एक सुसंस्कारीत नागरिक, चांगला माणूस घडवायचा असेल तर, ‘शैक्षणिक गुणवत्ता’ एवढाच मर्यादित दृष्टिकोन आपल्याल्या विद्यार्थांच्या वाढीसंदर्भात ठेवता येणार नाही. त्यांचा बालवयापासूनच शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक अशा सर्व  स्तरांवर विकास व्हायला हवा. अशा संतुलित विकासासाठी, प्राचीन भारतीय वैभवशाली परंपरेतून उगम पावलेले, टिकलेले, बहरलेले ‘योगशास्त्र’ हे एकमेव उत्तर आहे. योगाने अगदी वेदकाळापासून ‘मानवी अस्तित्वाच्या पाच पातळ्यातून (पंचकोश) व्यक्तिमत्व विकास’ ही संकल्पना उपनिषदातून ( विशेषत: तैत्तिरीय उपनिषद) जागोजागी मांडलेली आहे.

     महान ऋषी पतंजलींनी, पांतजल योगदर्शन या ग्रंथामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि अशा आठ अंगातून प्रगतीकडे नेणारा अष्टांग मार्ग सांगितला आहे. 

   हठयोगामध्ये आसने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, नादानुसंधानम (ओमकार, भ्रामरी, मंत्र) शिथीलीकरणासाठी, शवासन व योगनिद्रा अशा अनेक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन आहे. या सर्व प्रक्रियांच्या नियमित सरावाने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, आकलनक्षमता, शिक्षण घेण्याची क्षमता, मानसिक स्थैर्य मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झाले आहे.

     ताण-तणाव हे फक्त मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलणारे अधिकारी, डॉक्टर्स, तंत्रज्ञ यांच्या मनातच निर्माण होतात, अशी समजूत अगदी अलीकडच्या काळातपर्यंत होती. परंतु शरीर-मनाच्या ताणाचा हा प्रश्न अगदी बालवाडीतल्या छोट्या मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत सर्वांनाच भेडसावतो आहे, हे आधुनिक वैदयकशास्त्राने मान्य केले आहे. मुलांना होणाऱ्या मनोशारीरिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे.

अगदी लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या एका विद्यार्थिनीला दहावीच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच फक्त 40 ते 50% इतकेच गुण मिळू लागले. तिच्या पालकांनी सर्व प्रकारचे उपचार करून शेवटी तिला मानसोपचार तज्ञांकडे नेले. सततच्या स्पर्धा परीक्षा, अभ्यास, दहावीचे वर्ष, बोर्डाच्या परीक्षेचा ताण अशा अनेक गोष्टींमुळे तिला एकूणच ‘परीक्षा’ या प्रकाराची भीती बसली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. प्रिलिम परीक्षा व बोर्डाची परीक्षा यांच्यामधल्या काळात, या मुलीला, एक महिना दररोज 45 मिनिटांची योगनिद्रा एका योगतज्ञांनी दिली. (योगनिद्रेत हळूवार, संथ, सावकाश सूचना देत बाह्यमन शांत करून निद्रिस्त किंवा सुप्त मनाशी संपर्क साधतो). सुप्तमनाच्या पातळीवर ‘मी दररोज अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवेन’, असा संकल्प मनातल्या मनात म्हणायला सांगितला. संकल्पदृश्याद्वारे, परीक्षेच्या वेळेचे सकारात्मक दृश्य तिच्या डोळ्यांसमोर उभे केले. ‘पेपर्समधील सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थित लिहून उत्तम गुण मिळवलेले आहेत’, असे दृश्य सूचनांद्वारे निर्माण केले गेले. या सर्व प्रयत्नातून तिला बोर्डाच्या अंतिम परीक्षेत 84% गुण मिळाले.

     योगातील सर्वच प्रक्रियांमध्ये अशा प्रकारचे सामर्थ्य, क्षमता आहे. सर्व वयोगटातील मुलांना या प्रक्रिया कशा करता येतील अशी उत्सुकता आपल्या मनात निर्माण झाली असेल.

- मनोज पटवर्धन

[email protected]

 

                                                                                                                    (लेखक गेली १५ हून अधिक वर्षे योग शिक्षण क्षेत्रात कार्यरत  आहेत. )