मित्रांनो,

मी तुम्हाला सांगितलं होतं की, कोणताही विषय आपल्याला पुस्तक वाचून, अभ्यास करून शिकता येतो. पण संगीत मात्र गुरूंच्या समोर बसूनच शिकावं लागतं. कारण त्यातलं पुस्तकी ज्ञान आपल्याजवळ कितीही असलं, तरी त्याचं प्रात्यक्षिक मात्र गुरूंच्या मुखातून ऐकून शिकावं लागतं. म्हणूनच संगीताला गुरूमुखी विद्या  म्हणतात. गुरूंच्या सहवासात राहून, गुरुकूल पद्धतीनं संगीत शिकण्याचे दिवस आता राहिले नसले, तरी काही तास त्यांच्यासमोर बसून आपल्याला शिकावं लागतंच. शिकलेल्या गोष्टींवर स्वत:चा विचार व्हायला लागतो. समजलेल्या गोष्टींचा नियमित रियाज करावा लागतो. शिकण्यात आणि रियाजात सातत्य असावं लागत.

तुम्हाला कोणतंही वाद्य वाजवायला शिकायचं असलं ना, तरी सुरुवातीला एक-दोन वर्ष गायन शिकावं लागतं, सुरांची ओळख करून घ्यावी लागते. कारण मनात जे सूर, त्यांचे आवाज पक्के होतात ना, तेच त्या त्या वाद्यावर वाजवण्याचं तंत्र शिकायचं असतं. मनांतलं गाणं वाद्यावर वाजवायचं असतं.

मी असंही म्हंटलं होतं की,  शाळेत असल्यापासून संगीत शिकायला सुरुवात केलीत, म्हणजे दहावी होईपर्यंत तालासुरांचा बेस पक्का होतो आणि पुढील उच्च (ॲडव्हान्स) शिक्षण घेण्याची पात्रता निर्माण होते.

जर तुम्ही शिकताशिकता, गांधर्व महाविद्यालयाच्या तीन परीक्षांचा सखोल अभ्यास केलात (परीक्षा देणं किंवा न देणं तुमच्या मनावर आहे.) तर तुमचा बेसिक कोर्स पूर्ण होतो. तुम्हाला निरनिराळे राग, ताल, गीतप्रकार यांची माहिती होते. आलाप तानांमुळे गायनासाठी गळा तयार होऊ लागतो किंवा एखाद्या वाद्य वादनात हात तयार होतो.

तीन चार वर्षं शिकल्यानंतर, जेव्हा तालासुरांची प्राथमिक ओळख होते, तेव्हा सुरू करायला हवं संगीताचं निरीक्षण. म्हणजे काय? तर आपण जे क्लासमध्ये शिकलो ते संगीत आणि बाहेर अवतीभवती सतत कानावर पडतं ते विविध प्रकारचं संगीत यांचा परस्पर संबंध आहे का? की या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत?

मी काही उदाहरणं देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय ते.

शाळेत गणितात १०० पैकी १०० मार्कं मिळवल्यावरही, प्रत्यक्ष व्यवहारातलं गणित आपल्याला जमायला हवं ना. असं पाहा, ६० रू. किलो भावाची भाजी, पाव किलो घेतली, तर ५० ची नोट दिल्यावर किती पैसे परत येतील हे गणित आपल्याला पटकन तोंडी यायलाच हवं ना?

