संदेश 

दिंनाक: 26 Oct 2017 14:12:25


सकाळचे नऊ वाजले होते. गरम वाटू लागलं होतं. बाबा कामाला गेले होते. आई किचनमध्ये होती. यश आणि अनुष्का अजूनही अंथरुणावर लोळत होते. त्यांना उठायची इच्छा नव्हती. एकमेकांच्या खोड्या काढत ते पडले होते. अचानक यशला काहीतरी आठवलं. त्याने पडल्यापडल्या शिट्टी वाजवली अन् तो उठला. कॉम्प्युटरकडे पळाला, त्याच्यामागे अनू.

उन्हाळ्याची सुट्टी होती. यश आणि अनुष्का दोघेही सकाळी उठले की कॉम्प्यूटर सुरू करत आणि गेम्स खेळत बसत. आई त्यांच्याशी काही बोलली तरी त्यांच्या डोक्यामध्ये काही घुसत नसे, कारण त्यांचं डोकं गेम्समध्ये घुसलेलं असायचं, जर आई खूपच ओरडली तर ते ओ देत असत. पण मग त्यांची गेममधील कार रस्ता सोडून फुटपाथवर चढलेली असायची किंवा एखाद्या झाडाला धडकलेली असायची. अशा वेळी त्यांना आईचा राग यायचा. ते म्हणायचे, “काय गं आई, सारखी डिस्टर्ब करतेस.”

खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त राग आईला यायचा. पण काय करावं हे तिला कळत नव्हतं.

यश पाचवीत गेला आणि अनू सातवीत गेली होती. आईने सांगितलेलं न कळण्याइतके ते लहान नव्हते. पण आईच ऐकतंय कोण? खेळण्यात आणि भांडण्यात जी मजा असते ती शहाण्यासारखं ऐकण्यात नाही असं त्यांचं वागणं होतं.

आईने दोघांना रोज दोन पानं डिक्शनरी वाचायला सांगितली होती. पण त्यांनी अजून काही वाचलं नव्हतं, आईने एकदा विचारलं तर यश म्हणाला, “या उकाड्यामुळे काही सुचत नाही.” आईचं वाक्य त्याने तिलाच ऐकवलं होतं.

मग एके दिवशी सकाळी -

दहा वाजले तरी दोघे लोळत पडले होते. वीज गेली. त्यामुळे पंखा थांबला, गरम होऊ लागलं. दोघेही उठले. कॉम्प्युटरकडे गेले. मॉनिटरवर एक कागद सेलोटेपने चिकटवलेला होता. त्यावर काही लिहिलेलं होतं.

यशने जोरात कागद ओढला. असा कागद लावलेला त्याला आवडलं नव्हतं, दोघांनी तो पहिला. त्यावर आईने स्केचपेनने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं - चांगली मुलं उठल्यावर दात घासतात, अंघोळ करतात, नाश्ता करतात आणि नंतर खेळतात. तुम्ही?

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, अनूने तोंडात बोट घातलं, यशने शिट्टी वाजवली.

मग जादूच झाली. अनू दात घासायला गेली. यश तिच्यामागे, त्यानेही दात घासायला सुरुवात केली.

घासता घासता अनुच्या अंगावर पांढरी थुंकी उडवत तो म्हणाला, शहाणी मुलगी! आईमुळे नाही तर लाईट येईपर्यंत काय करणार म्हणून आवरायला लागली.

तरीही अनू रागावली नाही. ती म्हणाली, थुंकी उडतेय. असं करू नये. आवरून घे.

दोघांनी शहाण्यासारखं आवरून घेतलं.

आईने तो कागद लावलाय किंवा त्यावर काय लिहिलंय याबद्दल ते आईशी काही बोलले नाहीत. त्यांनी तो कागद त्यांच्या कपाटात ठेवून दिला. लाईट्स आले आणि ते खेळायला बसले.

संध्याकाळी त्यांनी बाबांना ही गंमत सांगितली. ते नुसते गालात हसले.

