाद्य संगीताचा वापर करतो तर कधी शास्त्रीय संगीताचा – कधी गायकाच्या विशिष्ट सुराचा वापर करतो. कधी कधी नैसर्गिक ध्वनी वा नादाचाही चपखल वापर केला जातो. नाटकाला अधिकाधिक आशयघन बनवण्यासाठी याची आवश्यकता असते.

८)  अभिनय: नट मंडळी आपापली भूमिका समजून घेऊन ती साकार करतात. नाटकाच्या अंतरंगात शिरून एकमेकांच्या सहकार्याने नाटकाला अत्युच्य पातळीवर नेऊन ठेवतात.

        अशा सर्वांच्या सहकार्यातून उत्कृष्ट नाटककृती रसिकांना रिझवण्यास सज्ज होते. रंगमंचावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या नटांना रसिकांची भरभरून दाद मिळते. पण बॅक स्टेज सांभाळणारे आर्टिस्ट पडद्याआड राहून फार मोलाची कामगिरी चोख पार पाडतात. वेळच्यावेळी सेट लावणे, काही क्षणात सेट बदलणे, ठरलेल्या वेळी संगीत देणे, जरुरीप्रमाणे हालचाली करणे हे सगळे बॅक स्टेजवालेच करतात.

नाटकाच्या तालमी होतात. entryचा बारकाईने विचार होतो. प्रत्येक हालचाल प्रत्येक .... तोलून मापून निश्चित केला जातो आणि मग नाटक पूर्णत्वाला जाते. रंगीत तालीम होते. त्यासाठी या क्षेत्रातील नामावंताना पाचारण केले जाते. त्रुटी शोधून त्या दूर केल्या जातात आणि मग नाट्यगृहात जाहिराती लावतात. नाट्यप्रयोग लावले जातात.

नटराजपूजन होते, रंगमंचाच्या मखमली पडद्याला अर्पण केलेला हार, नारळ, त्याचे पूजन उदबत्तीचा सुवास धूप फिरवणे यातून सुरेख वातावरण निर्मिती होते. घंटानाद होतो. आणि तिसऱ्या घंटेनंतर पडदा उघडतो. सगळेजण नाटकमय होतात. एका वेगळ्याच विश्वात जातात. नाटक सुरू  होते. एका मागून एक प्रवेश होतात. दुसरा अंकही मध्यातरानंतर सुरू होतो आणि तो संपतो तेव्हा मायबाप प्रेक्षकांना वंदन करून सगळे कलाकार कृतज्ञता व्यक्त करतात. पडदा पडतो आणि पूर्ततेचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकते. 

आता तुम्ही म्हणाल आम्हाला काही आमचा मुलगा/मुलगी अभिनेता/अभिनेत्री व्हायला नकोत.

तर मी सांगेन हाच गैरसमज दूर करू या. संपन्न आणि सुसंस्करीत व्यक्तिमत्वासाठी नाटक कसे मदत करते ते बघू या पुढील भागात. 

मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न बनवायचं काम नाटक करतं, कस? वाचा खालील लिंकवर 

लहान मुलांनी नाटक का पाहावं?

-मनीषा बर्वे

[email protected]