इयत्ता दुसरीत शिकणारा नील तसा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. अभ्यासात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा नील इतर गोष्टीतही चौकस आणि जिज्ञासू होता. प्राणी-पक्षी, झाडे-झुडपे, नदी-नाले, याविषयी त्याला प्रचंड प्रेम वाटायचं. फिरायला जाताना वाटेत रस्त्याकडेला लाजाळूचं झाड दिसलं की, लाजाळूच्या पानांना हात लावून तो पाहायचा. ते झाड तर अगदी छोटसं. झुडुपचं म्हणायचं तर त्याहीपेक्षा छोटं. पण नीलनं हात लावला की, अवघं झुडुपच कोमेजून जायचं, नीलला मजा तर वाटायची, पण हेच झाड फक्त का कोमेजून जातं ते त्याला कळायचं नाही. मोठेपणी आपण या गोष्टीचा छडा लावणारच, असं तो मनातल्या मनात म्हणायचा. आपण मोठेपणी निसर्गसेवक होणार, असं आपल्या मित्रांना सांगायचा. नीलचं घर एका उंच पाचमजली बिल्डींगमध्ये होतं. पण त्या बिल्डींगच्या अवतीभवती आंबा-नारळ-पेरू यांची झाडंही लावलेली होती. त्यामुळेच त्या बिल्डींगजवळ खूप पक्षीही यायचे. दयाळ उंच तुरेवाला, पोटाशी लाल ठिपका असणारा, बुलबुल, डोक्यावर तुरा आणि पिवळी पाठ असणारा - काळ्या पांढर्‍या रंगाचा सोनपाठी सुतार, बाकदार चोचीचा हिरवट रंगाचा इवलासा शिंपी, सुगरण खूप छान शीळ वाजवणारा काळ्या रंगाचा परंतु, पंखांवर पांढरे पट्टे असणारा दयाळ, एकदम पाच सहाच्या संख्येने जोरजोरात कलकलाट करीत येणारे सातभाई, त्याशिवाय कावळे - चिमण्या आणि पोपटही नीलच्या घराच्या अवतीभवती बागडताना दिसायचे. नील कुतुहलानं त्यांच्या हालचाली पाहत खिडकीत बसून राहायचा. नीलचं घर होतं, दुसर्‍या मजाल्यावर. त्यामुळे नीलच्या घराच्या खिडकीतून आंब्याच्या उंच झाडावर बसणारे पक्षीही नेहमी दिसायचे. एकदा काय झालं नील खाऊ खात त्या खिडकीत बसला असताना त्याच्या हातातला खाऊ खिडकीच्या दगडी पट्टीवर सांडला. नील खिडकीपासून दूर झाला आणि काय आश्चर्य, कुठूनतरी एकदम तीन बुलबुलपक्षी त्या खिडकीवर येऊन बसले. नर-मादी आणि त्यांचं एक छोटं पिल्लू. त्या तिघांचं कुटुंब थेट खिडकीच्या कट्ट्यावर येऊन बसल्यावर नील आनंदाने पाहतच राहिला. त्या बुलबुल नर आणि मादीनं म्हणजे आई-बाबांनी त्यांच्या त्या पिल्लाला भरवायला सुरुवात केली. ते छोटं पिल्लूही चोच उघडून चिवचिवाट करायचं. मग ते बुलबुल आई-बाबा त्याच्या चोचीत खिडकीवर पडलेलं अन्न भरवायचे. पोट भरल्यावर ते कुटुंब निघूनही गेलं. पण नीलला एक छंदच लागला. तो दररोज खिडकीत बिस्किटाचे तुकडे किंवा इतर काहीतरी खाऊ ठेवायला लागला. मग काय? अहो’ दररोजच त्याच्या खिडकीच्या कट्ट्यावर नवे नवे पक्षी येऊ लागले.‘बाबा, त्या बुलबुल पक्ष्याचं पिल्लू कोठून आलं असेल? आईच्या पोटातून आलं का?’ त्यानं एकदा बाबांना विचारलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘पक्षी अंडी घालतात बरं. अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. कोंबडी कशी अंडी पोटाखाली घेऊन उबवते आणि मग त्यातून पिल्लं बाहेर येतात; तसंच इतरही पक्ष्यांचं असतं?’

