गोष्ट कळताना...

दिंनाक: 19 Oct 2017 16:10:47


आपल्याला सगळ्यांना लाकूडतोड्याची गोष्ट माहीत असते. कुर्‍हाड पाण्यात पडली मग देवाने त्याला रडताना पाहिले. त्याला आधी सोन्याची, मग चांदीची आणि शेवटी लोखंडाची कुर्‍हाड काढून दिली. आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी ही गोष्ट ऐकली असेल. आपल्यापैकी जे पालक असतील त्यांनी आपल्या मुलांना ही गोष्ट सांगितली असेल. मीसुद्धा एकदा ही गोष्ट माझ्या 5 वर्षांच्या मुलीला सांगितली. ती गोष्ट ऐकल्यावर तिने मला प्रश्न विचारला, “म्हणजे बाप्पाला पोहता येतं?” मला अगदी अनपेक्षित होता हा प्रश्न. एकदा कृष्णाची गोष्ट सांगितली. गोपिकांनी कशी कृष्णाची तक्रार केली यशोदेकडे. मग सहज विचारलं आम्ही मुलीला, “सांग यशोदा कोण होती?” तिने ताबडतोब सांगितलं, “यशोदा पोलीस होती.” आम्हाला एकदम गंमतच वाटली या उत्तराची. आम्ही विचारलं तिला, “तुला का असं वाटलं की यशोदा पोलीस होती?” उत्तर आलं, “एवढ्या गोपिका तिच्याकडे तक्रार घेऊन गेल्या म्हणजे ती पोलीसच असणार.” या प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने मला कळलं की मी सहज म्हणून जी गोष्ट सांगते त्या गोष्टीचा बारीक विचार माझी मुलगी करत असणार. माझीच नाही तर गोष्टी ऐकणारी सगळी मुलं त्या गोष्टींचा विचार करत असणार. कोणी कमी विचार करत असेल कोणी जास्त विचार करत असेल. एखादं मूल गोष्ट ऐकून प्रश्न विचारत असेल एखादं मूल नसेल विचारत. पण गोष्टी त्यांच्या भावविश्वात महत्त्वाच्या असतात हे नक्की.

गोष्टी अनेक प्रकारच्या असतात. प्राण्यांच्या, पक्षांच्या, माणसांच्या. आपल्या आयुष्यात आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटना या गोष्टींमधून येत असतात. या गोष्टींच्या निमित्ताने अनेक शब्द मुलांच्या कानावर पडतात. त्या शब्दांचा नेमका अर्थ आपण मुलांना सांगितला नाही तरी त्या गोष्टीच्या एकूण संदर्भात त्याचा अर्थ मुलं लावू शकतात. वेगेवेगळ्या भावभावना सुद्धा या निमिताने मुलांना समजू लागतात. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या गोष्टीच्या नावातूनच टुणूक टुणूक असा छान नाद आणि लय असणारा शब्द मुलांना कळतो. टुणूक टुणूक म्हटल्याबरोबर पळणारा भोपळा डोळ्यांसमोर येतो. गोष्टी ऐकण्याची हीपण एक मजा आहे. गोष्टी ऐकता ऐकता त्याची चित्र मुलांना मनातल्या मनात उभी करता येतात. ज्याला आपण visualization म्हणतो म्हणजेच एखादी गोष्ट कशी दिसत असेल, कशी दिसू शकते हे डोळ्यांसमोर आणायचं. आपण कोणीच चालणारा भोपळा बघितलेला नसतो. पण हे शब्द कानावर पडल्यावर भोपळा कसा चालत असेल याचं चित्र आपण मनातल्या मनात पाहातो. कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आपण ऐकतो, तेव्हा आपल्या लांब चोचीने पसरट ताटलीतली खीर खायचा त्याने कसा प्रयत्न केला असेल याचं चित्र आपण मनात आणतो. त्याची चोच त्या ताटलीवर आपटून काही मजेशीर आवाज आले असतील का? याचाही विचार आपण करू शकतो. एखादी छोटीशीच गोष्ट असते, पण त्यातून कितीतरी विचारांना चालना मिळते. पंचतंत्रातल्या अनेक गोष्टी या प्राणी आणि पक्ष्यांवर आधारित असतात. हे प्राणी पक्षी बोलतात. माणसांसारखे वागतात. एकप्रकारे ही माणसाच्याच वेगवेगळ्या भावनांची प्रतीकं (symbols) असतात. symbolic विचार करण्याची सवय या मुलांना लागू शकते. मुख्य म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला गोष्टींमुळे खूप वाव मिळत असतो. आपण कधी म्हणालो, शिवाजी महाराजांनी घोड्याला टाच दिली आणि घोडा भरधाव निघाला रायगडाच्या दिशेने. हे ऐकल्यावर मुलं आपल्या कल्पनाशक्तीने भव्यदिव्य रायगड डोळ्यांपुढे आणतील, घोडा कसा जोशाने निघाला याची कल्पना करतील.

