ॲप आणि आपण

दिंनाक: 13 Oct 2017 15:21:54


प्रिय मित्र-मैत्रिणींनो,

छान ॲप्सची ओळख करून देणार्‍या लेखमालेतील हा दुसरा लेख. स्मार्टफोनमधील असंख्य ॲप्स जरी मोठी माणसं वापरत असली, तरी तुमच्यासाठीच खास बनवलेले अगणित ॲप्स गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण त्यापैकी काही मस्त व विनामूल्य ॲप्सची माहिती या वेळी पाहू या.

टेम्पल रन, अँग्री बर्ड्स, कॅन्डी क्रश किंवा पोकेमनची माहिती तर सर्वच मुलांना असते. म्हणून जरा हटके ॲप्स आपण पाहू या.

आपल्या घरात एखादं कासव, ससा, सफेद उंदीर, मांजराचं पिल्लू किंवा गोंडस कुत्रा हवा, असं अनेक मुलांना वाटत असतं. पण पालक मात्र ‘नको ती कटकट आपल्या घरात, तुला जमणार तरी आहे का पाळीव प्राण्याला सांभाळायला?’, असं म्हणत साफ नकार देतात. अशा मुलांसाठी एक मस्त ॲप.

या ॲपचे नाव :- Pou

हे ॲप विनामूल्य आहे.

फार पूर्वी Tamagotchi digital Pet Game खूप लोकप्रिय होता. त्याच धर्तीवर Pou हे ॲप बनवलेले आहे.

मुलांना या ॲपमध्ये एक काल्पनिक, परग्रहावरचा पाळीव प्राणी सांभाळण्यासाठी मिळतो. त्याला वेळेवर खाऊ घालणे, त्याला पोषाख/कपडे चढवणे, त्याच्याशी खेळणे अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. मुलांना घरात खरा पाळीव प्राणी घेऊन देण्यापूर्वी त्याबाबतची परिस्थिती समजावी या हेतूने हे ॲप तयार केलेले आहे, तरीपण धमाल मनोरंजन हाही हेतू त्यात साध्य होतोच.

’Home Work’ नावाचे ॲप हे मात्र खेळण्यासाठी नसून, नावाप्रमाणे खरोखरच ‘गृहपाठ’ करण्यासाठी सोबती व मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरेल.

शाळेचे वेळापत्रक, गृहपाठ, परीक्षेची तयारी इत्यादींसाठी तुम्ही स्वत:च वेळापत्रक तुम्ही बनवू शकता. 2, 3 किंवा 4 आठवड्यांचे वेळापत्रक तयार करू शकाल. प्रत्येक विषयाचा अभ्यास त्या दिवशी किती वाजता सुरू करायचा व नेमके कधी थांबून दुसर्‍या विषयाला सुरुवात करायची हे ठरवता येते.

वाचलेल्या पाठावरील प्रश्नोत्तरे व अर्धवट राहिलेला गृहपाठ यांची स्पष्ट सूचना या ॲपच्या मदतीने मिळत राहते. त्यामुळे स्मार्ट फोन हाताळण्यातला आनंद व आपला शालेय अभ्यास या दोन्ही गोष्टी एकत्रच होतात. पालक नक्कीच या ॲपच्या वापराला पाठिंबा देतील.

‘‘डू ईट यूवरसेल्फ’’ म्हणजेच DIY नावाचे एक सुरेख ॲप आहे. ‘‘करून तर पाहा!’’ प्रकारच्या कलाकृती, प्रयोग बनवण्यास किशोरवयीन मुलांना खूप गमंत वाटते. त्यातील कौशल्ये, आव्हाने यांविषयी सर्वांनाच खूप कुतूहल वाटते. या नावाचे एक लोकप्रिय संकेतस्थळही इंटरनेटवर आहे. त्यांचेच हे ॲप. मुलांनी स्वत: बनवलेल्या किंवा इतरांचे पाहून बनवलेल्या कलाकृती जगासमोर याव्यात, यासाठी त्यांचे फोटो पोस्ट करण्याची सुविधाही येथे दिलेली आहे. अगदी पुठ्ठा कापण्यापासून ते जीवशास्त्रापर्यंत अगदी विविध विषयांचे हजारो प्रकल्प मुले स्वत: करून पाहू शकतात. त्यातून मेंदूला खाद्य मिळतेच, वेळ छान जातोच; पण इतरत्र लोकांकडून वाहवाही मिळवता येते. वाचन, चित्रकलेचा विकास होत होत संवाद कौशल्यही वाढू शकत. मुलांच्या विचारांना, कलात्मकतेला, कल्पकतेला चालना देणारे हे ॲप निश्चितच सर्वांना आवडेल.

मित्रांनो, तुम्हालाही एखादे ‘ॲप’ खूप भावले असेल व इतर वाचक मित्रांनीही ते वापरून पाहावे, असे वाटत असेल, तर अवश्य मला त्याविषयी कळवा. मी त्याविषयीही इतरांना माहिती देईन. माझा ई-मेल पत्ता [email protected] हा लेख वाचल्यावर तुमचे ॲपविषयीचे अनुभवही अवश्य कळवा.

- विवेक मेहेत्रे

[email protected]