हातचलाखी

दिंनाक: 25 Oct 2017 15:17:03


स्नेह, तुझा सगळ्यात आवडता वार कोणता? स्कूल बसमध्ये ओंकारने स्नेहला विचारले.

अर्थात शनिवार. तुला, मला, आपल्या वर्गातल्या सगळ्यांना आणि सोसायटीतल्या मित्रांनाही, शनिवारच आवडतो. काय मज्जा असते ना आपली शनिवारी, होमवर्कचे टेन्शन नाही, आई-बाबांची कटकट नाही, शिवाय दुसर्‍या दिवशी रविवारमुळे लवकर झोपून लवकर उठायची कटकट नाही. रात्री कितीही वेळ खेळत बसलो, तरी आई-बाबांचा ओरडा खावा लागत नाही. रविवार पण बरा असतो रे, पण संध्याकाळपर्यंतच  एकदा का संध्याकाळ झाली की, परत होमवर्क, बॅग भरा, सॉक्स शोधा अशी कटकट सुरू होते. त्यामुळे रविवार शंभर टक्के आवडत नाही. त्या सोमवारचा तर विषयच काढू नकोस.

स्नेहचे ऐकून ओंकारला पण त्याचे शनिवार, रविवार, सोमवार आठवून आपली आणि स्नेहची अवस्था अगदीच सेम आहे हे पटले, आधार वाटला आणि हसू पण आले.

मलापण अगदी तुझ्या सारखेच वाटते. शिवाय शनिवार-रविवार होमवर्क दिला असेल ना, तर मी तो दर वेळी न चुकता..

काय सांगतोस, न चुकता पूर्ण करतोस? ओंकारचे वाक्य पूर्ण होण्याआधीच स्नेह जवळपास ओरडला.

अरे स्नेह, कसा रे तू, आपण दोघे पहिलीपासून आत्ता पाचवीपर्यंत एका वर्गात आहोत. तू कधी तरी बघितलेस का, मी होमवर्क पूर्ण केलेला. अरे मला म्हणायचे होते की, मी दरवेळी न चुकता होमवर्क विसरतो आणि शिक्षा व ओरडा सहन करतो. पण एक बरे आहे की, मी होमवर्क करायचा आहे हे माझ्या आई-बाबांना पण सांगायला विसरतो, त्यामुळे त्यांची शिक्षा आणि ओरडा तरी कमी होतो.

ओरडा खाण्याचा आणि शिक्षा सहन करण्याचा तुझा स्टॅमिना जबरदस्त आहे. मला तर हे अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मी घरी सांगूनच ठेवले आहे की, मला रविवारी दुपारीच, होमवर्कची आठवण करून द्यायची. त्यामुळे माझी धावपळ पण होत नाही आणि ओरडा पण बसत नाही, स्नेह्ने त्याची बाजू मांडली.

अरे व्वा, मी पण आता असेच करतो. आज मला जी शिक्षा मिळेल, ती शेवटची. 

म्हणजे आज सोमवार आहे, मला आज शिक्षा होणार  स्नेहने घाबरून विचारले.

अरे यार, तू पण आज होमवर्क विसरलास की काय? आत्ता तर म्हणत होतास की माझा होमवर्क नेहमीच पूर्ण असतो. मग आज काय झाले? ओंकारने स्नेहला जर खिजवण्यासाठी विचारले.

अरे ओंकार, माझी आज्जी आजारी आहे म्हणून माझे आई, बाबा गावाला गेलेत. त्यामुळे मी रेणू मावशीकडे राहिलो होतो. तिथे मला होमवर्कची कुणी आठवणच करून दिली नाही. शिवाय मी एक इंटरेस्टिंग पुस्तक ...

पुस्तक म्हणताच स्नेह वेगळ्याच जगात गेला. एकीकडे होमवर्क न केल्यामुळे छड्या खाव्या लागणार हे दिसत होते, तर दुसरीकडे रेणू मावशीकडे वाचलेल्या इंटरेस्टिंग पुस्तकातील ती आयडीया त्याच्या मदतीला धावून येईल असे त्याला वाटत होते. त्या पुस्तकात अशी कोणती आयडीया होती, जी एवढ्या पटकन मदतीला धावून येणार होती?

स्नेह तंद्रीतून बाहेर आला. त्याने उजवा हात उजव्या दिशेने तर डावा हात डाव्या दिशेने एकाच वेळी फिरवायचा प्रयत्न सुरू केला. पण त्याला हे काही केल्या जमेना. कितीही प्रयत्न केला तरी दोन्ही हात एकाच दिशेने फिरत होते. त्याची ही विचित्र हालचाल पाहून ओंकारने त्याच्याकडे हा नक्की बरा आहे ना? असा विचार करत संशयाने बघितले. 

