मधमाशी

दिंनाक: 20 Oct 2017 13:01:09


“आई हे काय गं? ते काय आहे गं?” 4 वर्षांची छोटीशी रिया स्वयंपाक घरात बसल्या बसल्या खाऊच्या, धान्याच्या कपाटातलं हे उचक ते उचक करत होती. आणि आई घाईघाईत स्वयंपाक करत होती आणि अधूनमधून रियाच्या प्रश्नांना उत्तरं देत होती.

आईच अचानक लक्ष गेलं तर रियाच्या हातात काचेची बाटली, “अरे बापरे... अगं फोडशील ती”, असं म्हणत आई धावली तिच्याकडे आणि बाटली काढून घेतली तिच्या हातातून..

पण रियाचे प्रश्न चालूच होते, “सांग ना काय आहे ते? डिंकासारखा चिकट दिसतंय...” रिया मागेच लागली.

“अगं बाई सांगते”, आई बाटलीतला मध एका वाटीत काढत म्हणाली.. “तू लहान होतीस ना तेव्हा मी तुला चाटवायची!” आई मधाचा चमचा तिच्या तोंडात देत म्हणाली.

आणि परत कामाला लागली, रियाही थोडा वेळ मध चाटण्यात दंग झाली.. थोड्या वेळाने पुन्हा..

रिया, “आई’ मध कसा तयार करतात गं?”

“अगं, हा मध मधमाशा फुलातून गोळा करतात.”

“मग आपल्याला कसा मिळतो?”

“अग, तो मध त्यांच्या पोळ्यात म्हणजे घरात त्या साठवतात आणि मग आणि मग आपण तो काढतो पोळं पिळून..” थोडा वेळ गेला आणि रिया कुठल्यातरी विचारात रमून गेली.

‘शनिवार’ म्हणजे रियाचा आणि आईचा आवडता दिवस. कारण आईच्या ऑफिसला आणि रियाच्या शाळेला शनिवार-रविवार सुट्टी असायची. त्यातून रविवारचा दिवस बाबाबरोबर बाहेर फिरण्यात, आठवड्याच्या खरेदीत, रियाच्या अभ्यासात आणि काही खास पदार्थ करण्यात जायचा. त्यामुळे आई आणि रियाला स्वतंत्रपणे दंगा करायला मिळायचा तो शनिवारीच.

शनिवारी दोघी खूप मजा करायच्या, बागेत, मॉलमध्ये, तुळशीबागेत रियाला हवे तिथे जायच्या, घरी गाणी लावून दोघी नाचायच्या बागडायच्या, टीव्हीवरचे कार्यक्रम दोघी मिळून पाहायच्या, गाणी-गोष्टी-गप्पा चालायच्या आणि विशेष म्हणजे कागद माती, रंग यांच्या साहाय्याने दोघी हस्तकलेत रंगून जायच्या.

आजही अशीच योजना होती. रियाला घेऊन आई कुठेतरी जाणार होती. म्हणून घाईघाईत स्वयंपाक उरकून घेत होती.. स्वयंपाकघरात तिच्याशी गप्पा मारत मारत तिच्या शंकांच समाधान करत होती.

आईला नेहमीच रियाच्या प्रश्नांचं कौतुक असायचं.. मुलांच्या कुतूहलाला डावलू नये, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना समजतील अशी सोप्पी करून सांगावीत, या मताची ती होती.

“मूस मूस.. आवाज आला.. आणि हे काय?”, आईच अचानक तिच्याकडे लक्ष गेलं.

आणि ती तर एका कोपर्‍यात बसून रडत होती. “अरेच्या, तरीच एवढा वेळ शांत होती, मला वाटलं ही मध खाण्यात रमली आहे.” आई मनात म्हणाली.

“अगं काय झालं? का रडतेस?”

“आपण दुसर्‍यांच घर का मोडायचं?”

“आँ? कोणी मोडलं? कोणाचं घर?”

“मधमाशांच घर मोडून का काढला हा मध? तूच म्हणतेस ना की दुसर्‍यांचं घर नाही मोडायचं म्हणून? एकदा कबुतरांनी घरट केलं होतं, कुंडीमध्ये आणि अंडी घालणार होते... आणि बाबा ते काढायला गेला तर तूच म्हणालीस ना कुणाचंही घर नाही मोडायचं मग?”

“आणि एकदा मी आजीच्या अंगणात, मातीत खेळत होते, तिथे एक मऊमऊ मातीचा खड्डा होता.. मला तो आवडला म्हणून त्यात मी काडी घालून आणखी खोल खणत होते.. तेव्हा तू येऊन माझ्या हातातली काडी काढून घेतलीस आणि म्हणालीस ना की, ते किड्याचं घर आहे ते मोडायचं नाही म्हणून? मग आता आपल्याला मध पाहिजे म्हणून मधमाशांचं घर मोडायचं का?” असं म्हणून रिया मोठ्यामोठ्याने रडायला लागली.

आणि मग रियाच्या डोळ्यातलं पाणी आणि तिने केलेला खडा सवाल ऐकून आईलाही राहवलं नाही. तिला वाटलं.. आपण मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या आणि आपल्या स्वार्थासाठी आणि आपणच चुकीचं वागायचं? खरंच असे का वागतो आपण? आईलाही मध काढायची पारंपरिक पद्धतच माहीत होती. एवढा चांगला शनिवारचा दिवस आपण हे काय सांगून खराब केला?

आईनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण रिया म्हणत होती ते तर खरं होतं.. मग आई रियाच मन दुसर्‍या गोष्टीत रमवू लागली.

