संगीतातली ऊर्जा

‘’आनंदाने गाऊ या, नाचू या, खेळू या
सुंदर रंगाच्या या जगात, सारे रंगून जाऊ या’’

असं म्हणत धम्माल, नाचत, गात, खेळत जगण्याचं वय .... बालपण!
कसली जबाबदारी नाही, ओझे नाही ......मायेच्या उबदार आधारावर निर्धास्त जगणारं, रमणारं बालवय. आपल्या देशात या बालवयापासून तारुण्यापर्यंत आईवडिलांचा मुलांच्या जीवनाशी, भावविश्वाशी खूप घट्ट बांधलेला रेशीमबंध आपण पाहतो. प्रत्येक पालक आपल्या मुलांना खूप काही देण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या जगण्याला सुंदर आकार मिळावा, अभ्यासाबरोबरच मुलांनी कलेत, खेळात रमावं ही इच्छा असते त्यांची.

      नुकताच आपण सिंधुचा विक्रम पाहिला. तिचा सराव, खेळ यासाठी लागणारी तिची उर्जा जाण्या-येण्यातच खूप खर्च होत होती. कारण राहण्याच्या आणि सरावाच्या जागेतलं अंतर .....मग तिच्या वडिलांनी राहण्याची जागाच बदलली आणि सिंधुची दमणूक थांबली. हे एक उदाहरण. पण एक व्यक्ती उत्तुंग होते, पण त्यामागे मदतीचे अनेक हात असतात. ...प्रत्यक्ष...अप्रत्यक्षही! यातून वेगळी व्यक्तिमत्त्व घडतात, दिपवणारं यश मिळवतात... त्यांना त्यांच्या आवडीची, कौशल्य असलेली गोष्ट करायला मिळालेली असते.

खरं म्हणजे केवळ अभ्यासामागे न लागता मनाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी मुलांना शिकवायला हव्या. शाळेच्या वयात गणित, शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल यांबरोबरच गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला अशा विषयांचा समावेश असतो....आणि असायलाच हवा.

      मी अनेक वर्षे शाळेत संगीत शिकवण्याचं काम केलं. ज्या वर्गाच्या वेळापत्रकात गाण्याच्या तासानंतर गणित, शास्त्राचे तास असतील ते वर्ग या जड विषयात अधिक आनंदाने रमत.... कारण मन प्रसन्न असे. नव्याने अभ्यासाला तयार होई.

      आजच्या धकाधकीच्या जीवनातही खूप तास काम, खूप दूरची अंतर, कामातले बौद्धिक, मानसिक तणाव या सगळ्यांना तोंड देताना किंवा सकाळचे व्यायाम करताना इअरफोन लावून relax होणारे लोक दिसतात. संगीतामुळे ते  Relax  होतातही. कारण संगीतात ती ताकदच आहे.

खरं तर संगीत जीवनाशी खूप जवळचं आहे. अगदी हृदयाच्या ठोक्यांपासून शांत, गोड अंगाईगीतापर्यंत स्वर, लय, भाव बाळाच्या ओळखीचा होतो. लहान मुलांच्या ५ वर्षांच्या वयापर्यंत कलांना खूप स्थान द्यायला हवं. कोणतीही गोष्ट न लादतां मूल कशात रमतं ते पाहायला हवं. या वयातले संस्कार मूल घडवतात असं मानसशास्त्रही मानतं. कला जगण्याला आकार देतात, आनंद तर देतातच.

आपला देश उत्सवप्रिय आहे. वर्षभर सणवार चालतात त्यात सांगितला महत्व असतं.....रांगोळ्या, मूर्तिकला, आकाशदिवे, पणत्या, विविध नृत्य सारं सणांशी, खरं तर मनाशी बांधलेलं आहे. ते आनंदाची उधळण करणारही आहे आणि सृजनशीलही!

      मुलांना आरती, स्तोत्र, श्लोक, कसलाही धाक, नियम न घालता सुरात म्हणायला सोबत घेणं, जशी होईल तशी गणपतीची मूर्ती, आकाशकंदील घरी बनवणं, रांगोळ्या काढणं, ग्रीटींग्स घरी बनवणं ही सगळ्या कलांची सुरुवात आहे. न जाणो कोण कशात रमेल...खुलेल. संधी, दिशा देणं आपलं काम आहे; त्यासाठी प्रबळ इच्छा, थोडे प्रयत्न हवेतच. घरातली माणसं पहिले गुरू आणि मग शाळेचा प्रवास.

५ ते १५ वयाची ही मुलं शाळेत अभ्यास शिकतात आणि शिकायलाच हवा.... त्याचबरोबर त्यांना रमवणाऱ्या कला, पण शिकायला मिळायला हव्या. शाळेत होणाऱ्या गोष्टी जशा एकल असतात, तशाच समूहाच्या पण. मला वाटतं समूहात मूल जास्त धीट होतं, कारण जबाबदारी समूहात वाटली जाते. कार्यक्रम, स्पर्धांमधून धीटपणा, आत्मविश्वास वाढतो. समूहातल्या गायन, वादन, नृत्य, नाट्य, कवायत, वर्गसजावट यातून भावी काळातले कलाकार बीजरूपाने घडायला सुरुवात होते.

      माझ्याकडे लहान वयापासून शिकणाऱ्या संपदा थिटे, प्रियांका बर्वे, गौरी दामले-पठारे, कल्याणी शेळके अशा मुली कलाकार म्हणून झळकताना पाहिल्या की केलेल्या कष्टच चीज झालं असं वाटतं. त्यांच्या घडण्यात त्या मुलींचे, त्यांच्या पालकांचे, अनेक गुरुजनांचे कष्ट आणि महत्त्वही मोलाचेच असते. पण त्यांनी चालायला शिकताना आपल्या बोटाचाही आधार होता याचं समाधान, तृप्ती आहे.

मला वाटतं,

      ‘’गणेशाच्या आरतीतली घंटा असो

नाहीतर मिरवणूकीतला ढोल, ताशा

वारकऱ्यांचा टाळ मृदंगाचा गजर असो किंवा शास्त्रीय संगीताचा जलसा

रंगोलीतले रंग, आकार

      नटवलेल्या चिमुकल्या पणतीच्या प्रकाशाचा आधार

गीतावर थिरकणारी पावलं किंवा छोटुकलं सुरेल गीत

साऱ्याच कलांची ही चिमुकली सुरुवात

      देईल जीवनाला सुंदर आकार!’’

हे सारं लहानग्यांना द्या! ती घडतील....आनंदाची बरसात करतील!

- डॉं. माधुरी जोशी.

[email protected]

(लेखिका संगीत शिक्षण क्षेत्रात गेली ३५ हून अधिक वर्ष कार्यरत आहेत. संगीत शिक्षणात मुलांबरोबर त्यांनी विविध प्रयोग केले आहेत.)