ओंकार काही बोलणार एवढ्यात शाळा आली व ओंकारचा प्रश्न राहून गेला. वर्गाकडे जात असतानासुद्धा स्नेहचा हात फिरवण्याचा कार्यक्रम सुरूच होता. शेवटी एकदाचे त्याला हवे तसे हात फिरवायला जमले. खूश होऊन स्नेह्ने उजव्या हाताने त्याच्या डाव्या हाताचे बोट ओढले आणि तेवढयात...

बोट निघून चक्क हातात आले! विशेष म्हणजे बोट निघून सुद्धा रक्त येत नव्हते. आजूबाजूला कोणी नाही हे बघून स्नेहने बोट परत जोडायचा प्रयत्न केला आणि चक्क ते बोट आधी होते तसे परत जोडले गेले!

म्हणजे जर आपण उजवा हात उजव्या दिशेला व डावा हात डाव्या दिशेला एकाच वेळी आणि सलग तीन वेळा फिरवू शकलो, तर आपण आपल्या शरीराचा कोणताही अवयय पाहिजे तेव्हा काढून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा जोडू शकतो तर. स्नेह स्वतःशीच बोलला.

खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा तीन वेळा हात फिरवला आणि या वेळी त्याने डाव्या हाताने उजवा हातच जोरात ओढला. तसा त्याचा उजवा हात कोपर्‍यापासून निघून त्याच्या डाव्या हातात आला. खूश होऊन तो टाळी वाजवणार तेवढयात आपल्याला एकच हात आहे हे लक्षात आल्याने तो खुदकन हसला.

प्रत्येकाने आपापल्या होमवर्कच्या वह्या बाहेर काढून ठेवा आणि ज्यांनी होमवर्क केला नसेल, त्यांनी मुकाट्याने उभे राहा आणि मी जवळ आले की उजवा हात प्रसादासाठी पुढे करा, जाधव मॅडम गरजल्या.

ओंकार नेहमीप्रमाणे प्रसादासाठी उभा राहिला. त्याने स्नेहकडे बघितले तर मघाशी घाबरलेला स्नेह त्याला आत्ता एकदम बिनधास्त होता. जाधव मॅडमनी एकेकाला प्रसाद द्यायला सुरुवात केली आणि नको नको, पुढच्या वेळी नक्की होमवर्क करतो, असे गयावया करणारे आवाज ऐकू लागले. पण जाधव मॅडम कुणाचीही गय न करता प्रत्येकाला त्याचा हक्काचा प्रसाद देतच होत्या!

मॅडम जवळ येताच स्नेह गपकन खाली बसला. कुणाला दिसू नये म्हणून त्याने बेंचखाली हात नेऊन तीन वेळा हात उजव्या व डाव्या दिशेने फिरवले व पटकन उजवा हात काढून सॅकमध्ये ठेवून दिला.

स्नेह, तू पण आज होमवर्क केला नाहीस. चल कर उजवा हात पुढे, जाधव मॅडम असे म्हणताच स्नेहने उजवा हात पुढे केला.

अरे, हे काय? तुझा हात कुठे गेला. जाधव मॅडम असे म्हणताच वर्गातील सगळी मुले बेंचवर उभी राहून मध्येच डोके खुपसू लागली.

मॅडम, मी खेळत असताना काल अचानक माझा हात निखळला. म्हणून होमवर्क पण झाला नाही.

अरे, आधी सांगायचे नाहीस का मला. बस खाली आणि काळजी घे.

स्नेह विजयी मुद्रेने खाली बसला.

घरी जाताना स्नेहने त्याचा हात परत होता तसा जोडून टाकला. त्याचा उजवा हात परत आलेला बघून ओंकारला हे सगळे काय आहे, तेच कळेना.

मी तुला सगळे काही एक महिन्यानी सांगेन. तोपर्यंत तू हे सिक्रेट कुणाला सांगणार नाहीस याची मला खात्री करून घ्यायची आहे.

ओके, मी वाट बघेन, ओंकार म्हणाला.

थोडे पुढे जाताच ओंकारने नाकाला रुमाल लावला. ईई, स्नेह बघ ना, इथे काहीतरी मरून पडले आहे. कसला घाण वास येतो आहे. तू पण नाकाला रुमाल लाव पटकन.

रुमाल कशाला, मी नाकच काढून ठेवतो. तू जरा डोळे मिट बघू.

ओंकारने डोळे मिटताच पुस्तकातील आयडीया वापरून स्नेहने नाक काढून ठेवले.

ते बघूनही नक्कीच काहीतरी जादू असल्याची ओंकारला खात्री पटली. पण ही जादू समजून घेण्यासाठी त्याला एक महिना थांबावे लागणार होते.