दुपारी रिया झोपली तशी ती विचार करू लागली, “खरंच पोळं तोडून मध काढतात का? कोण सांगेल बरं? तिला आठवलं एकदा सह्याद्री वाहिनीवर मधमाशा संगोपनाविषयी काहीतरी पाहिलं होतं.”

“अरेच्या, मधमाशीविषयी इंटरनेटवर पाहावं की शोधून.” असं म्हणत आईनी गुगल सर्च मारला आणि तिला सापडली पुण्यातली मधमाशापालन संस्था.. तिने ताबडतोब फोन लावला.. आणि ती खूश झाली.

दुपारी रिया उठली, तशी तिला छान आवरून आई घेऊन गेली थेट..

“आपण कुठे चाललो आहोत?” रिक्षात बसता बसता रिया म्हणाली.

“तुझ्यासाठी एक गंमत आहे.”

आणि रिक्षातून उतरताना रियाला दिसलं त्या संस्थेचं मोठं प्रवेशद्वार. त्यावर मधमाशीच मोठं चित्र होतं आणि आत गेल्यावर त्या संस्थेच्या अंगणात काही पांढरी खोकी दिसत होती लाकडाची. ‘काय होतं बरं ते?’ रिया मानत विचार करत होती.. थोड्या वेळात त्या दोघी एका ठिकाणी आल्या तिथे एक काका काही लोकांना काहीतरी सांगत होते. त्या खोक्यातून काही काढत होते.

“काय हे?”, रिया

आई रियाच्या प्रश्नांची वाट बघत होतीच आणि मग ते काका म्हणजे मधमाशी संस्थेचे प्रशिक्षक, रिया आणि आईला समजावून सांगू लागले आणि आई रियाला ते सोप करून सांगू लागली.

त्या खोक्याच्या वरचं झाकण त्यांनी काढलं, त्यात 5/6 उभ्या फळ्या होत्या एक बाहेर काढली तर त्यावर अगणित मधमाशा...

रिया ते पाहून किंचाळलीच; पण ती एवढ्या माश्या एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहात होती.

मी मुद्दाम आणलंय इथे तुला. मधमाशीपासून मध कसा काढतात ते दाखवायला. या लाकडाच्या चौकटीमध्ये एक जाळी असते. त्यात मधमाशा मेवा आणि मध साठवतात. मधमाशा फुलातला मध गोळा करतात. मधमाशांच्या एका वसाहतीत हजारो माशा असतात. या सगळ्या कामकरी माशा. प्रत्येक कामकरी माशी दिवसातून दहावेळा फेर्‍या मारते आणि तीन लाख फुलातील मध गोळा करते. मधमाशांचे पोळे मेणाचे असते. कामकरी मधमाशा आपल्या पोटातील ग्रंथीमधून हा मेण बाहेर टाकतात आणि या जाळीवर पोळं तयार करतात आणि यात मध साठवतात. या पोळ्यामध्ये अंडी आणि अळ्या राहतात, ज्याचं रूपांतर पुढे मधमाशीत होत. हा मेण आणि मध दोन्ही गोष्टी माणसाला खूप उपयोगी पडतात.

पोळ्यामध्ये असणार्‍या माशा तीन प्रकारच्या असतात. राणी (मादी) नर आणि कामकरी माशा. राणीचा आकार इतरांपेक्षा मोठा असतो. अंडी घालणे हे तिचे काम. दोन-तीन वर्षांच्या अवधीत ती दहा लाखांवर अंडी घालते.

या खोक्याच्या चारही बाजूला बारीक फटी आहेत या माशांना येण्याजाण्यासाठी दरवाजे आहेत. प्रत्येक चौकट म्हणजे वेगवेगळ्या राणी माशीचा स्वतंत्र परिवार आहे.

अशा तर्‍हेने काही दिवसाने ही पोळ्याची चौकट मधाने भरून जाते, त्यानंतर दुसर्‍या कृत्रिम पोळ्यात राणी माशीला सोडलं जातं आणि तिच्या बरोबर इतर माशाही त्या चौकटीत जातात.

रिकाम्या झालेल्या पोळ्याच्या चौकटीला नंतर मशीनमध्ये घालून मध आणि मेण वेगळं केलं जातं आणि ती जाळीची चौकट परत दुसर्‍या मधमाशांना देण्यात येते.

अशा रितीने आपण त्यांचं घर न मोडता मध मिळवितो आणि त्यांना मध आणि मेण साठवायला तयार घरही देतो.

आई सांगत होती आणि रिया ऐकत होती. यातलं किती समजलं देव जाणे, पण शेवटचं वाक्य ऐकून रियाच्या चेहर्‍यावर हसू आलं आणि आईला हुश्श्य झालं.

“आणि बरं का बाळा.. हे मध औषधी तर असतंच, पण विशेष म्हणजे माणूस ते कृत्रिमरित्या तयार नाही करू शकत.”

रिक्षातून परतताना आई सांगत होती, मधाचे उपयोग खूप आहेत अनेक औषधांमधून मध वापरले जाते, शिवाय कफकारी रोगांवर, शिवाय मधाचं वैशिष्ट्य म्हणजे मध हा एकमेव असा पदार्थ आहे की तो हजारो वर्ष टिकतो.

“अरेच्च्या, हे काय? आई बोलत होती पण रिया? ती हे ऐकायला जागी कुठे होती?”

ती तर वार्‍याबरोबर आपल्या मधमाशा मैत्रिणींबरोबर खेळायला केव्हाच स्वप्नात गेली होती....

 

-अंजली अत्रे

[email protected]