नमस्कार विद्यार्थी मित्रानो, येथे आपण बोलणार आहोत ते, ‘अॅप्टिट्यूड टेस्ट - अभिक्षमताचाचणी’बद्दल.

मनुष्य जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या टेस्टना सामोरे जात असतो. त्यावरून त्याची योग्यता ठरवली जाते. रूढार्थाने त्यावरच त्याचे यशापयश अवलंबून असते. याचाच एक भाग म्हणून हल्लीच्या काळात मूल एका विशिष्ट वयात आले, की काही टेस्ट केल्या जातात. त्यात मानसशास्त्रीय टेस्टचा भरणा मोठ्या प्रमाणात असतो. या टेस्ट वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या पद्धतींनीही केल्या जातात. त्यात I.Q. Test, Personality Test, Psychological Test यांचा समावेश असतो. या टेस्ट बरेचदा व्यक्तीची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी केल्या जातात. अनेकदा व्यक्ती जशी बोलत-वागत असते, त्यापेक्षा खूप वेगळा विचार करत असू शकते. त्याचा नेमका धांडोळा घेण्यासाठी या टेस्ट केल्या जातात. त्यातूनच व्यक्तीच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा वस्तुनिष्ठ अंदाज बांधता येतो. आजच्या काळात ‘करिअर’ हा परवलीचा शब्द झाल्यामुळेच अॅप्टिट्यूड टेस्टला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

अॅप्टिट्यूड टेस्ट ही 10 वीनंतरचा शैक्षणिक निर्णय घ्यायला उपयोगी ठरणारी एक मानसशास्त्रीय टेस्ट आहे. बरेचदा अभिरुची व अभिक्षमता यामध्ये आपला गोंधळ होतो. म्हणूनच करिअर निवडीतही अडचणी येतात. म्हणून आधी अभिरुची आणि अभिक्षमता यातील फरक समजून घेऊ. अभिरुची म्हणजे एखादी वस्तू किंवा प्रक्रिया आवडणे, एखादी प्रक्रिया केल्यामुळे समाधान मिळणे. थोडक्यात सांगायचे, तर तो आपला छंद असू शकतो.

अभिक्षमता म्हणजे प्रशिक्षण किंवा सरावाने संपादित केलेले ज्ञान किंवा कौशल्य. अॅप्टिट्यूड टेस्टमधून आपल्यातल्या क्षमता,कौशल्ये लक्षात येतात. त्याच वेळी आपली आवड आणि आपली अभिक्षमता वेगळी असल्याचेही आपल्या लक्षात येते.आपल्याकडे असलेली अभिक्षमता, कौशल्ये या टेस्टमुळे लक्षात आली की, त्या विशिष्ट क्षेत्रात यश मिळवण्याची शक्यता वाढते.

या टेस्टचा उपयोग काय? तर यामुळे मुलांना व पालकांना मुलांच्या कौशल्यांचा, अभिक्षमतांचा वस्तुनिष्ठ आणि तंतोतंत अंदाज येतो. तो अंदाज आला, की मुलाने कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यायचे आणि कोणते करिअर निवडायचे हे नेमकेपणाने ठरवता येऊ शकते. आपल्या या विचाराला नेमकेपणा येण्यासाठी आपल्याला मदत घेता येते ती करिअर समुपदेशकाची.त्यासाठी करिअर समुपदेशनाची सत्रेही घेतली जातात. त्यात मुलाच्या अभिक्षमतेबद्दलची चर्चा करून त्याच्यासाठी कोणते क्षेत्र उपयोगी असू शकते, त्याचे पर्याय सुचवले जातात. 

आजच्या काळात मुलांना अधिकाधिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत, पण आपल्यासाठी नेमकी संधी कोणती, हे शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यासाठी या अॅप्टिट्यूड टेस्टचा पर्याय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरणार आहे.