कथा - चोर कोण?

दिंनाक: 30 Jan 2017 12:25:55


चोर कोण? याचा विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. चोरी झाली होती ती आमच्या लग्नघरात. तेही अगदी खास जागेवरून आणि खास गोष्टीची. नवर्यालमुलीचा एक हार!
तो हार काकूला तिच्या आईने दिला होता. त्यांच्या घराण्यातला, परंपरागत चालत आलेला, सोन्याचा. फार किंमती नसेल, पण खानदानी होता ना!
आताही, मोठ्या माणासांमध्ये चोरीचीच चर्चा चालू होती. माझ्या स्वरादीदीचं दोन दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. मी आत्ताशी आठवीत असले, तरी ती मात्र मोठी होती. माझी सख्खी चुलतबहीण. ती माझे खूप लाड करायची... माझे मन पुन्हा लग्नात गेले.
उन्हाळ्याचे सुट्टीचे दिवस म्हणजे लग्नांचे दिवस. त्या दिवशी असेच उकडत होते, पण कार्यालयात ते जाणवत नव्हते. कारण उत्साह! पंखे फुल स्पीडमध्ये असले, तरी वारं लागत नव्हतं. दारातून शिरतानाच काय ते कूल वाटत होतं. तिथे गुलाबपाणी उडवणारा मोठा पंखा होता ना!
लोकांची गर्दी. वेगवेगळ्या चेहर्यां ची, रंगीबेरंगी कपड्यांची. वेगवेगळ्या परफ्यूम्सचे वास. बायकांच्या ठेवणीतल्या साड्यांचा वेगळाच वास. त्यातच येणारा मसालेभात आणि जिलबीचाही वास.
पण, माझ्या डोक्यात लकाकलं... लोकांची गर्दी? त्यातलाच एक चोर असणार की.
मी मध्येच ओरडले, ‘काका लग्नाची डीव्हीडी आली?’ आई ओरडली, ‘इथे काय चाललंय अन् तुझं हे भलतंच.’ मी गप्प बसले. पुन्हा विचार करू लागले. डीव्हीडीमध्ये सारे लोक पाहता आले असते, चोरसुद्धा!
कित्ती प्रकारचे लोक? लांबचे, ओळखीतले, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि जवळचे नातेवाईक; म्हणजे मी, माझ्यासारखे... अजून... अजून...
‘खरंच कोण असेल चोर?’,त्याच वेळी कोणीतरी म्हणालं. माझं तिकडे लक्ष नव्हतं. मी अचानक म्हणून गेले, ‘नवरामुलगा!’
माझ्या बोलण्यावर सगळे हसले. पण, काकूने मात्र मला हात जोडले. म्हणाली, ‘काय बोलते तरी ही, चिमुरडी! म्हणे नवरामुलगा चोर! इतका सोन्यासारखा जावई माझा!’
हं!...त्याच सोन्याने दीदीला माझ्यापासून दूर नेलं ना. भले चोरून नाही, पण नेलंच.
तेवढ्यात अमोलदादा आला. स्वराताईचा मोठा भाऊ अन् गंमत म्हणजे तो लग्नाच्या शूटींगची डीव्हीडी घेऊन आला होता. कसली मजा! त्यात मला दीदीला आणि मला स्वत:लाही परत पाहता आलं असतं... त्या दिवशी मीही नटले होते ना! मी म्हणाले, ‘चला आपण ती पाहू या.’
पण काकू ओरडलीच. मी पण डोकं लढवलं... ‘काकू, त्यात चोरही असेल ना!’ माझी मात्रा लागू पडली. दादाने डीव्हीडी लावली. आम्ही सारे पाहायला बसलो. आई म्हणाली, ‘ही आमची काजल - सीआयडीमधली.’ फिल्म सुरू झाली - दारावरची फुलांनी सजवलेली पाटी आली. हिरव्या, पांढर्याह, पिवळ्या फुलांनी लिहिलेली नावं - स्वरा आणि सारंग.