दुसर्‍या दिवशी ते उठले तर स्क्रीनला कागद नव्हता. तरीही त्यांनी शहाण्यासारखं आवरायला सुरुवात केली.

ते आवरून आले आणि यशने शिट्टी वाजवली, कारण स्क्रीनला आता एक कागद चिकटवलेला होता. त्यावर काय लिहिलं होतं?- कॉम्प्युटरवर खेळणं ही काही जगातली एकमेव गोष्ट नाही. आमच्या लहानपणी कॉम्पुटर सोडाच, साधा टीव्हीही नव्हता. त्या वेळी आम्ही सुट्टीत काय करत असू?

अनूने तोंडात बोट घातलं व ती विचार करू लागली.

“हं! आयडिया!...” ती आनंदाने म्हणाली व यशच्या कानात तिने गंमत सांगितली.

त्यादिवशी मुलांनी कॉम्प्युटर सुरू केला नाही. टीव्ही लावला नाही. यश चित्र काढायला बसला. अनूने गोष्टींची पुस्तके उघडली. तिचं एक छोटं पुस्तक वाचून संपलं. यशचं एक चित्र काढून झालं. त्याचे चित्र डेंजर झालं होतं. काय काढलंय हे कळायला काही मार्ग नव्हता.

संध्याकाळी अनूने आईला भांडी लावायला मदत केली. किती वेळा खाली पडली व खणखणाट झाला ते तिलाच माहिती, मग किचनमधली फरशी पुसली, कोरडी केलीच नाही.

यशने झाडांना पाणी घातलं. बाथरुममधून निळ्या रंगाच्या छोट्या बादलीतून बाल्कनीमध्ये पाणी नेताना घरभर सांडून ठेवलं.

“अरे, किती पाणी सांडलंयस, ते पुसून घे,” अनू म्हणाली.

“अस्सं? तू आधी फरशी कोरडी कर किचनमधली”, यश तिला म्हणाला.

दोन खेपा झाल्यावर तिसर्‍या वेळेस तो स्वतःच सांडलेल्या पाण्यावरून घसरला. त्याचं टाळकं शेकलं. बादली उडून भिंतीवर आपटली. सगळं पाणी सांडलं, तो त्यामध्ये भिजला.

बादलीच्या आवाजाने आई आणि अनू किचनमधून बाहेर आल्या. आईने पाण्यात लोटांगण घातलेल्या यशला जवळ घेतलं. त्याला काही झालं नव्हतं. पण आईने जवळ घेतल्यावर त्याला बरं वाटलं. कामातून सुटका झाल्यासारखंही वाटलं.

अनू खेळायला बाहेर गेली. यशसुद्धा कपडे बदलून तिच्यामागे गेला.

आईने हॉलमधली फरशी पुसली आणि किचनसुद्धा.

दोघे खेळून घरी आले, तेव्हा ते घामाघूम झाले होते. त्यांच्या तोंडाला कोरड पडली होती. दोघे एकदम फ्रिजकडे गेले, तर फ्रिजच्या दारावर एक कागद लावलेला होता. अनूने तोंडात बोट घातलं. यशने शिट्टी वाजवली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

त्यावर लिहिलं होतं - तुम्ही एकमेकांशी भांडलात तरी चालेल पण तुमचं काम तुम्हीच करा. माझं काम उगाच वाढवून ठेवू नका.

आधी दार कोणी उघडायचं यावर त्यांनी वादावादी केली असती, या वेळी अनू शांतपणे म्हणाली, “तू उघड.”

यश तिला वाकडं दाखवत म्हणाला, “शहाणी मुलगी” असं म्हणत त्याने दार उघडलं तर पाण्याच्या बाटल्यांवर एक कागद होता - बाहेरून आल्या आल्या गार पाणी पिऊ नये.

अनूला हसू आलं. ती म्हणाली, “तू दार उघडलंस म्हणजे हे तुझ्यासाठी लिहिलंय, वेड्या मुलासाठी!”

