अलीकडे प्रत्येक ‘स्मार्ट’ कुटुंबात हमखास ‘स्मार्ट फोन’ आढळतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना कदाचित स्मार्ट फोन हाताळण्याबाबत संभ्रम असेल; पण आजच्या किशोर-कुमार (आणि काही बाल)वयीन मुलामुलींना स्मार्ट फोनमधली सर्व फंक्शन्स कशी वापरायची, याची सखोल माहिती असते. ‘शिक्षणविवेक’च्या अशा वाचकांसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणार्‍या, विद्यार्थी मित्रांसाठ उपयुक्त ‘अ‍ॅप्स’ची माहिती यातून मिळेल.

या लेखात आपण तीन उपयुक्त अ‍ॅप्सची ओळख करून घेऊ या. तुम्ही ते वाचा... डाऊनलोड करा... आणि वापरून पाहा!
मुलांना अ‍ॅनिमेटेड कार्टून फिल्म्स खूपच आवडतात. जर अशा प्रकारच्या हलत्या-बोलत्या फिल्म्स बनवण्याची संधी त्यांना मिळाली तर!

Toontastic हे i-pad वरच वापरता येणारे धमाल अ‍ॅप आहे. त्यामध्ये हवी ती पात्रे, प्रसंग, पार्श्‍वभूमी निवडून मुले सहज कार्टून फिल्म्स बनवू शकतात. हवे ते संवाद तयार करून त्याची जोड या फिल्म्सला देता येते. मधुर संगीताची साथही त्या फिल्म्सना देता येते. Toontastic कम्युनिटीवर बनवलेल्या फिल्म्स इतरांना पाहाता याव्या, यासाठी ठेवताही येतात.

Toca kitchen monsters हे मुलांसाठीचे विनामूल्य अ‍ॅप आहे. हे खरे तर स्वयंपाकाविषयीचे लोकप्रिय डिजिटल खेळणे आहे. या खेळातले दोन छोटे राक्षस स्वयंपाकघरात कसे वावरतात? आठ प्रकारचे पदार्थ कसे बनवतात? कसा धुडगूस घालतात? कसे चित्रविचित्र आवाज काढतात? हे अनुभवायला तुम्हाला खूप आवडेल. स्वयंपाकघर नीटनेटके कसे ठेवावे? खाद्यपदार्थ तयार करताना काय करावे लागते, हे मुलांना आपोआप समजते. आपल्याकडे अद्यापही मुलांनी स्वयंपाकघरात स्वत:हून आत्मविश्‍वासाने वावरण्याची प्रथा नाही, म्हणूनच हे अ‍ॅप पालकांनी मुलांना अवश्य हाताळू द्यावे.

Faces I make -  Right  Brain creativity हे कल्पनाशक्तीला चालना देणारे सर्वोत्तम अ‍ॅप आहे. वेगवेगळ्या वस्तू, फळे, फुले, कागदाचे कपटे यांचा वापर करून चक्क मानवी चेहर्‍याची आकृती तयार करण्याची प्रेरणा देणारी ही सुविधा आहे. मुलांनी तयार केलेल्या कलाकृती दुसर्‍यांसाठी प्रदर्शित करण्यासाठी येथे faceworld हे दालन आहे. त्यासाठी ई-मेल किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत घेता येते. येथे असे चेहरे कसे बनवावेत यासाठीचे व्हिडिओ मार्गदर्शनसुद्धा आहे. या ठिकाणी असलेल्या रंगीबेरंगी, चित्तवेधक चित्राकृतींमुळे तुमचा वेळ खूप मजेत जाऊ शकतो.

(मात्र, हे अ‍ॅप केवळ आयपॅडवर चालते व त्यासाठी तीन डॉलर्स (रु.180/-) खर्च येतो.)

तर मग मित्रांनो, आपल्या पालकांच्या परवानगीने व मदतीने ही तीन अ‍ॅप्स डाऊनलोड करा आणि मस्त एन्जॉय करा. तुमचे अनुभव मित्र-मैत्रिणींना अवश्य सांगा आणि तुम्हाला हे अ‍ॅप कसे वाटले, त्याविषयी नक्की कळवा.

- विवेक मेहेत्रे