मोठ्या आवाजाचा त्रास होऊ लागला तर कान काढून ठेव, रात्री झोपताना उजेडाचा त्रास होत असेल तर डोळे बाजूला काढून ठेव आणि आवडीची भाजी नसेल तर चव कळूच नये म्हणून चक्क जीभ बाजूला काढून ठेव, असे एकाहून एक भन्नाट प्रकार करायला स्नेहने सुरुवात केली.

आज रविवार असूनही भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच असल्यामुळे सगळ्यांनी आपापली कामे पटापट उरकून घेतली. सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये मॅच बघायची सोय करण्यात आल्यामुळे सगळे बरोब्बर दोन वाजता तिथे जमा झाले. पहिल्या पाच ओव्हरमध्येच पाकिस्तानच्या दोन विकेट गेल्यामुळे मॅच चांगलीच रंगात येऊ लागली होती आणि तेवढयात अचानक टीव्हीवरचे चित्र गायब झाले. केबलची लाईट गेली, असेल असे समजून सगळे वाट पाहू लागले. अर्धा तास झाला तरी लाईट येत नाही हे बघून वैतागून माने काकांनी केबलवाल्याला फोन केला. मात्र त्याच्याकडे तर लाईट होती.

अरे, त्याच्याकडे तर लाईट आहे, आपल्याकडेच काहीतरी गडबड दिसत आहे. माने काका म्हणाले.

चला टेरेसवर जाऊन बघू या. असे म्हणत सगळे टेरेसकडे जायला लागले. टेरेसवर जायचा असा आयता चान्स स्नेह व त्याच्या मित्रांनीही सोडला नाही.

नक्की काय झाले आहे, हे बघण्यासाठी माने काका डक्टमध्ये खाली वाकले. काहीच दिसत नाही म्हणून ते अजून वाकण्याचा प्रयत्न करू लागले आणि तेवढयात अचानक त्यांचा तोल गेला आणि ते डक्टच्या दिशेने पडले. माने पडले, माने पडले. असे ओरडत वाडकर व चौगुले काका टेरेसच्या भिंतीकडे पळाले. स्नेह हे सगळे दुरून बघतच होता. तोही त्यांच्या मागे पळाला.

तोल गेल्यावर माने काकांनी आठव्या मजल्यावरील खिडकीच्या गजाला पकडल्यामुळे ते खाली पडता पडता वाचले. मात्र त्यांना आता धड वरतीही येता येत नव्हते व खालीही जाता येत नव्हते. बिल्डींग जरी आठ मजल्याची असली तरी टेरेस व त्या खिडकीमध्ये बरेच अंतर होते, चौगुले काकांनी बरीच धडपड करूनसुद्धा माने काकांच्या हातापर्यंत त्यांचा हात पोहोचत नव्हता. खिडकीला हात धरून बर्‍याच वेळ अधांतरी उभे राहिल्यामुळे माने काकांचा स्टॅमिना आता संपत आला होता.

स्नेहला आता पुन्हा त्याची आयडिया आठवू लागली. आपली आयडिया वापरून आपण माने काकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्याने ठरवले.

चौगुले काका , मी प्रयत्न करून बघू का?

स्नेह, अरे इथे आमचा आधीच घाम निघालाय, त्यात तू आणखी डोके खाऊ नकोस. एक तर तू केवढा, त्यात तुझा हात केवढा आणि तू बोलतो केवढा? त्यापेक्षा तुझ्या बाबांना बोलावून आण. नुसते घरात बसू नका, जरा सोसायटीची कामे पण करा म्हणावं.

स्नेहने तोपर्यंत त्याची हातचलाखी सुरू केली आणि त्याचा उजवा पाय व डावा हात उपसून बाहेर काढला. हात व पाय एकमेकाला बांधून त्याने ते चौगुले काकांच्या हातात दिले व म्हणाला, काका, आतातरी माझा हात पोहोचेल ना?

पण हा चमत्कार बघून ते बिचारे चक्कर येऊन टेरेसमध्ये पडले. ते बघून वाडकर काका पटकन तिथे आले. त्यांनी स्नेहच्या हाता - पायाच्या मदतीने माने काकांना डक्टमधून टेरेसमध्ये सुखरूप परत आणले. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत वेल डन स्नेह असा जल्लोष केला. त्या आवाजाने चौगुले काका शुद्धीवर आले.

स्नेहने कोपर्‍यात जाऊन त्याचे हात व पाय पुन्हा होते तसे जोडले. लोकांनी अजून प्रश्न विचारायच्या आत तो तिथून सटकला, कारण ओंकारने त्याचे सिक्रेट मागच्या महिन्याभरात कुणालाच सांगितली नव्हते, त्यामुळे ओंकारला भेटून ती आयडिया सांगण्याची स्नेहला चांगलीच घाई झाली होती.

- चेतन एरंडे

[email protected]