बोनसाय : एक कला

दिंनाक: 11 Oct 2017 14:44:43


जपानी भाषेत ‘बोनसाय’ म्हणजे चपट्या कुंडीत वाढवलेले झाड. ‘बोन’ म्हणजे कुंडी आणि ‘साय’ म्हणजे झाडाचे दृश्य. असे म्हणतात की, ही कला प्रथम चीनमध्ये उदयास आली. तिथून ती जपानला गेली. जपानी लोकांनी ही कला खूपच विकसित केली. तिला ‘बोनसाय’ असे नाव दिले. कुणी म्हणतो ही मूळची भारतीय कला असून नंतर इतरांनी अनुकरण केले. इतिहास काहीही असो, पण बोनसाय ही एक कला आहे, हे मात्र सर्वमान्य झाले आहे.

बोनसाय म्हणजे मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती. पण नुसते खुजे झाड नव्हे. त्याला फळे, फुले हे सारे निसर्गातल्याप्रमाणे असायला हवे. फक्त आकारमान लहान इतकेच. अगदी सोपे उदाहरण द्यायचे झाले तर दुर्बीण किंवा कॅमेर्‍याच्या उलट्या बाजूने पाहिल्यास जसे दिसेल तसे झाडाचे दृश्य! परंतु प्रत्यक्षात थोडा फरक पडतो. नैसर्गिक वाढ झालेले झाड आणि बोनसाय यांची तुलना केल्यास पाने, फुले, फळे त्या प्रमाणात लहान होत नाहीत. फांद्यांची संख्याही कमी असते. तरीसुद्धा एकूण प्रतिमा निसर्गातल्या मूळ झाडासारखी भासते.

बोनसाय हे एक शास्त्र आहे, तसेच ती कला आहे. पुस्तक वाचून शास्त्र समजेल, पण कला मात्र साध्य करावी लागेल. झाडाचा डौल, त्याचा आकार, फुटणारे नवे धुमारे, फुलांचा बहर, फळांचा मोसम, डवरणे, कोमेजणे हे सारे सततच्या निरीक्षणाने साध्य होणारे आहे. झाड निसर्गात कसे वाढते? पाणी किती लागते? माती कशी हवी? हवा कशी लागते? फांद्या कशा वाढतात? मुळांचा आकार कसा असतो? झाड सरळ वाढते की डेरेदार होते? असे नाना प्रश्न पडायला हवेत आणि आपले प्रश्न आपण निरीक्षणाने सोडवले पाहिजेत. त्याचा बोनसाय वाढवण्यास उपयोग होतो.

बोनसायमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या. माती, भांडे आणि झाड. माती नीट पसरल्याने मातीचा आभास होतो. हा आभास साधण्यासाठी गरजेपुरते शेवाळ, छोटे दगड इत्यादींची रचना करावी. झाड जुने वाटण्यासाठी खोड, फांद्या, मुळे याकडे लक्ष द्यावे. कुंडी चपटी हवी. रंगीबेरंगी नसावी. माती, झाड, कुंडी या तिघांचा संच एका एकसंघ त्रिमितीचा भाग वाटावे.

बोनसायसाठी झाड निवडताना लहान पानांचे, आडवे वाढणारे, लहान फुलांचे आणि दणकट वाटणारे असावे. मोठ्या पानांची झाडे निवडताना वड, पिंपळ, पिंपर्णी, उंबर अशी झाडे घ्यावीत. यात खोडे दणकट असल्याने जुनी वाटतात. पारंब्या आणि जमिनीच्या वर येणारे मुळांचे आकार सौंदर्यात भर घालतात.

निसर्गात वाढणार्‍या झाडांची ढब वैशिष्ट्यपूर्ण असते. काही झाडे डेरेदार, काही उभी, काही तिरकी, खडकावर वाढणारी, जमिनीकडे झुकलेली असे अनेक प्रकार. हे सारे निरीक्षणातून अधिक चांगले समजते. पुस्तकांचा आधार जरूर घ्यावा.

-ल.म. कडू

[email protected]