सुटका

दिंनाक: 22 Oct 2017 14:58:29


शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर आईबरोबर येताना तेजस खूश असायचा. आई कधी आईसक्रीम कधी फ्रुटडिश, कधी कलिंगड, पेरू, ज्यूस काही नं काही हमखास द्यायची. आजही आईसक्रीम पार्लरसमोर थांबल्यावर तेजसने आवडता चोकोबार घेतला. निघताना तो आईला म्हणाला, आई आणखी एक विकीला बरं का? दुसरा चोकोबर हातात घेऊन तो आईच्या मागे गाडीवर बसला. सिग्नलच्या थोड अलीकडेच विकी उभा होता. गाडी बाजूला घेऊन आई थांबली. तेजसने विकीला आईसक्रीम दिलं. तो थोडा लाजला पण आईसक्रीम बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तेजस आणि विकी गेले दोन-तीन महिने मित्र झाले होते .

विकी सिग्नलला काही नं काही विकत असायचा, त्या सगळ्या वस्तू खूप आकर्षक असायच्या. लहान मुले, स्त्रिया असं पाहून विकी त्यांच्यासमोर त्या खेळण्याचे खेळ करायचा. कधी विमान उडायचं, कधी प्लास्टिकचं माकड सरसर तारेवर चढायचं, तर कधी एखाद्या खेळण्यातल्या कारचा लाल लाईट उघडमीट करायचा. आईकडे हट्ट करून तेजस अधूनमधून ती खेळणी घ्यायचा. तेवढ्यात विकी त्याच्याशी गप्पा मारायचा. त्याच दप्तर पाहायचा, कधी त्याला शेकहँड करायचा. ’सिग्नल’ सुटेपर्यंत त्यांच्या गप्पा चालायच्या. हळूहळू तो तेजसचा मित्रच झाला.

घरी काही केलं की तेजस ते विकीसाठी वेगळं ठेवायचा. त्याला आवर्जून ते द्यायचा. तेजसचे बाबा आईला म्हणायचे, तू पण काय लाड पुरवतेस त्याचे? सिग्नलला भेटणार्‍या त्या मुलाबरोबर कसली मैत्री न काय? अग त्यांचा खूप मोठा ग्रुप असतो. व्यसनी वैगेरे असतात ते! कशाला उगीच एवढं जवळ जायचं त्यांच्या. पण तेजसचं विकी वेड काही जात नव्हते.

आईलाही विकी तसा व्यसनी किंवा फटकारण्यासारखा वाटत नव्हता. त्याला तेजसच्या पुस्तकाचं, दप्तराच, युनिफॉर्मचं आकर्षण वाटायचं. पण तो सतत कोणत्यातरी दडपणाखाली असायचा. कोणी पाहत नाही नं याच दडपण दिसायचं. त्याला सतत काहीतरी सांगायचं असायचं. पण सिग्नलला मिळणार्‍या तुटपुंज्या वेळेत तो बोलणार काय?

त्यादिवशी आई आणि तेजस एक प्रदर्शन पाहायला गेले होते. दिवाळीच्या सर्व वस्तू एकत्र मिळण्याचं ते प्रदर्शन आणि स्टॉल्स होते. त्या मोठ्या मंडपाच्या बाहेर विकी उभा होता. त्याला पाहताच तेजसने आनंदाने उडी मारली. विकीचा हात धरून तेजसने त्याला थेट त्या प्रदर्शनातच नेलं. आकाशकंदिलाचा स्टॉल बघताना तो खूप काळजीपूर्वक बघत होता. तेजसची आई म्हणाली, तुला हवाय का हा आकाशकंदील दिवाळीला?

विकी एकदम रडायलाच लागला. हमसून हमसून रडणार्‍या विकीला आईने शांत केलं. काय झाल विचारलं.

विकी म्हणाला, आकाश कंदील लावायला घर नको का? तेजसच्या आईने त्याला जरा विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. तो सांगू लागला, मीपण तुमच्यासारखाच चांगल्या घरात राहायचो. मला एक बहीण आहे. मीपण शाळेत जात होते, असाच दप्तर लावून, भांग पडून, शाळेचे कपडे घालून.

मग असं काय झालं?