“हट्ट! मी दार उघडलं एवढंच. हे दोघांसाठी आहे, कळलं ना?”

“तू काय गरम पाणी पितेस की काय?”

दोघांनी थोडा वेळ जाऊन दिला. मग ते पाणी प्यायले. हे कागद लावायची, त्यावर लिहिण्याची कल्पना अर्थातच आईची होती. जरी ती मुलांच्यासमोर करत नव्हती. मुलांनी या लिहिण्याला ‘संदेश’ असं नाव दिलं. त्यांना संदेश आवडू लागले. आई एखादी गोष्ट पूर्वी खूप वेळा सांगायची, तरी उपयोग होत नसे, तेच काम आता मोकळ्या शब्दात होऊ लागलं. मुलं ते लक्षात ठेवू लागली त्याप्रमाणे वागू लागली.

आता आईचे संदेश साध्या शब्दात असायचे, सरळ. ‘भांडलात तरी चालेल’, असे नसायचे. कारण मुलं बदलली होती ना.

एकदा तर तिने वेगळाच संदेश लिहिला.

हे नव्हते आदेश

हे आहे संदेश

तुम्ही बदला स्वतःला

बदलेल अन् देश

संध्याकाळी बाबांना हे कळल्यावर ते चेष्टेने म्हणाले, “यातून तुम्हाला काय संदेश मिळाला? की तुमची आई कविता करू शकते. ऐकायची तयारी ठेवा.”

हे ऐकल्यावर आईने डोळे मोठे केले. त्यामुळे तिची आणखी चेष्टा करायची नाही, हा संदेश बाबांना आपोआप मिळाला.

आई नेहमी नवीन संदेश लिहायची, तिला जुने संदेश पुन्हा लिहिण्याची वेळ कधी आली नाही.

कारण एकदा तिने लिहिलं-

एक मुलगा शिट्टी वाजवतो

एक मुलगी तोंडात बोट घालते

सवय नसे ही मुळी चांगली

मलाही ना ती आवडते

त्यानंतर दोघांच्या त्या सवयी लगेच नाहीत, पण सुटल्या. थोड्या दिवसांनी आई आजारी पडली. आईला काम होत नसे. कामवाल्या बाईच बरीचशी कामं करायच्या. बाबाही खूप काम करायचे. मुलांची मदत तर होतीच. आता आई संदेश लिहीत नव्हती. त्यामुळे मुलांना चुकल्यासारखं वाटायचं.

मुलांना शहाण्यासारखं वागताना बघून बाबांना संदेशाचं महत्त्व जाणवत राहायचं, बरं वाटायचं. पण आता तेही शांत असत. आकाशात नुसत्या जमलेल्या ढगांसारखे. शाळा सुरू झाली होती. पावसाळा सुरू झाला होता. पण अजून पावसाचा पत्ता नव्हता. आकाश मोकळं होत नव्हतं. मुलं पावसाची वाट पाहात होती, भिजण्यासाठी आणि कागदाच्या होड्या सोडण्यासाठी. मातीचा वास घेण्यासाठी. आईला पोटामध्ये काही त्रास होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं.

शाळा सुरू होऊन आठ - दहा दिवस झाले होते. यश आणि अनू शाळेत गेले होते. दोघेही एकाच शाळेत होते. त्यामुळे ते एकाच रिक्षामधून शाळेत जात. त्यांची शाळा सकाळी असे.

शाळा सुटली. ते घरी आले. त्यांनी रिक्षामधल्या मुलांना टाटा केला. यशचं सुदिपबरोबर भांडण झालं होतं तरी त्याला सुद्धा.

त्यांना घेण्यासाठी आत्या उभी होती. त्यांना आश्चर्य वाटलं व आनंद झालं.

“आत्या तू?” अनू म्हणाली.

“हो मी. पण आज मी इथेच राहणार आहे.”

