आम्ही सिंगापूरला आलो, तेव्हा विहान जेमतेम अडीच वर्षांचा होता. सिंगापूरला जायचा हा निर्णय तसा फारच अचानक घेतला गेला होता, त्यामुळे विहान तिथे राहील का? आम्हाला तिथे करमेल का? शाळा, वातावरण सगळं चांगलं असेल का? सवयीचे सगळे खाद्य पदार्थ मिळतील का? अशा एक ना अनेक शंका मनात होत्या, पण जायचं तर निश्चित होतं, त्यामुळे मनाची आणि सामानाची तयारी करायला सुरुवात केली. तसे आम्ही एकत्र कुटुंबात राहणारे आणि माणसांचा गोतावळा आजूबाजूला असणारे आहोत. त्यामुळे परदेशात मैल अन्‌ मैल माणूस दिसत नाही, लवकर दिवस संपतो, माणसं फार एकमेकांशी बोलत नाहीत असं सगळं ऐकलं होतं. या सगळ्याची नाही म्हणलं तरी थोडी धास्तीच होती. पण पहिलाच परदेश प्रवास आणि नवीन शहर, जागा, देशाची उत्सुकताही तेवढीच होती. 

सिंगापूरमध्ये आल्यावर आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची अगदी समाधानकारक उत्तर हळूहळू मिळत गेली. आजूबाजूला सतत माणसं असण्याच्या सवयीमुळे इथे अचानक येणारी पोकळी विहान स्वीकारू शकेल का? असं वाटत होतं. पण मुलं खरंच किती सहज सगळं स्वीकारतात. विहान जितक्या आनंदाने चार लोकांत राहायचा, तितक्याच सहजतेने त्याने फक्त आई-बाबांबरोबर कुठल्याही तक्रारीशिवाय राहायला सुरुवात केली. बिल्डींगच्या खाली खेळायच्या जागी आमची अगदी पहिल्या दिवसापासून खेळायला सुरुवात झाली, इथे "आम्ही" म्हणण्याचं कारण की, खरोखरच आम्ही खेळतो, मी आणि विहान. मी त्याच्या आईबरोबरच त्याची, त्याच्याच एवढी मैत्रीणही झाले. आजूबाजूचे कोणीच ओळखीचे नाही आणि इथले लोक इतके सहज एखाद्याला सामावून घेत नाहीत, त्याचं मुख्य कारण म्हणजे भाषा. इंग्लिश ही जरी सार्वजनिक भाषा असली तरी विहान इंग्लिशपासून खूपच दूर होता, त्यामुळे तो कुठल्याही पद्धतीने त्याच्या वयाच्या इथल्या मुलांमध्ये मिसळू शकत नव्हता. सुरुवातीला मला या गोष्टीचं फार वाईट वाटायचं की, आपला मुलगा एकटा पडतोय, पण इथे थोडं संयमाने घेणं भाग होतं. 

हळूहळू आमच्या ओळखी वाढल्या. मलापण नवीन मैत्रिणी मिळाल्या. ज्या आमच्यापासून जरा लांब राहात.तरीही वेगळ्या वातावरणात जाणं, चार नवीन चेहरे दिसणं ही माझी आणि विहानची गरज होती. त्यामुळे आम्ही तिकडे जायला सुरुवात केली. विहानलाही नवीन मित्र-मैत्रिणी भेटले. अशा ग्रूपमुळे नवनवीन माहिती मिळायला लागली. चांगली शाळा, मुलांसाठीच्या वेगवेगळ्या जागा, इथल्या शिक्षणाच्या पद्धती, मुलांसाठीच्या तरतुदी, दवाखाने, नियम सगळंच. काही दिवसांनी आमच्या घराजवळ, पण आमचा खूप छान ग्रूप तयार झाला. त्यांना सगळ्यांना वरचेवर भेटणे, एकत्र फिरायला जाणे, एकमेकांच्या घरी जाणे, या सगळ्यामुळे आमची मुलंसुद्धा एकमेकांमध्ये रमली. अगदी रोज संध्याकाळी एकत्र मैदानावर खेळणं सुरू झालं. या सगळ्यामुळे विहानचा एकटेपणा कमी व्‍हायला खूप मदत झाली. सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ वेगवेगळे सण, सोहळे एकत्रपणे साजरे करते. त्यात गणपतीत विविध गुणदर्शनामध्ये आमच्या भागात राहणाऱ्या १०-१२ मराठी मुलामुलींचा एक नाच बसवला होता. त्यामुळे विहानच्या गाठीशी एक नवीन अनुभव तर आलाच, पण खूप नवीन मित्र-मैत्रिणीही त्‍याला भेटल्या. 