‘पण ते अंडी कुठे घालतात?’

‘कुठे म्हणजे? आपल्या घरट्यात.’

... बस्स तेव्हापासून नील देवाकडे प्रार्थना करू लागला की माझ्या या आंब्याच्या झाडावर एकतरी घरटं असू दे. असेच काही दिवस गेले. एप्रिल महिना संपला आणि मे महिन्याच्या प्रारंभी एक पिवळसर चोचीचा काळपट करड्या रंगाचा पक्षी नीलला आंब्याच्या झाडावर काड्या गोळा करताना दिसला. एकच पक्षी सारखासारखा आंब्याच्या झाडावर त्याच फांदीवर काय करतो आहे हे न कळल्याने नीलनं त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली. दोन-तीन दिवसातच त्या फांदीच्या बेचक्यात नारळाच्या शेंड्या छोट्या छोट्या काड्या रचून त्या पक्षानं वाटीसारखं गोल घरटं तयार केलं. आता तो पक्षी त्या घरट्यात येऊन बसून राहू लागला. नीलच्या आनंदाला पारावर राहिला नाही. कधी कधी दुसराही पक्षी दिसायचा पण पहिला मात्र घरट्यात बसूनच राहायचा. एक दिवशी नीलनं खिडकीत ठेवलेलं खाणं खाण्यासाठी घरट्यातला पक्षी उडून खिडकीत आला आणि दुरूनच नीलनं पाहीलं की त्या घरट्यात एक छोटसं पांढरं अंड आहे. नीलनं ओरडून बाबांना हाक मारली. ‘बाबा, ते बघा अंड.’ बाबांनीही लगेच खिडकीपाशी येऊन पाहिलं तोवर पक्षी मात्र दूर उडून गेला होता.

आता तो पक्षी दररोज दिवसरात्र त्या घरट्यामध्येच बसलेला दिसायचा. एके दिवशी सकाळी ‘चिर्रर्र’ असा आवाज आला म्हणून नीलनं पाहीलं तर अंड्यातून पिल्लू बाहेर आलं होतं. आई त्याला कौतुकानं भरवत असे. हळूहळू पिल्लू मोठं झालं. आई त्या पिल्लाला घरट्यात घास भरवताना नीलच्या बाबांनी त्याचे दुरून फोटोही काढले. आता ते पिल्लू भराभर मोठं होऊ लागलं होतं. तेही धडपडत का होईना उडत उडत नीलच्या खिडकीवर येऊन बसू लागलं. एव्हाना मे महिना संपत आला होता. पावसाचा गडगडाट सुरू व्हायचा होता. तेव्हढ्यात एके दिवशी सकाळी बिल्डींगजवळच्या टेलिफोनच्या जुन्या खांबावर बसून तोच पक्षी नीलने गाताना पाहिला. वेगवेगळे आवाज काढत अतिशय सुमधुर आवाजात तो पक्षी गात होता. त्याच्या गाण्यानं सकाळचं वातावरण प्रसन्न झालं होतं. बाबा म्हणाले, ‘अरे, ही मैना, खूप छान गाते.’ नील म्हणाला, ‘बाबा, ही मैना आपण पकडली तर?’ त्यावर बाबा म्हणाले, ‘नको. पक्षी हे निसर्गातच वाढताात. घरात कोंडून पिंजर्‍यात ठेवून नाही जगत. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य नको का? ते निसर्गातच छान गातात.’ यावर नीलने आपला हट्ट सोडला, पण तो दररोज त्या आंब्याच्या झाडावर, टेलिफोनच्या खांबावर, त्या मैनेचा शोध घेऊ लागला. ती छान गात राहायची. परंतु अखेर आकाशात गडगडाट झाला. पाऊस पडू लागला. पक्ष्यांची पांगापांग झाली. एके दिवशी ती गाणारी मैना अचानक भुर्रर्रदिशी उडून गेली, तिच्या अधिवासाकडे.

 

-सुहास बारटक्के

[email protected]