उमेश सानप कमालीचा अस्वस्थ होता. तस म्हटलं तर उगाचच. उमेश आठवीत होता. एका चांगल्या शाळेत होता. अगदी पहिला, दुसरा नंबर नसायचा, पण तसा हुशार होता. खोखो खेळायचा. आता घरचे म्हणाल तर सगळे चांगले होते. आई-बाबा तर खूप प्रेम करतातच, पण प्रेमळ मावशी... लाड करणारा मामा होता. शिवाय कौतुक करणारे आजी-आजोबा. काही म्हणजे काही कमी नव्हतं..

पण तरीही उमेश अस्वस्थ होता. कारण त्याला हे सगळं पुरेसं वाटत नव्हतं. त्याला ना मोठं व्हायचं होतं. म्हणजे असं तसं नाही खूपच मोठं. आख्ख्या होल जगानं ओळखावं - निदान सबंध भारतात नाव व्हावं.. अगदीच काही नाही तरी उभ्या आणि आडव्या महाराष्ट्रानं म्हणावं, “उमेश सानप का.. अरे, वा वा!”

प्रश्न असा होता की मोठं व्हायचं कसं?

हा. तसं तर सगळेच त्याला म्हणायचे, “खूप शिक, मोठा हो!” पण फक्त खूप शिकून आपण खरंच मोठे होऊ याची त्याला खात्री वाटत नव्हती. बरं शिकायचं तरी किती? उमेशला एकदम ‘फास्ट’ मोठं व्हायचं  होतं..

थोडक्यात काय, लवकरात लवकर ‘मोठं’ व्हायच्या विचारानं उमेश झपाटलेला आहे. पण हे कुणाकडे बोलून दाखविण्याची सोय नव्हती. कारण त्यांनी चेष्टाच केली असती. म्हणूनच उमेशनं ठरवलं होतं - आपण खूपच विचार करून, ‘मोठं’ होण्याची ‘आयडिया’ शोधून काढली पाहिजे.

रात्ररात्र तो तळमळत पडायचा... एकटा एकटाच राहायचा... घराजवळच्या टेकडीवर हिंडायचा... टेकडीवर असाच तो डोळे मिटून बसलेला होता आणि अचानक त्याला आठवलं ते वाक्य... आठवलं कसलं, मिटल्या डोळ्यासमोर दिसलं - म्हटलं तर ऐकूच आल्यासारखं झालं.

देव, त्याला प्रसन्न झाला आणि म्हणाला, “वत्सा... मी तुझवर प्रसन्न झालो आहे.. तुला मी एक वर देत आहे. त्याद्वारे तू तुला हवं ते मागू शकतोस!”

आयडिया! देवाला प्रसन्न करून घ्यायचं आणि त्याच्याकडून एक ‘वर’ मागून घ्यायचा...

‘आयडिया’ तर सुचली... पण कोणता देव? आणि तो प्रसन्न व्हावा यासाठी नेमकं करायचं काय?

उमेशनं हेही ऐकलेलं होतं की, देव भावाचा भुकेला असतो. भक्तिभावानं त्याची प्रार्थना केली की तो होतोच प्रसन्न.

बस - उमेश मनोमन प्रार्थना करू लागला. जसा तो शाळेत जात होता, वर्गात बसत होता, गृहपाठही करत होता... पण मनात अखंड जप सुरू होता... ‘देवा, मला प्रसन्न हो!’ आणि काय आश्चर्य... देव प्रसन्न झाला. समोर प्रकट झाला. म्हणाला, “वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे.. तुला मी एक वर देतो आहे. बोल तुला काय हवं?”

उमेशनं तत्काळ म्हटलं, “देवा, मला मोठं कर!” देव हसला.. म्हणाला, “अरे, ही तू मला आज्ञा करतो आहेस. मला ‘हे कर’ म्हणतो आहेस. देवाला असं सांगायचं नसतं, त्याच्याकडे फक्त हवं ते मागायचं असतं!”

“अरेच्चा, असं असतं होय. ठीक आहे.” उमेशनं म्हटलं.

“देवा, मला भरपूर पैसा दे! बस.. पैशानं सगळं विकत घेता येतं.”

देवानं प्रश्न केला, “भरपूर म्हणजे किती?”

“एक कोटी रुपये... नाही नाही पाच कोटी.... सॉरी, दहा कोटी रुपये!”

बरं - कसे देऊ दहा कोटी - म्हणजे शंभराच्या नोटा देऊ, पाचशेच्या की दोन हजाराच्या?

“अ.. दोन हजाराच्या!”

“ठीक आहे.. पण मला त्या बँकेतून किंवा टांकसाळीतून चोरून आणाव्या लागतील..”

“असं कसं? तू देव आहेस - तू नोटा निर्माण करू शकतोस!”

“उमेश त्या नकली नोटा होतील. तुला माहितीय ना नोटांवर नंबर असतात... रिजर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. मला त्यांची खोटी सही करावी लागेल..”

खरंच की!.. देव ‘खर्‍या नोटा’ कशा तयार करणार?

काही वेळ विचार करून उमेशनं म्हटलं, “पैसा नको. तू मला यश दे!”

देवानं म्हटलं, “कशात यश देऊ?”

“कशातही!”

“अरे, यश म्हणजे काय पिझ्झा किंवा बर्गर आहे का? यश हे मिळवावं लागतं!”

“ठीक आहे ना.. मला प्रचंड यश मिळेल असा वर दे.”

“तो मी देऊ शकतो.. पण कशात यश द्यायचं हे मला कसं कळणार!”

“अ क्रिकेटमध्ये दे. मला सचिन तेंडूलकरसारखं यश दे.”

“ठीक आहे. तू क्रिकेट खेळायला लाग. सचिन तेंडूलकरसारखी मेहनत करायला लाग. तो कसा शाळेत असताना, अंधार पडला तरी ‘बॅटिंग’ची प्रॅक्टिस करत राहायचा.”

“म्हणजे काय मीच मेहनत करायची?”

“अरे, यश तुलाच हवंय ना! तुला काय न खेळताच शतकं ठोकायाचीय?”

उमेश नाराज झाला - “देवा तू प्रसन्न झाला आहेस म्हणतोयस, पण तू मला काहीच देत नाहीयेस.”

“अरे वेड्या, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना. तुला काय प्रयत्नांच्या आधीच परमेश्वर हवाय आणि मी तुला काहीच देत नाहीय, असं कसं म्हणतोस! तुला हे सुंदर शरीर कोणी दिलंय? आणि तो अचाट मेंदू - तो कुणी दिलाय? दोन्हींचा वापर केलास की तुला हवं ते तू मिळवू शकशील. हा - आता तुला शॉर्टकट हवा असेल, तर तू लांडीलबाडी करू शकतोस - काही लोक करतात तसा भ्रष्टाचार करू शकतोस.”

“नाही, नाही मला तसं काही करायचं नाहीय.” उमेशनं झटकन म्हटलं. त्याला कळून चुकलं होतं - देवानं ‘बुद्धी’चं वरदान तर जन्मत:च दिलेलं आहे. मग साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्यानं हात जोडून म्हटलं, “देवा, मला काही नको.. फक्त चांगली बुद्धी दे!” “तथास्तु!” देवानं म्हटलं आणि देव अंतर्धान पावला. उमेशचं डोकं उघडलं. तो स्वतःशीच हसला. पहाट झाली होती. त्यानं चटकन उठत अंथरुणाची घडी केली. आईला म्हटलं, “आई, मी जॉगिंगला जातोय.” आई समाधानानं हसली.      

- शिवराज गोर्ले

 [email protected]