पंचतंत्र, हितोपदेश, रामायण, महाभारत यांसारख्या पारंपरिक गोष्टींमधून आपल्या समाजाच्या काय चाली रीती आहेत, किंवा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चांगल्या आहेत याची जाणीवही मुलांना होत जाते. या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने ऐकल्या तर आपल्या लक्षात येईल की सर्वसाधारणतः चांगुलपणाचा वाईटावर विजय होत असतो, कथांमधल्या महत्त्वाच्या व्यक्ती काही मिळवण्यासाठी न थकता मेहेनत करत असतात. कोल्हा-करकोच्याच्या गोष्टीतून जशास तसाचा धडा मिळतो, तसाच उंदीर आणि सिंहाच्या गोष्टीतून एकमेकांना मदत करणं किंवा झालेली चूक माफ करणं असे धडे मुलांना मिळतात. अकबर-बिरबलाच्या गोष्टीतून बिरबलाचा चतुरपणा कळतो, बिरबलाची वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वृत्ती समजते. लबाड, धूर्त माणसांशी कसं वागावं हे कळतं.

आपण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, या गोष्टी आपल्याला आपल्या समाजाशी जोडून ठेवत असतात. वाचायला जरा कठीणच वाटलं असेल हे वाक्य. पण बघा आपल्याला आपले आजी-आजोबा गोष्ट सांगतात त्यातून त्यांच्यावेळच्या काही गोष्टी आपल्याला कळतात, ज्या आपण कधी पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या नसतात. आपण आपल्या मुलांना गोष्टी सांगतो त्यात आपले अनुभव आलेले असतात. आत्ता जी लहान मुलं आहेत त्यांना ठोके वाजणारी घड्याळं माहीतच नाहीत किंवा पूर्वी असणारे काळे डायलचे फोन माहीत नाहीत. याचे उल्लेख गोष्टीत आले तर त्या गोष्टी मुलांना गोष्टीच्या निमित्ताने का होईना पण कळतात. अनेक मुलांना आपले आई-बाबा लहान असतानाच्या गोष्टी ऐकायला मजा वाटते. आपली आई पण कधीतरी छोटीशी शाळेत जाणारी मुलगी होती ही कल्पनाच त्यांना गंमतशीर वाटते. पण आई-बाबांच्या किंवा आजी-आजोबांच्या लहानपणच्या अशा गोष्टी ऐकल्यामुळे मुलं आणि आई बाबा किंवा आजी आजोबा यांच्यात मैत्रीचं नातं जुळतं.

गोष्टींमुळे दुसर्‍या व्यक्तीचं भावविश्व मुलांना समजू शकतं. त्या गोष्टीतल्या माणसांची सुखदुःख त्यांना आपली वाटतात. यातूनच सहसंवेदना (empathy) विकसित व्हायला मदत होते. प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं आहेत, ज्यात लंपन नावाचा लहान मुलगा आहे. या लंपनची शाळा, त्याचे मित्र-मैत्रिणी, त्यांचे खेळ, त्यांची भांडणं, त्यांना पडणारा ओरडा, त्या मुलांना वाटणार्‍या गमतीजमती यांच्या गोष्टी आहेत. मुलांना हा लंपन आपल्यासारखाच वाटतो, कारण तो पण त्यांच्याचसारखा रडतो, हसतो, रागावतो.

सगळ्याच गोष्टींमध्ये खूप सारी वर्णनं असतात. इतिहासातल्या गोष्टी असतील तर राजे, राण्या यांच्या श्रीमंतीची त्यांच्या पराक्रमाची वर्णनं असतात. प्राणी पक्ष्याच्या गोष्टी असतील, तर निसर्ग वर्णनं असतात. अशी वर्णनं अनेकवेळा ऐकल्यावर एखादी गोष्ट रंगवून सांगण्याचं कौशल्य मुलांमध्येसुद्धा हळूहळू विकसित व्हायला लागतं.

जगभरात मुलांना सांगितल्या जाणार्‍या गोष्टींवर खूप संशोधन सुरू असत. मुलांसाठी विशेषतः पुस्तकं प्रसिद्ध करणारे प्रकाशकही मुलांना काय प्रकारच्या गोष्टी आवडतात, गोष्टींमुळे मुलांचा काय फायदा होतो यावर संशोधन करत असतात. या सगळ्याच अभ्यासांमधून हे ठळकपणे कळलं आहे की, मुलांना गोष्टी आवडतात. ऐकायला आवडतात, पाहायला आवडतात.

सर्वसाधारणतः आपण मुलांना झोपताना गोष्टी सांगतो. हल्ली टी.व्ही., इंटरनेट यांमुळे गोष्टी पाहातासुद्धा येतात. किंबहुना पूर्वी मुलांना जेवढ्या प्रमाणात गोष्टी सांगितल्या जायच्या तेवढ्या आता सांगितल्या जात नाहीत, पण आता गोष्टी बघण्याची सोय आहेच मुलांना. गोष्टी ऐकल्यामुळे जास्त फायदे होतात. कारण गोष्ट ऐकताना त्याच चित्र आपणच आपल्या डोळ्यांपुढे आणतो. गोष्ट जेव्हा बघितली जाते, तेव्हा गोष्टीचं visualization करण्याची संधी मुलांना मिळत नाही. तरीही त्यांच्या विचारांना चालना मिळतेच.

एकूण काय तर अजून एक गोष्ट सांग ना प्लीज अशी विनवणी करणार्‍या सगळ्या मुलांना आपण न कंटाळता गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कारण त्या मुलांचं बालपण अधिक आनंदी आणि समृद्ध करण्यात या गोष्टींचा खूप मोठा वाटा असणार आहे.

-सुप्रिया देवस्थळी

[email protected]