आम्हाला सगळ्यात मोठी काळजीहीहोती की, विहान शाळेत कितपत स्थिरावतोय?त्याला आवडेल का? पचेल का? याची होती. जवळच्याच एका शाळेत विहानला घालायचं ठरवलं म्हणून शिक्षकांशी बोलायला गेलो. त्यांना पूर्ण कल्पना दिली की, विहानला अजिबात इंग्लिश येत नाही. त्यावर त्यांनी अत्यंत्य शांतपणे - "काळजी करू नका, एका वर्षात तुम्हाला फरक जाणवेल" असं उत्तर दिलं. त्यांचा हा विश्वास बघून खूप बरं वाटलं. खरं सांगायचं तर मला जरा वेगळंच वाटत होतं. विद्यार्थी-शिक्षक कोणालाच एकमेकांची भाषा येत नाही. कसं काय करणारेत कोण जाणे! विहानची तर पहिल्यांदा फार दया यायची. तो अखंड रडायचा. साहजिकच होतं - नवीन चेहरे होते, त्यांना विहान काय सांगतोय ते कळायचं नाही आणि विहानला त्यांचं. पण हळूहळू त्याच्या कलाने घेतघेत त्या दोन्ही शिक्षिकांनी विहानला खूप आपलसं केलं, प्रेमाने सांभाळून घेतलं. सुरुवातीला " सूचना" हा भाग खूप मोठा होता म्हणजे प्रत्येक वेळेला "sit down" म्हणताना शिक्षिका बसून दाखवायच्या. A for apple , B for ball म्हणताना, ती वस्तू मुलांच्या डोळ्यांसमोर असायची. यातून मुलं इंग्लिश शब्द शिकायला लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातले दोन तास त्यांचे इंग्लिश ऐकण्यात जायचे. जगाच्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेली ही दोन अडीच वर्षांची मुलं एकत्र शिकत होती आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतींनी एकमेकांशी बोलायला लागली आणि खऱ्या अर्थाने विहान इथल्या मुलांबरोबर रमायला लागला. खरंच त्याच्या शिक्षिका म्हणाल्या होत्या तसंच, आज वर्षभरानंतर विहानला इंग्लिश बोललेलं थोडाफार का होईना कळतं. तो प्रश्न समजून घेऊन "yes /no" उत्तरं देऊ शकतो. तो त्याला काय हवं काय नको हे सांगू शकतो. आधी रोज शाळेत जाताना रडणारा विहान आता घरी जायचं नाही म्हणून हट्ट करायला लागलाय. 

सगळे दिवस सारखे नसतात, तसं विहान पहिल्यांदाच इथे आजारी पडला त्याला (H M F D - Hand Mouth Foot Disease)  झाला. यात पहिल्यांदा ताप येतो आणि मग अंगावर बारीक पुरळ येतं आणि ते खाजत राहतं. हा इथे नेहमी आढळणारा आजार आहे, पण याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. यात तुम्हाला कुठेही बाहेर जात येत नाही, शाळेत जाण्याची परवानगी नसते. त्यामुळे जवळजवळ आठवडाभर २४ तास घरात घालवणं भाग होतं. याकाळात एक आई म्हणून मीच विहानकडून खूप काही शिकले. एवढ्या लहान वयात आपण बाहेर पडू शकत नाही हे समजून घेऊन त्यानी तो हट्ट करणं सोडून दिलं. आम्ही घरातल्या घरात करता येण्यासारखे अनेक उद्योग शोधून काढले. आम्हा दोघांचीही ती परीक्षाच होती. 

एक पालक म्हणून मूल परदेशात वाढवताना जाणवलेला फरक असा की, तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप आवर्जून प्रयत्न करावे लागतात, ज्या गोष्टी भारतात खूप सहज उपलब्ध असतात. उदा., त्याच्यासारखेच त्याचे मित्र-मैत्रिणी, सणासुदीला खिडकीतून डोकावलं की दिसणारं वातावरण, त्याला सांभाळण्यासाठी असणारे विविध पर्याय मग ते पाळणाघर असो किंवा नातेवाईक. तुम्हाला तुमच्या मुलासाठी आणि तुमच्यासाठीही जाणूनबुजून वेगळी नाती निर्माण करावी लागतात, टिकवावी लागतात.त्‍यासाठी सतत विचारात राहावं लागतं. तशी कृती करत राहावं लागतं. मुलांना वाढवताना, पालक म्‍हणून आपणही घडत जातो. आपल्‍याही जाणीवा कळत-नकळतपणे विस्‍तारत जातात. 

- अनुजा कुलकर्णी-बोकील

[email protected]