मॅडम, मी किती दिवस तुम्हाला सांगायला बघतोय पण आमच्या टोळीचे लीडर आजूबाजूला असायचे, आता त्यांची नजर चुकवून आलोय. त्यांनी मला पळवून आणलाय हो. मॅडम, तुम्ही दयाळू आहात खूप. तुमच्याकडे मन मोकळं करावंस वाटलं.

तेजसची आई आणि तेजस काही तरी बोलले, तेजसच्या पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या मामला आईने फोन केला. मामा जवळच्या पोलीस स्टेशनला असल्याने लगेच आला.

सगळी सूत्र भराभर फिरली. विकी लातूर जवळचा होता. प्रथम मामानी विकीचा फोटो काढून घेतला. विकीने लातूर जवळच्या त्याच्या तालुक्याचे ठिकाण सांगितले. तोपर्यंत साध्या वेशातल्या एका पोलिसाला बरोबर देऊन तेजसच्या मामानी तेजस, त्याची आई आणि विकी यांना पोलीस स्टेशनला पाठवले. मागोमाग मामा आला. विकी थोडा घाबरला होता. त्याने तेजसच्या आईचा हात घट्ट धरला होता. त्याचं लक्ष सारखं रस्त्याकडे जात होतं. तेजसच्या मामाने लातूरमधल्या पोलीस स्टेशन्सकडून हरवलेल्या मुलांची माहिती मागवली. विकीला फोन नंबर सांगता येत नव्हता, पण तो स्वतःचा पत्ता बरोबर सांगत होता. तिथल्या पोलिसांना मामाने तो पत्ता सांगून खात्री करायला सांगितली. फोनसारखे खणखणत होते. विकी रडवेला झाला होता. त्याला त्या टोळीच्या दादाची भीती वाटत होती.

एवढ्यात व्हिडीओ कॉलवर विकीचे आईबाबा दिसले. त्यांना विकी दिसला. विकीने तर आई-बाबा म्हणत रडायला सुरुवात केली. तिकडे आईने आणि बाबांनी जोरात रडायला सुरुवात केली.

तेजसच्या मामाने त्यांना इकडे यायला सांगितले. त्याने दोन पोलिसांना सिग्नलच्या पाळतीवर संशयितांना ताब्यात घ्यायला सांगितले. पोलिसांच्या बंदोबस्तात विकीला तेजसला आणि त्याच्या आईला तेजसच्या घरी पाठवलं.

घरी आल्यावर आई-बाबांनी विकीला धीर दिला. त्याला अंघोळ करायला सांगितली आणि तेजसचे नवे कपडे त्याला घालायला दिले. त्याला गरमगरम वरण-भात, शिरा, पोळी असं जेवण वाढलं. विकी खूप मनापासून जेवला. तेजस अगदी खूश होता. त्याचा मित्र आज त्याच्या घरी आला होता. तेजसचा मामाही घरी आला. त्याच्याबरोबर त्याचे साहेब होते. त्यांनी तेजस आणि त दिवशी भल्या पहाटेच विकीचे आईबाबा तेजसच्या घरी आले. पाहताच विकी धावत जाऊन त्यांना बिलगला. तेजसच्या मामाने आवश्यक त्या पूर्तता करून विकीला त्यांच्या ताब्यात दिले. तालुक्याच्या ठिकाणच्या एका जत्रेतून विकीला त्या गुंडांच्या टोळीने पळवले होते आणि सिग्नलवर वस्तू विकायला ठेवले होते. गेले चार महिने तो त्यांच्या ताब्यात होता. ती गुंडांची टोळी पोलिसांच्या हाती लागली. आणखीही तीन मुले त्यांच्या तावडीतून सोडवली गेली. त्या गुंडांना अटक झाली. विकीच्या आई-बाबांनी तेजसला आणि आई-बाबांना अनेक वेळा हात जोडले. त्यांचे आभार मानले. आई-बाबांसोबत विकी त्याच्या घरी निघाला, तेव्हा तेजस आणि विकी दोघांनाही रडू कोसळले. दोघेही एकमेकांचे मित्र झाले होते. इथून पुढेही मैत्री अशीच टिकवून ठेवायची असं वचन त्यांनी एकमेकांना दिले.

-चारुता प्रभुदेसाई 

[email protected]