राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या तसेच सर्व शैक्षणिक मंडळांशी संलग्नित प्राथमिक व माध्यमिक शाळांनी ‘समृद्ध शाळा’ प्रकल्पामध्ये सहभागी होऊन २८ फेब्रवारीपर्यंत शाळेचे मूल्यमापन पूर्ण करायचे आहे. तसेच सर्व माहिती ‘स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड’वर भरणे अनिवार्य केले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.
शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे, यासाठी विविध राज्यांतील शैक्षणिक कृती प्रकल्पांचा अभ्यास करून राज्यात स्वतंत्रपणे समृद्ध शाळा प्रकल्प गेल्या वर्षी राबवण्यात आला. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावनिक आणि बौद्धिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या शाळांनी चांगल्या पद्धतीने शाळा सिद्धी उपक्रमाची अंमलबजावणी केली त्यांना नुकतेच ‘एसए (शाळा सिद्धी) ’ या विशेष प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
यावर्षीदेखील या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. यानुसार सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांची माहिती ‘स्कूल इव्हॅल्युएशन डॅशबोर्ड’वर भरणे शाळांना अनिवार्य केले आहे. यामध्ये आतापर्यंत जिल्हास्तरावरील व तालुक्यातील ज्या शाळांनी शाळा सिद्धी कार्यक्रमाकरिता नोंदणी केली आहे, त्यांची माहिती विद्याप्राधिकरणाला वेळोवेळी डॅशबोर्डवरून उपलब्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची माहिती विद्या प्राधिकरणाला मिळेल. संबंधित माहिती डॅशबोर्डवर भरणाऱ्या शाळांना विविध श्रेण्यांचे वाटप करण्यात येईल. यामध्ये ज्या शाळा ‘अ’ श्रेणी मिळवतील अशाच शाळांची विद्याप्राधिकरणाच्या वतीने बाह्य मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाने पार पाडलेल्या अंतर्गत व बाह्य मूल्यमापनाच्या प्रक्रियेच्या आधारे शाळांना ‘समृद्ध शाळा २०१६-१७’ या प्रमाणपत्राने गौरविण्यात येणारआहे, अशी माहिती निर्णयात दिली आहे.

                                                           ( सौजन्य-महाराष्ट्र टाइम्स )