सूर्याच्या उष्णतेचे विविध वापर सोप्या पद्धतीने कसे करता येतील याविषयीची माहिती..... 

ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या प्रकारांचा विचार केल्यास ऊर्जेचे दोन प्रकार आहेत.


पारंपरिक ऊर्जा : मुख्यत्वे कोळसा जाळून निर्मिलेली.

अपारंपरिक ऊर्जा : सौर ऊर्जा, वायू ऊर्जा.

अपारंपरिक ऊर्जा म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर प्रथम येते ती सौर ऊर्जा. आज आपण त्याची अधिक माहिती करून घेऊ या.     

सौर ऊर्जेमध्ये दोन भाग आहेत. 

1) सोलर पी.व्ही. (photovoltaic) आणि 2) सोलर थरमल या दोन्हींसाठी लागणारी पॅनल्स वेगवेगळी असतात. 

1) सोलर पी.व्ही. : या पॅनल्समध्ये सिलिकॉन सेल्स (silican cells) बसवलेल्या असतात. सूर्यप्रकाशामध्ये यातून डी.सी. विजनिर्मिती केली जाते व ती बॅटरीमध्ये संचयित (साठवली) केली जाते. गरज असेल तेव्हा (संध्याकाळी) बॅटरीतून घेतली जाते.

2) सोलर थरमल : यासाठी सूर्यकिरणातील उष्णतेचा वापर केला जातो. जसे,

अ) पाणी गरम करण्यासाठी (solar water heater)

ब) अन्न शिजवण्यासाठी (solor cooker)

क) अन्नपदार्थ सुकवून टिकवण्यासाठी (solor dryer)

वरील तिघांच्या वापरामुळे सध्या होणारा पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी करता येऊ शकतो.

अ) सोलर वॉटर हिटर : या संचात तीन भाग असतात.

सर्वात वर : गार पाण्याची टाकी (टाकी १)

त्या खाली : गरम पाण्याची टाकी (टाकी २)

त्या खाली : सोलर पॅनल्स

टाकी १ मधील थंड पाणी गुरुत्त्वाकर्षणाने सोलर पॅनलमध्ये जाते व गरम होते. गरम पाणी हलके असल्याने thermo-syphon तत्त्वाने वर चढते व टाकी २ मध्ये साठून राहते. हेच गरम पाणी पाईपने बाथरूममध्ये पोहोचवले जाते.

विद्यार्थ्यांनो, तुमच्या एक लक्षात आले असेलच, की सकाळी कितीही लवकर गरम पाणी हवे असले तरी मिळते, कारण आदल्या दिवशी गरम झालेले पाणी टाकीत साठून असते.

जितके जास्त गरम पाणी/प्रतिदिन लागणार, त्याप्रमाणे panels ची संख्या व टाकीचे आकारमान ठरते. यासाठी ४ ते ५ तास/प्रतिदिन सूर्यप्रकाश मिळणारी जागा लागते.

ब) सोलर कूकर : यात काचेचे झाकण असलेला बॉक्स असतो. आतमध्ये उष्णतावाहक डब्यामध्ये शिजवण्याचे अन्नपदार्थ ठेवलेले असतात. बॉक्सला काचेचे झाकण असते. या झाकणातून सूर्यप्रकाश आत येऊ शकतो; पण उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. एका वेळेचे अन्न शिजवण्यासाठी २ ते ३ तास लागतात. यात भात व डाळ चांगली शिजू शकते.

क) सोलर ड्रायर : त्यामानाने कमी माहिती असलेले, पण फार उपयोगी असे हे उपकरण आहे. यामध्ये अन्नपदार्थ सुकवून दीर्घकाळ टिकवता येतात. जसे; फळांचे काप, फळभाज्यांचे काप, पालेभाज्या, कांदा काप, बटाटे काप, इत्यादी. तसेच, याला कडक सूर्यप्रकाशाचीही गरज नसते. थोड्याशा प्रयत्नाने याचे सर्वात प्राथमिक मॉडेल घरीही बनवता येऊ शकते.

कृती :

१) जुन्या टेबलचा ड्रॉवर घ्या.

२) त्याला आतल्या बाजूने सिल्व्हर फॉईल लावा.

३) वरून पारदर्शक कागद अलगदपणे लावा; ज्यायोगे हवा आत-बाहेर होऊ शकते.

बस्स, झाले. आता ड्रॉवरमध्ये सुकवण्याचे अन्नपदार्थ व्यवस्थित पसरून ठेवा. आता आपला ड्रॉवर त्या प्लास्टिकच्या आच्छादनासह एखाद्या हवेशीर ठिकाणी ठेवून द्या. (थोडे तरी ऊन येऊ द्यावे.)

संध्याकाळी बघा, आतील पदार्थ कसे कुरकुरीत सुकतात ते. विद्यार्थ्यांनो, वरील माहिती वाचून हे करून बघणार ना!

- अनिरुद्ध काशिनाथ देशपांडे