कबुली

दिंनाक: 23 Oct 2017 16:01:47


साकेतला आज कधी घरी पोहोचतो असं झालं होतं. घटक चाचणीच्या उत्तरपत्रिका मिळायला शाळेत सुरुवात झाली होती. गणितामध्ये सर्व वर्गात त्यालाच जास्त गुण मिळाले होते. फक्त एकच गुण कमी मिळाला होता. कधी एकदा घरी जाऊन आईला पेपर दाखवतो, असं त्याला झालं होतं. त्याला काल मराठीच्या पेपरमध्ये खूपच कमी गुण मिळाले होते. मराठीच्या परीक्षेच्या दिवशी वेळच नव्हता पुरला त्याला पेपर पूर्ण करायला. पण परीक्षेनंतर मात्र त्याने आईला पेपर छान गेलाय असं सांगितलं होतं. त्याला आठवलं की काल आपण आईला, पेपर मिळालाच नाहीये अजून मराठीचा, असं सांगितलंय.

आज पण आई विचारेल पेपरबद्दल. गणितात छान गुण मिळालेले पाहून खूश झाली की मग आपण सांगू तिला मराठीच्या पेपरबद्दल, असं त्यानं ठरवलं. मग काही ती रागवायची नाही असं त्याला वाटलं.

“ए आई, खूप भूक लागलीये”, असं ओरडतच तो घरात शिरला. आज त्याने न सांगताच, दप्तर, बूट डबा सगळं जागेवर ठेवलं. आईचा काहीच आवाज येईना. थोड्याच वेळात दूध आणि चिवडा घेऊन आई आली. त्याच्यासमोर ठेवून आत गेली. आज तिने पेपरबद्दल काहीच विचारलं नाही. साकेतला काय करावं काहीच कळेना.

“आई, अजून हवाय चिवडा”, तिनं बोलावं म्हणून त्याने उगाचच पुन्हा मागितला. तरीसुद्धा ती काहीच बोलेना. चिवडा दिला आणि पुन्हा आत गेली.

साकेतच्या लक्षात आलं की, आईला आपण काल खोटं सांगितल्याच समजलेलं दिसतंय. त्याला काय करावं सुचेना. त्याने गणित आणि मराठी दोन्ही पेपर घेतले आणि आईजवळ गेला.

“आई, हे बघ आज पेपर मिळाले गणित आणि मराठीचे.” कालच खोटं लपवायला हे आणखी एक खोटं.

“आज मिळाले का दोन्ही?”, आईने विचारलं.

“हो”, तो आईकडे न बघताच म्हणाला.

“पण काल तुझ्या मित्राची आई भेटली होती बाजारात. ती म्हणाली कालच मिळाला मराठीचा पेपर.” आई त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाली.

“बाकीच्यांना कालच मिळाले, पण तेवढ्यात तास संपला म्हणून माझा काल नाही मिळाला.”

साकेत एकामागून एक थापा मारत सुटला होता. तो चुकीचं वागतोय हे त्यालाही कळत होतं, पण कबूल करायला मन मानत नव्हतं.

“काल तुझ्या मराठीच्या बाईपण भेटल्या”, आई म्हणाली.

आता मात्र साकेतला रडायला यायला लागलं. त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “आई माझं चुकलं! मी तुझ्याशी खोटं बोललो.”

आईने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, “एक खोटं लपवायला तुला अजून किती खोटं बोलावं लागलं पाहिलंस का? तुला मराठीच्या पेपरला वेळ पुरला नाही हे तेव्हाच सांगितलं असतंस तर पुढचं खोटं बोलायची वेळच आली नसती. मराठीच्या लेखनाचा सराव केलास की वेळ पुरेल पेपरला आणि गुण पण मिळतील. खोटं बोलणं हा उपाय नाहीये त्यावर. मला कधीतरी कळलंच असतं की.”

“चुकलो आई मी!, तू सांगशील तसा सराव करेन मी आणि मराठीत पण गुण मिळवेन.”

आईने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, “गणितात छान गुण मिळवल्याबद्दल आज तुझ्या आवडीचे गुलाबजाम करू का?”

साकेतने, “हो” म्हणून मान हलवली आणि आईच्या पदराला हळूच डोळे पुसले.

साकेताला आता खूप हलकं वाटत होतं. केलेल्या चुकीची आईजवळ कबुली दिल्याने त्याचं मन शांत झालं होतं.

-शुभांगी पुरोहित

[email protected]