यशला आनंद झाला. तो ‘एहे एहे” करून ओरडला. त्याचं आत्याशी छान जमायचं. ती छान चित्र काढायला शिकवायची, एकापेक्षा एक भन्नाट सिनेमांच्या कथा सांगायची.

ते वर घरामध्ये आले, आई नव्हती.

“आई कुठेय?” यशने विचारलं.

आईला दवाखान्यात नेलंय. तिचं ऑपरेशन आहे. ती दोन दिवस तिथेच राहणार आहे.

“काय?” यश रडवेला झाला.

“अरे, मी आहे ना इथे. आता आपण जेवू या. तुम्ही तुमचा अभ्यास करा. संध्याकाळी आपण तिला भेटायला जाऊ या.”

आईला बरं नाहीये हे मुलांना माहिती होतंच, दवाखान्यात ठेवावं लागेल ही चर्चाही त्यांनी ऐकली होती. पण कधी त्यांना माहिती नव्हतं. जेवण झालं मुलांनी अभ्यास केला, खरं म्हणजे त्यांचं लक्ष पुस्तकात नव्हतंच.

आत्या संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेली. त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. त्यांना वेळ लागला नाही. त्यांनी आवरलं, कपडे बदलले. दवाखान्यात नेण्यासाठी आत्याने एक बॅग भरली होती. अनूने ती घेतली. ते रिक्षाने दवाखान्यात आले. तेव्हा आकाश काळवंडल होतं. आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं होता. भूल पूर्ण उतरली नसल्याने तिला बाहेर आणलं नव्हतं.

यशने बॅग उघडली त्यामधून कागदाची एक गुंडाळी काढली, सरळ केली. तो कागद पाहताच आत्याला कळालं की तो संदेश आहे. तिला संदेशाची गंमत माहिती होती. पण हा कागद मुलांनी कधी तयार केला हे तिला कळल नव्हतं. नर्सेसही नवलाने पाहात राहिल्या. दोघांनी तो कागद पायाच्या बाजूला केस पेपरच्या आधाराने उभा केला.

थोडा वेळ गेला. आईला बाहेर आणलं गेलं. कॉटवर ठेवण्यापूर्वीच तिने मुलांना पाहिलं. तिला बरं वाटलं. तिला अजूनही वेदना होत होत्या. तिने संदेश पहिला नाही. आडवं झाल्यावर तर तो तिला दिसणारही नव्हतं. तिला कॉटवर ठेवण्यात आला.

मग यशने तो कागद तिच्या डोळ्यांसमोर धरला. तिने तो पाहिला मात्र!.. तिच्या चेहर्‍यावर हसू आलं. तिची वेदना कुठे लांब पळाली. कारण त्या कागदावर मुलांनी लिहिलेला संदेश होता.

पहिला संदेश... त्यांच्या आईसाठी! तो असा होता- ‘लवकर बरी हो आणि घरी ये. तुझ्या संदेशामुळे आम्ही बदललो व बदलत आहोत. आम्हाला तुझे आणखी संदेश हवे आहेत.’

 ते वाचल्यावर तिला बरं वाटलं. तिने डोळे मिटून घेतले व ती न बोलता शांतपणे पडून राहिली.

बाबांनी दोघांना जवळ घेतलं. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, घरी जाताना त्यांना काही खाऊ घ्यावा असा विचार आत्या करत राहिली. बाहेर पाऊस येऊ लागला. पहिला पाऊस.

ते मोठे हॉस्पिटल होते. आईला दुसर्‍या मजल्यावर ठेवलं होतं. दोघेही हळूच खाली पळाले. पाऊस जोरात होता. दोघेही पावसात गेले पण क्षणभरच. खूप न भिजता ते मागे फिरले. आडोशाला थांबून ते पडणार्‍या पावसाकडे पहात उभे राहिले. पावसाचे पाणी साठून, वाटा काढून इकडे तिकडे पळत होतं.

 

- ईशान पुणेकर

[email protected]