जलचक्र

दिंनाक: 16 Oct 2017 17:00:58


समुद्राचं पाणी पुन्हा
कसं मिळतं समुद्राला?
जलचक्र म्हणजे आई
माहितीये का गं तुला?

अरे बाळा,
उन्हाळ्यात रौद्र उन्हं
तापवतं या सागराला
वाफ होऊन पाण्याची
भिडते सरळ नभाला।

थंडगार वारा तिला
करतो घट्ट मुट्ट
रूप बदलून होते ती
ढग काळेकुट्ट।

वाऱ्यासंगे इतस्ततः
फिरतात आकाशात
जलभाराने जड होऊन
खाली धाव घेतात।

आपण म्हणतो, पडला -
पाऊस मुसळधार
इकडे पाणी, तिकडे पाणी
हवा गारच गार।

ओढे, नाले, नद्या-बिद्या
नेतात पाणी वाहून
समुद्र त्यांचा स्वामी
देतात त्याला नेऊन

समुद्राचं पाणी असं
मिळतं पुन्हा समुद्राला
जलचक्र याचेच नाव
कळलं का रे बाळा ??

    _ _  होय आई, कित्ती छान
         कळलं गं मला सारं
         तुझं माझं असंच चक्र
         खरंच, गोडं- खारं ।।

 जलचक्र म्हणजे पाण्याचे चक्र . 
चक्र म्हणजे चाक, एक गोलाकार वस्तू, ज्याला शेवटची टोके नसतात, ज्याची सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही. कागदावर वर्तुळ काढताना आपण कंपासचे एक टोक स्थिर ठेवून दुसरे पेन्सिल लावलेले टोक गोलाकार फिरवतो. ज्या बिंदूपासून सुरुवात केली, त्याच बिंदूवर गोल फिरून येतो, तेव्हा वर्तुळ पूर्ण होते. 
      जलचक्रात असेच होते. पाहा हं .. 
एप्रिल- मेमध्ये कडक उन्हामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते - ती हलकी असल्याने वरवर जाते - त्यांचे एकत्रित ढग बनतात - त्यात पाणी असल्याने ते जड होतात - थंड हवा लागून त्या ढगांतून पाणी खाली जमिनीवर पडते - हे पावसाचे पाणी नदी - ओढ्यातून वाहत जाऊन पुन्हा समुद्राला मिळते . म्हणजे समुद्रापासून निघून वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करत पाणी पुन्हा समुद्राला येऊन मिळते. म्हणजेच एक चक्र पूर्ण होते. पुन्हा पुढचं चक्र सुरू होते.
      असं आहे हे जलचक्र. पाणी-वाफ- ढग- पाणी. कधीकधी अतिथंड हवेमुळे पाण्याचे बर्फ होते आणि आपण म्हणतो, गारा पडल्या.
       हेच जलचक्र वाचा वरील कवितेत - आई- मुलाच्या संवादातून आणि सांगा कसं वाटलं ते ...
 

- सुखेशा ( स्वाती दाढे)