जगभरात विविध प्रकारची लोकं कोणतीही पार्श्वभूमी नसताना, मदत नसताना प्रचंड कष्टाने पुढे जातात. आपले इप्सित साध्य करतात. अशांकडून शिकण्यासारखे खूप काही असते. त्यांच्यातील ध्येयासक्ती आपल्यालाही खूप काही देऊ शकते. आपल्यातली ठिणगी पेटवण्याची किमया हा विभाग नक्की करणार आहे. तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. असे अनुभव नक्की पाठवा. त्यासाठी उत्तम लेखक असायची अट नाही, तर अनुभवातील सच्चेपणा खूप काही साधत असतो... अशा तुमच्या अस्सल, प्रेरणादायी अनुभवांच्या प्रतीक्षेत......

 

 

श्रीकांत पंतवणेची प्रेरणादायक कहाणी

 

तो नेहमी म्हणत असे की, ‘तीन चाकं हेच माझं जीवन आहे, त्यातूनच मला सारं जग बघायचं आहे.’ आणि खरोखरच त्याने स्वत:चं स्वप्न साकार करून दाखवलं. चार वर्षांपूर्वी तो नागपुरातील रस्त्यांवर रिक्षा चालवत होता; आणि आज; आज तो ‘इंडिगो एअरलाईन्स’चं विमान उडवत आहे.

तर या व्यक्तीचं नाव आहे श्रीकांत पंतवणे. तो १२ वीपर्यंत शिकला होता. त्याला इंग्रजी येत नव्हतं. वडील चौकीदार. कुटुंब एवढं गरीब की तोच काय, तर परिवारातील कोणतीही व्यक्ती मोठी स्वप्नं बघूच शकत नव्हती. तरीही त्याने स्वप्न बघितलंच. एकदा रिक्षातून सामान पोहोचवण्यासाठी तो नागपूर विमानतळावर गेला.

प्रथमच रन वेवर उतरणार्‍या विमानाच्या चाकांचा कान फुटतील एवढा मोठा आवाज त्याने ऐकला. कोणतं तरी विमान खाली उतरलं होतं. थोड्याच वेळात युनिफॉर्म घातलेले काही लोक समोरून येताना त्याने बघितले. त्यांच्याविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यांच्याबद्दल त्याने चहाच्या दुकानाजवळ उभ्या असलेल्या काही सुशिक्षित लोकांना विचारलं. ‘‘युनिफॉर्म घातलेले लोक पायलट आहेत व ते विमान चालवतात - उडवतात.’’ असं त्यांनी सांगितलं. त्याला राहावलं नाही आणि त्याने पुन्हा प्रश्न विचारला, ‘‘ पायलट कसं होता येतं?’’ त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर त्याची हिंमतच खचली. पायलट होण्यासाठी जेवढ्या पैशांची आवश्यकता होती, तेवढे पैसे तर त्याच्याकडे नव्हतेच; शिवाय पुरेसं शिक्षणही नव्हतं, परंतु त्याने दृढ निश्‍चय केला की, पायलट व्हायचंच. त्या लोकांपैकी कुणीतरी त्याला सांगितलं की, पायलटचं ट्रेनिंग १२वी पास झाल्यावरच घेता येतं व त्यासाठी सरकारकडून स्कॉलरशिपही मिळते.

त्यानंतर त्याने १२ वीचा अभ्यास सुरू केला. दिवसा रिक्षा चालवायची आणि रात्री अभ्यास करायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. आवश्यकता लक्षात घेऊन त्याने फिजिक्सवर अधिक लक्ष केंद्रित केलं. अखेर २०११ मध्ये त्याला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याआधारे मध्य प्रदेशातील सागर येथे ‘चाईम्स अ‍ॅव्हिएशन अकादमी’मध्ये त्याला प्रवेशदेखील मिळाला; परंतु येथे नवा संघर्ष सुरू झाला. एकतर इंग्रजी शिकणं जरूरी होतं. शिवाय आवश्यक ती पुस्तकं खरेदी करणं तर दूरच राहिलं, ती झेरॉक्स करून घेण्याएवढेही पैसे नव्हते. परंतु हार न मानता त्याने लायब्ररीची मदत घेतली. रोज रात्री उशिरापर्यंत लायब्ररीत बसून तो इंग्रजी शिकत असे, असेसमेंटची तयारी करत असे आणि प्रत्येक असेसमेंटमध्ये त्याचं नाव सर्वांत वर असे. दोन वर्षांनी कोर्स पूर्ण झाला; पण नोकरी मिळत नव्हती. तो नागपूरला परत आला, तेथे एका कंपनीत नोकरी करू लागला; पण मन स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याने पुन्हा तयारी सुरू केली. खूप मेहनत घेतली आणि त्याला यश मिळालं. अन्य एका स्कॉलरशिपच्या मदतीने त्याला २०१३ सालच्या शेवटी हैद्राबादच्या ‘सेंट्रल ट्रेनिंग एस्टॅब्लीशमेंट’मध्ये प्रवेश मिळाला. तेथेच ‘इंडिगो’ कंपनीसाठी कॅम्पस सिलेक्शन झालं. अखेरीस एप्रिल २०१५ मध्ये त्याच्या स्वप्नाला सत्याचे पंख लाभले. श्रीकांत कंपनीचा को-पायलट झाला. आता तो खराखुरा हवेत उडतोय आणि आकाशाशी संवाद साधतोय, गप्पा मारतोय.

- सुधा बोडा

 

(श्रीकांतची कहाणी त्याचा मित्र श्रीराम आणि त्याचा ज्युनिअर सीबीएन यांनी सांगितली.

दैनिक दिव्यभास्कर, बडोदा एडिशनमध्ये ता. २१/६/२०१५ रोजी श्रीकांतच्या संघर्षाची व यशाची गोष्ट आली होती. त्याचा हा मराठी अनुवाद.)