प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये जशा काही सवयी सारख्या असतात तशा काही गरजाही सारख्या असतात. जसे की, अन्न, वस्त्र आणि निवारा. आपल्या सर्वांना अगदी लहान असल्यापासून एक अन्नसाखळी माहीत असते. पण प्रत्येक परिसंस्थेप्रमाणे (ECOSYSTEM) ती बदलत जाते. म्हणजेच जंगलातली वेगळी, किनारपट्टीची वेगळी आणि हिमालयातली पण वेगळीच. आपल्याला सरधोपटपणे गवत, ससा, कोल्हा / तरस, बिबट्या आणि सर्वांत शेवटी वाघ अशी चढत्या क्रमाची साखळी माहितीच आहे. पण या मुख्य साखळीमध्येसुद्धा अजून बरेच घटक मोडतात. आपण जंगल या परिसंस्थेचा विचार करू या. एखाद्या परिपूर्ण जंगलामध्ये गवती कुरणे, पाणथळीची जागा किंवा नदीपात्र, घाटमाथा किंवा एखादा खडकाळ भाग असतोच. या सर्व गोष्टी एकमेकांशी कशा संबंधित आहेत ते आपण पाहू.

गवती कुरणांच्या भागात अनेक प्रकारची गवतं, तसेच पसरलेल्या वेली आणि खुरटी झुडपं असतात. त्यातल्या काही विशिष्ट प्रकारच्या गवतांना फुले येतात किंवा तुरे येतात. काही झुडपांना फुलपाखरांना आकर्षित करणारी सुंदर फुलं येतात. या अशा गवत आणि झुडपांवर अनेक तृणभक्षी लहान कीटक, लहान मोठे चतुर, नाकतोडे, भुंगे, अळ्या, कोळी, फुलपाखरे, मुंगळे आणि मुंग्या अवलंबून असतात. या सगळ्यावर ताव मारायला या अधिवासात असणारे पक्षी असतात. माळरानावर काही जातीचेच पक्षी बघायला मिळतात. जसे की चंडोल (LARK), वटवट्या (PRINIA), खाटिक (SHRIKE), चीरक (ROBIN), सुगरण (WEAVER), तीरचिमणी (PIPIT), भारीट (BUNTING), धाविक (COURSER), हुदहुद (HOOPOE),  गप्पीदास (BUSHCHAT), कोतवाल (DRONGO). माळरानावर मुख्यत्वे आढळणारा पक्षी म्हणजे आपला माळढोक (GREAT INDIAN BUSTARD). आता आढळणारा हा शब्द वापरणं चुकीचं ठरेल कदाचित. कुरणांमध्ये होणारी चराई, अनिर्बंध गवत कापणी, (HABITAT LOSS) मानवी हस्तक्षेप आणि अवैध शिकारीमुळे माळढोक पक्षी महाराष्ट्रामधून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा पक्षी विविध कीटक खातो, पण याचं मुख्य खाद्य म्हणजे नाकतोडे. त्यामुळे कल्पना करून बघा जर हा पक्षी नाहीसा झाला तर शेतकऱ्यांसाठी किती मोठी डोकेदुखी होऊन बसेल, कारण मोठ्या प्रमाणात जर नाकतोडे वाढले तर त्यांच्या धाडींना आळा कोण घालणार?

किटकांवर पोट भरणारे फक्त पक्षीच नसतात तर सरडे, सापसुरळ्या, मुंगुस यासारखे सरपटणारे प्राणी सुद्धा असतात. दुसरीकडे गवतावर तसेच त्यांच्या मुळांवर / कंदांवर पोट भरणारे उंदीर, ससे हे प्राणी असतातच की. पावसाळ्यात बेडूकही असतात. आता या उंदरांवर वचक ठेवायला साप येतात आणि ससे मटकवायला कोल्हे, लांडगे, रानमांजरं असतात. मुंगुस आपलं आवडतं खाद्य... म्हणजे साप खायला तयारच असतात. फक्त सापच नव्हे तर किडे, खेकडे, पाली-सरडे, लहान पक्ष्यांची पिल्ले, अंडी आणि उंदीर पण फस्त करतात. आता या साप, मुंगुस याप्रजातीला मोठ्या शिकारी पक्ष्यांपासून धोका असतो. अशा कुरणांमध्ये सहसा पिंगळे (OWLET) आणि घुबडे (OWL) आढळतात. घुबडं प्रामुख्याने साप, उंदीर, बेडूक आणि छोटे पक्षी यांना लक्ष्य करतात. तर गरुडासारखे मोठे शिकारी पक्षी ससे, मुंगसाची पिल्ले, उंदीर, साप, सरडे, खार, मासे, लहान पक्षी यावर डल्ला मारतात. केवळ गरुडच नाही तर ससाणा (FALCON), शिक्रा (SHIKRA), घार (KITE), भोवत्या (HARRIER), खरुची (KESTREL) याचं सर्वांचं हे खाद्य आहे. आता या मोठ्या शिकारी पक्ष्यांना आपली शिकार होण्याची तशी फारशी धास्ती नसते. त्यांना शिकार मुख्यत्वे लहान असताना इतर पक्षी करतात किंवा यांची अंडी घोरपडीसारख्या प्राण्याकडून पण खाल्ली जाऊ शकतात. त्यांना धास्ती असते ती फक्त पंखात बळ येईपर्यंत. ही साखळी इथे संपत नाही. जंगलामध्ये एखादा प्राणी मरण पावला किंवा वाघ/ बिबट्यानी मारला की हे आधी मुख्य ऐवज खाऊन टाकतात. त्यांचं झालं की मग कोल्हा, खोकड, तरस उरलं-सुरलं खाऊन जातात. मग सगळ्यात शेवटी निसर्गाचे सफाई कामगार म्हणजेच गिधाडं येऊन सगळं साफ करून टाकतात. जर काही उरलेलं असेलंच तर ते मुंग्या आणि इतर सरपटणारे जीव यांच्या पदरी पडतं. बाकी सर्व मातीत मिसळून जातं. काहीही उरत नाही. पक्ष्यांच्या विष्ठेतून ते सगळं परत मातीत जातं. त्यात जर बिया असतील आणि जर पर्यावरणाची अनुकूल साथ लाभली तर त्यांचं रोपात रूपांतर होतं. नाहीतर मातीत मिसळून खत तयार होतं. हीच पोषकतत्व गवताला मिळतात आणि अधिवास (HABITAT) टिकून राहतो. निसर्गातले हे सगळे घटक आपापली कामं नेमून दिल्याप्रमाणे करत असतात.

ना कधी वाघाला गवताची चव घ्यावीशी वाटते, ना कधी सांबरांना मांस खाऊन बघावेसे वाटते. निसर्गात ढवळाढवळ करण्याची हौस फक्त आपल्याला म्हणजे मनुष्यालाच आहे, पण ना कधी आपण उष्णतेनी गरम झालेल्या मातीत पाऊस बरसल्यानंतरचा सुवास निर्माण करू शकलो, ना कधी रात्री फुलणाऱ्या रातराणीचा सुगंध निर्माण करू शकलो. मग ही अशी हौस कशासाठी तर आपणच ठेवलेल्या एका नावाचं सार्थक करण्यासाठी आणि ते गोंडस नाव आहे .. विकास (अंध)

वानरांचे भावविश्व वाचा अमोल बापट यांच्या शब्दात 

वानरांचे भावविश्व

-अमोल बापट 

[email protected]