थेंबाची गोष्ट

हिरवं हिरवं, चमकदार गवत... बाजूनं भली मोठ्ठी स्वच्छ, चकचकीत झालेली झाडं... त्यामधून मस्तपैकी या काठावरचं, त्या काठावरचं गवत पहात, दगडांशी खेळत झुळुक झुळुक वाहणारी नदी. किती दिवस नदी पाऊस धारांची वाट पहात होती. तेव्हाच आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि मस्तपैकी टप्पोरे थेंब आकाशातून थेट टपाटपाटप खाली आले. छोटा चिंटू त्या नदी जवळच उभा होता. पावसाची टपटप पाहून त्यानं आपल्या इवल्याशा हातांचा द्रोण केला. एक मोठ्ठा थेंब टुणुकन् त्याच्या हातात पडला. चिंटूनं त्याला दुसर्‍या हातानं अलगद बंद केलं.

त्या टपोर्‍या थेंबाला एकदम छान ऊब मिळाली. मऊ-मऊ वाटलं. एवढं जोरात वरून पडल्यामुळे त्याला दमायला झालं. असंच इथे जरावेळ थांबावं असं वाटलं. चिंटूनं तो थेंब हळूच एका हिरव्यागार पानावर ठेवला. पाऊसाच्या सरी थांबल्या आणि हळूच आकाशाची खिडकी उघडून ऊन बाहेर आलं. त्याचा एक कवडसा त्या इवल्याशा थेंबावर पडला. तो थेंब एकदम चकाकायला लागला. चिंटूला त्याच्यामध्ये कित्तीतरी रंग दिसले. निळुला, हरूला, जांभळुला, पिवळुला..... चिंटू त्या रंगांकडे बघतच बसला. त्याने तो थेंब पुन्हा आपल्या हातावर घेतला. आपल्या छोट्याशा मनीमाऊच्या डोक्यावरच ठेवला. मनीमाऊनं हिरा घातल्यासारखं वाटलं चिंटूला. चिंटू तो थेंब घेऊन गेला नदीवर. तेवढ्यात त्याच पाय घसरला आणि हातातला थेंब गेला नदीत वाहून....

थेंब एकदम नदीमध्ये टपकन् पडला आणि वहात वहात पुढे गेला. त्या थेंबालापण एकदम उड्या मारता मारता दमायला झालं. इकडे चिंटू लागला रडायला... आई-बाबांनी समजावलं तुला दुसरा थेंब मिळेल पुन्हा पाऊस आला की पण त्याला तोच थेंब हवा होता.

नदीतून पोहत पोहत थेंब गेला समुद्रात. एवढं मोठ्ठं पाणी त्यानं पाहिलंच नव्हतं. त्याला पण चिंटूच्या मऊ-ऊबदार हातांची आठवण झाली.

खूप दिवस झाले. पाऊस थांबून हळूहळू थंडी पडायला लागली. समुद्रातला थेंब कधी कुडकुड थंडीनं गारठून जायचा तर कधी त्याचं उन्हानं अगदी पाणी पाणी होऊन जायचं. एका छोट्याशा दगडातल्या शेवाळ्यात हा थेंब बसून राहिला होता.

हळूहळू काय झाली गंमत, उन्हानं आकाशाच्या सगळ्या दारांमधून-खिडक्यांमधून डोकावायला सुरूवात केली. खूप खूप उन्हाचे चटके बसायला लागले. समुद्रातल्या, नद्यांमधल्या पाण्याची वाफ व्हायला लागली. तो टपोरा थेंब पण वाफ होऊन उडत उडत पुन्हा आकाशात गेला. तिथे थोडा विसावला. पण अजूनही तो वरून चिंटू कुठे दिसतो का ते पहातच होता. पुन्हा आपल्याला ते मऊ मऊ हात कधी भेटणार, तो विचार करत राहिला.

वाफेतला थेंब किती फिरत फिरत पुन्हा आपल्या घरी आला. वाफ खूप खूप वर गेली. तिथे थंडीनं हुडहुडी भरून पुन्हा थेंब आपल्या रूपात तयार झाला. तो टप्पोरा होत गेला. तिथे त्याला त्याचे इतर मित्र थेंब भेटले. सगळे एक झाले. मोठ्ठे ढग तयार व्हायला लागले आणि थेंब अधिकच टप्पोरा झाला. आता त्याला कळलं आपण पुन्हा जोरात खाली उडी मारणार थोड्याच दिवसांत.

ढग गडगडायला लागले. एकमेकांशी मारामारी करायला लागले. थेंब इतका मोठ्ठा झाला की आपल्या सगळ्या मित्रांबरोबर पटापट त्यानं खाली उडी मारली.

चिंटू पावसाची आणि त्या थेंबाची वाट पहात होता. तोच थेंब परत येईल का माझ्या हातात. चिंटू नदीच्या शेजारी उभा राहिला. हाताचा द्रोण करून. आणि टप् टपप टपपपप. एक थेंब त्याच्या हाताच्या द्रोणात आला. तसाच चमकदार, चकचकीत. तजेलदार. चिंटूला ओळख पटली. त्यानं हळूच आपला हात बंद केला. हाच तो मऊ-मऊ हात. कध्धीपासून मी वाट पहात होतो या मऊ-मऊ हातांची. थेंब म्हणत होता आता मला सोडून नको देऊस. मला तुझ्याकडेच रहायचं आहे. चिंटूनं पण अलगद तो थेंब हातात धरून ठेवला. पाण्याचा, पावसाचा थेंब पण चिंटूनं त्याला जिवापाड जपायचं ठरवलं होत.    

                                     -स्वराली गोखले
                                     [email protected]