इनोव्हेशन ही काळाची गरज आहे, त्यामुळे माणसाला सोई-सुविधा, आराम मिळतो हे सगळं तर झालंच. पण त्याचा खराखुरा जीवनदायी अनुभव जर कशातून लाभत असेल, तर तो लाभतो वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे. हजारो वर्षांपूर्वी चरक सुश्रुताच्या काळात कशा करत असतील शल्यचिकित्सा, शस्त्रक्रिया? झाडं, पानं, फुलं यांचे रस, त्याच्या मात्रा वापरत असतील की अगदी मातीचा उपयोग करत असतील? त्या काळात म्हणे एका ठरावीक प्रकारच्या मुग्यांची नांगी वापरली जात असे, ठराविक जखमेवर टाके घालण्यासाठी. निसर्गाकडून शिकतशिकत माणूस कृत्रिम वस्तू वापरत गेला. आता तर काही प्रमाणात आपण कितीतरी वेळा नैसर्गिक औषधे वापरून बरे होण्यास वेळ लागतो; म्हणून पटकन बरं करणारी अँटीबायोटीक्स घेऊन मोकळेही होतो.

नवनवे शोध लागत गेले आणि माणूस वैद्यकशास्त्रात प्रगत होत गेला. आज आपण आईला म्हणालो, 'आई, अंग गरम वाटतंय गं.’ की ती ताबडतोब थर्मामीटर घेऊन धावत येते आणि तापमान बघू लागते. सध्याचे थर्मामीटरही दोन पावलं पुढे गेलेत; ते नुसते कपाळावर किंवा कानापाशी धरले की, त्यावर तापमानाचे आकडे दिसतात. पार्‍याचा थर्मामीटरवापरावाच लागत नाही.

काही वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने थकलेले आजी-आजोबा रक्तदाब तपासण्यासाठी, साखरेचं प्रमाण बघण्यासाठी, त्यासाठी इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यात ताटकळत थांबत असत. आज हे सर्व तपासण्यासाठी घरातयंत्र उपलब्ध होत आहेत. जी वापरायला सोपी आहेत व त्यातून मिळणारे अंदाज ताबडतोब हातात येतात, त्यासाठी आठवडाभर थांबावं लागत नाही नि रांगेत उभं राहावं लागत नाही. या प्रकारच्या वैद्यकीय साधनांच्या साहाय्याने निदान केल्यानंतर त्याचे अंदाज नोंदविलेसुद्धा जातात व ते दीर्घकाळ साठवले जाऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्याची चाचणी करताना आवश्यक ती माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.

रक्ताची तपासणी करून जसे आरोग्याचे निदान केले जाते, त्याप्रकारे घामाच्या निदानामुळे शारीरिक तपासणी केली जाऊ शकेल का? यावर सध्या शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. जर अशा प्रकारे काही चाचण्या घेता आल्या तर त्या रुग्णांना आणि डॉक्टर्सना त्याचा नक्की फायदा होईल. रुग्णांसाठी हे तंत्र कमी त्रासाचं असेल आणि कमी भीतीचंही असू शकेल.

या पुढील कालावधीत एखाद्याला जर औषध घ्यायचे असेल तर ते घेण्याची वेळ, त्या औषधाचा किती डोस घ्यायचा आहे यासारखी माहिती लक्षात ठेवावी लागणार नाहीये. कारण त्याप्रमाणे माणसाला आठवण करणारी 'मेडीसीन रीमाइंडर’ अशी औषधाची बाटलीही अस्तित्वात आलेली आहे.

निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा कायमच महत्त्वाचा ठरत आलेला आहे. आजच्या काळात मात्र त्या व्यायामाला शिस्त घातली जातेय ती तांत्रिक पद्धतीने. घड्याळाच्या जागी हातात फिटबीट दिसून येतंय, ज्यात हृदयाचे ठोके, चालून झालेल्या पावलांची संख्या, अंतराची नोंद, किती काळ चलनवलन चालू होतं आणि किती काळ झोप घेतली, यासारख्या पुष्कळ गोष्टींची नोंद ठेवली जाते. रोजच्या रोज ही सगळी माहिती केवळ बघायला मिळत नाही, तर त्याद्वारे व्यायामात प्रगती करण्याचे निरनिराळे टप्पे ठरविता येतात. हे टप्पे कसे गाठायचे यासाठी ही साधने केवळ मार्गदर्शन करीत नाहीत तर प्रोत्साहनसुद्धा देतात.

तंत्रज्ञान, नाविन्य व अभ्यासाच्या बळावर संजीवनी मिळवण्यासाठी मेरू पर्वताकडे जावे न लागता मेरू पर्वतच मानवाकडे चालून येत आहे व त्याचे आयुर्मान निरंतर वाढवीत आहे.

- नंदिता गाडगीळ

[email protected]