शालेय विद्यार्थ्यांना योगशिक्षण देणे गरजेचे आहे हा विचार आता शिक्षणक्षेत्रात सर्व स्तरांवर मान्य झाला आहे. या शिक्षणाची व्याप्ती किती व कुठवर असावी, हे शिक्षण कशा प्रकारे दिले जावे याबाबत विविध चर्चा, अभ्यास चालू आहे. साधारणताः योगासने व सोपे प्राणायाम शिकवले जावेत यावर कुणाचे दुमत नसते. पण ‘मुलांना ध्यान शिकवावे का’ या विचाराबाबत मात्र बहुतेक तज्ञांचा तत्काळ आणि ठाम नकार असतो.

एकीकडे विद्यार्थांच्या वर्तनाविषयीच्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत आणि त्यावर आधुनिक मानसशास्त्राला तितकेसे प्रभावी आणि ठोस उपाय मिळालेले दिसत नाहीत . त्याचवेळी प्रौढांच्या अशाच प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र ‘ध्यान’ ही योगशास्त्रातील प्रक्रिया अगदी हमखास उपचार म्हणून वापरली जाते आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करता मुलांनाही, त्यांना झेपेल, रुचेल अशा प्रकारे ध्यान शिकवले जायला हवे.

भारताबाहेच्या  देशांत या बाबतीत बरेच प्रयत्न झाले आहेत आणि ते यशस्वीही ठरले आहेत. महर्षी महेश योगिंनी विद्यार्थ्यांना ध्यान शिकवले आणि हा प्रयत्न अमेरिकेत गौरवास्पद ठरला. विद्यार्थ्यांना हे ध्यान त्यांची ज्ञानग्रहणाची  क्षमता वाढविण्यासाठी लाभदायक ठरले. अर्थातच हे लाभ शास्त्रोक्त पद्धतीने झालेल्या अनेक संशोधनातून मोजण्यातही आले.

या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष पाहिले तर आपल्याला चकित करून सोडणारे आहेत. त्यातील काही निष्कर्ष असे आहेत ...

ध्यानाच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांची एकाग्रता, सर्जनशीलता, ज्ञानग्रहणक्षमता वाढते.मुलांच्या मनावरील ताण कमी होतात.परीक्षेतील गुण वाढले.सर्वांगीण व्यक्तिमत्व खुलण्यास, बहरण्यास मदत झाली.ध्यान करणाऱ्या मुलांचे भावनिक संतुलन हे, ध्यान न करणाऱ्या मुलांच्या तुलनेने अधिक चांगले आहे असे लक्षात आले.आपापसातील तणाव, भांडणे कमी झाल्याचे आढळले.त्यांची मानसिक चंचलता कमी झाली.

या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे, या मुलांचे शिक्षण हे पोटार्थी न राहता, आनंददायी झाले.

जागतिक स्तरावर, शिक्षण देताना प्रामुख्याने ज्ञानसंपादन, कौशल्य वृद्धी, आत्मभान आणि सहिष्णुता या चार उद्देशांवर भर दिला जातो. यातील ज्ञानसंपादन आणि कौशल्य वृद्धी या गोष्टी थेट नोकरीधंद्यासाठी आवश्यक असल्याने आपोआपच  शिक्षणपद्धती त्यावर केंद्रित होते. पण केवळ माहिती देऊन किंवा प्रत्यक्ष कृती शिकवून आत्मभान आणि सहिष्णुता विकसित होत नाही. ध्यानाच्या अभ्यासातून सजगता, जाणिवेची सूक्ष्मता वाढते, आणि त्यामुळे आंतरिक मुल्यांची जाणिव, नैतिक विकास या गोष्टीत सुधारणा होते.हे सगळं नक्की कसं घडतं, ते थोडक्यात समजावून घेता येईल. आपल्या मेंदूचे वैचारिक मेंदू आणि भावनिक मेंदू असे दोन मुख्य भाग असतात. लहान वयात मनात भावनांची तीव्रता हि जास्त असते. त्यामुळे भावनिक मेंदू हा वैचारिक मेंदूवर वर्चस्व गाजवतो, त्याला काम करू देत नाही. या तीव्र भावनांमुळे, रागाच्या भरात, मारामाऱ्या आणि भांडणं तर होतातच . पण आततायी कृतीतून दुसऱ्याचा खून करणं, किंवा आत्महत्या करून स्वतःलाच संपवण अशा थरापर्यंत गोष्टी घडतात. ध्यानाने वैचारिक मेंदू अधिक सक्रीय होतो आणि तो भावनिक मेंदूला आवर घालतो हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

आत्मभान आणि सहिष्णुता ज्यामुळे वाढेल, असे काही बदल ध्यानामुळे घडतात. आत्मभान वाढण्यासाठी भावनिक संतुलन, समतोल हा गरजेचा असतो. मुलांनी ध्यानाचा अभ्यास केल्यामुळे, राग, चिंता, नैराश्य अशा विघातक भावनांची तीव्रता तर कमी होतेच, पण, मुलं या भावनांमध्ये जास्त काळ अडकून पडत नाहीत. या विघातक भावनांची जागा, कृतज्ञता, समाधान, आनंद अशा विधायक भावना घेतात.

सहिष्णुतेच्याबाबतीत बोलायचं झालं तर, इतरांच्या भावना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. ती क्षमता, ध्यानावस्थेत मेंदूचा फंक्शनल एम आर आय काढून मोजण्यात आली. दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी, जाणण्यासाठी आवश्यक असलेला मेंदूतला विशिष्ठ भाग त्यामध्ये अधिक कार्यरत झालेला आढळला.

मुलांमध्ये खोटं बोलणं,जिद्द करून मारायला धावणं, व्यसनाधीन होणं असे अवगुण आढळले तर त्याला “कंडक्ट डीसऑर्डर” असे म्हटले जाते. सध्या या आजाराचे प्रमाण भारतात ९.२ टक्के इतके असून ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. “ ध्यान हे मनाच्या विकासाचे एक साधन आहे ” हा योगशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो. ध्यानाचे विविध आणि सोपे असे प्रकार मुलांना शिकवून त्यांना या सिद्धांताचा प्रत्यक्ष अनुभव दिला तर  मुलांमधले अनेक मानसिक आणि मनोशारीरिक आजार बरे करण्यासाठी  निश्चित उपयोग होईल.

 

-मनोज पटवर्धन

[email protected]