आपल्या घरी रंगकाम करणारा कारागीर आला की, तो सुद्धा घरातील मापं घेऊन, किती स्क्वेअर फूट रंगकामाला किती खर्च येईल, हे पटकन हिशोब करून सांगतो. म्हणजे काय तर शाळेत शिकलेल्या गणितातल्या गोष्टी आपल्याला पुढे रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतात. तसंच आहे हे. क्लासमध्ये सुरुवातीच्या काळात माहीत झालेल्या १२ स्वरांमधूनच, जगातील कोणत्याही प्रकारचं संगीत तयार होत असतं. स्वरांचे आवाज ओळखीचे झाले, की त्यांची सा रे ग म ही लेबलं गळून पडतात आणि ते आवाज ...स्वर ...वापरून तयार झालेल्या गाण्यांशी आपला परिचय होतो. आपल्या आवडीचा सिनेमातला नट, कोणत्याही रूपात....अगदी साडी नेसून जरी आला तरी आपल्याला ओळखू येतो, तसेच हे स्वरांचे आवाज एकदा का मनात ठसले की, ते कोणत्या भाषेच्या गाण्यातून आपल्या कानावर पडले की ओळखतां आले पाहिजेत. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहावा लागतो. कान सतत उघडे ठेवून गाणी ऐकावी लागतात. मग हळुहळू लक्षात येऊ लागतं, की 'जन गण मन'ची सुरुवात असो किंवा 'एक दोन तीन...' हे लोकप्रिय गाणं असो, त्याचे सुरुवातीचे स्वर, सा रे ग... असे आहेत. संगीताच्या भाषेत यालाच नोटेशन ओळखणं म्हणतात. हे स्वरज्ञान काही आपोआप ठराविक वर्षांनंतर किंवा ठराविक परीक्षा दिल्यानंतर येत नाही. त्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

जी गोष्ट स्वरांची तीच तालांची पण. आपण जे निरनिराळे ताल शिकतो, त्यांचे शास्त्रीय वर्णन करतो. मात्रा, खंड, सम, काल, टाळ्या इ. नियम पाठ करतो, परीक्षेत ते सांगून मार्कही मिळवतो. पण प्रत्यक्षात त्या टाळ्यांमुळे तयार झालेला रिदम, आपल्याला जाणवायला हवा. म्हणजे गरबा खेळताना वाजतो तो ६ मात्रांचा ताल आणि सिनेमात समूह नृत्यात बेफाम होऊन नाचताना ऐकू येतो, तो ४ मात्रांचा सोपा ताल, हे निदान जाणवायला लागतं.

कोणतंही गाणं ऐकताना हा ताल ओळखण्याचा प्रयत्न करा.

कोणतंही न शिकलेलं, नवीन गाणं म्हणून पाहताना, त्याचा ताल ओळखण्याचा प्रयत्न करा. त्यांतील सा...षड्ज ओळखा. त्या 'सा'पासून कोणत्या स्वरावर गाणं सुरू झालंय ते नीट समजून घ्या. प्रत्येक अंतरा सुरू करतानाही, हा सुरुवातीचा स्वर नीट समजून घेऊन म्हणा. त्या गीताचे शब्द स्वत: लिहून काढा. ते समोर ठेवून दोन तीन वेळा ते गाणं फक्त ऐका. त्याच्याबरोबर कधीही म्हणून प्रॅक्टिस करू नका. कारण त्या गायकाचा मूळचा स्वर हा तुमच्या आवाजाच्या पट्टीपेक्षा उंच असू शकतो. एखादा ड्रेस जसा कितीही आवडला, तरी तो आपल्या मापाचा असला तरच उपयोगी असतो, तसंच कोणतंही गाणं आपल्या आवाजाला योग्य अशा पट्टीतच गायला हवं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

आपण आपल्या मनानं बसवलेलं गाणं, मोबाईलमध्ये रेकाॅर्ड करून स्वत: ऐका. आपल्या चुका आपल्यालाच स्पष्टपणे दिसून येतील. कारण हे रेकाॅर्डिंग म्हणजे आपल्याच गाण्याला आरशात पाहण्यासारखं असतं.

आता तुमची स्वरांची जाण किती प्रगत झाली आहे, हे टेस्ट करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला देते.

खाली दिलेले स्वर गाऊन पाहा किंवा वाजवून पाहा आणि जी चाल तयार होईल, त्या चालीवर आपण नेहमी कोणतं गाणं म्हणतो, ते मला सांगा. पाहू या तुम्ही किती विचार करायला लागलात ते.

सा रे सा म ग...। सा रे सा प म ...। सा सां ध म ग रे ...। नी् ध म प म...।

तुम्हाला जे काही सांगावसं वाटेल ते मला या नंबर वर whatsapp करा. 9869170136

मी वाट पाहतेय तुमच्या उत्तराची...!

गीतकार-संगीतकार मधुवंती पेठे यांची मुलांसाठी लिहिलेली ही लेखमाला नक्की वाचा. 

संगीत परीक्षा (उत्तरार्ध)

- मधुवंती पेठे 

[email protected]