मग कॅमेरा फिरू लागला. माणसांवरून, वधुपक्षाच्या खोलीतून. मध्येच काकू ओरडली, ‘ती पाहा ती. तीच...’ सगळे पाहू लागले. ती आमची एक लांबची काकू होती. फटकळ अन् शिष्ट.
पण काका म्हणाले, ‘काहीही काय बोलतेस गं? असेल तिचा स्वभाव फटकळ, पण म्हणून काय ती चोरी करेल का?’
आम्ही पुन्हा फिल्म पाहू लागलो. एकदा विधी, तर एकदा लग्नाची पंगत. दादा फिल्म पळवत होता.
‘काय एकेक माणसं हादडतात ना!’,काकू म्हणाली.
काका म्हणाले, ‘खाऊ देत गं. चोरून तर नाही खातयेत ना! पंगत तर आहे.’
दीदी आकाशी रंगाच्या शालूमध्ये काय गोड दिसत होती. सुंदर! सारंगपेक्षा भारी.
शेवटी काकू म्हणाली, ‘तुम्ही चोर-पोलीस खेळत बसा हं! मला नाही वेळ. खूप काम पडलीयंत. हे असलं पाहून चोर मिळणारे का?’ त्यावर आई हसली नि उठली. मग सगळेच गेले. काकासुद्धा. तेवढ्यात दादाचे मित्र आले. आता रिमोट माझ्या हातात होता. मी मन लावून फिल्म पाहू लागले, पण ते काही सीसीटीव्हीचं शूटींग नव्हतं, चोर सापडायला. मग खरंच चोर कोण असेल? तो असेल का ती? मी रिमोट चार वेळा स्वत:च्या डोक्यावर आपटून घेतला.
पुन्हा एकदा वधुपक्षाची खोली. चोरी इथेच झाली असावी. सकाळची वेळ होती. सगळी नेहमीचीच माणसं. उघड्या बॅगा, टॉवेल्स्, गजरे अन् असंच सामान.
मी ते भाग पुन:पुन्हा पाहू लागले. या खोलीत कोण ‘अनोळखी’ माणूस शिरला असेल? अशी शक्यता अगदीच कमी, मग ओळखीचाच चोर! त्या तिथेबायकांचाच वावर जास्त, मग चोराने चेहरा लपवला तर नाही? कोण लपवू शकेल?... का त्याचा चेहरा दिसतच नाही...? आणि....
कळला तुम्हाला चोर? मला तर कळला. ‘दादा, मला चोर कळला’, मी किंचाळले.’‘काय!’ तो आणि त्याचे मित्र ओरडले.‘या खोलीत कोण अनोळखी माणूस होता?ज्याचा चेहरा दिसत नाही? सगळे विचारात पडले. अन् दादा म्हणाला, ‘शूटिंग करणारा! पण, मला तो वाटत नाही.’
मग दादाचा मित्र म्हणाला, ‘अरे शक्य आहे. मी माझ्या ओळखीच्या माणसाला हे काम सांगितलं होतं, पण ऐन वेळी तो म्हणाला, ‘मला काही काम आहे, त्यामुळे मी दुसर्या एका मुलाला पाठवतो.’
आता सगळ्यांना तो केसाचं विचित्र टोपलं असलेला पोरगा आठवला, अन् कोडं उलगडलं.
हार परत मिळाला. चोर कबूल झाला. एका क्षणी असं झालं की, खोलीत तो आणि दादाच होते. दादाचा पाय एका बॅगला लागला. सगळं सामान खाली पडलं. तो सामान आवरत असताना, त्या पोराने हार लांबवला होता; सकाळीच, पण लग्नामध्ये चर्चा नको म्हणून काकांनी सगळ्यांना गप्प राहायला सांगितलं होतं. लग्न तसंच पार पडलं.
दीदी परत माहेरी आली तेव्हा ती मला सोडेचना, तर काकू आता मला ‘चिमुरडीसाहेब’ म्हणते!
- ईशान पुणेकर