निसर्गाचे रूप मनोहर

निसर्ग आणि माणूस यांचं नातं फार जवळचं आहे. कारण निसर्ग आहे म्हणून माणूस आहे आणि आपणच आपला निसर्ग वाचवला पाहिजे. आता निसर्ग वाचवायचा म्हणजे नक्की काय करायचं.. नक्की काय वाचवायचं असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. त्यासाठी निसर्ग म्हणजे काय हे आधी समजावून घेतलं पाहिजे. निसर्ग म्हणजे फक्त झाड, पाणी, पर्वतच नव्हे तर आपल्यासकट आपल्या सभोवार असलेलं सर्व चराचर म्हणजे निसर्ग. निसर्गामध्ये अगदी छोट्या कीटकापासून ते वाघापर्यंत सर्व घटक खूप महत्त्वाचे आहेत. या स्तरातील सर्व घटकांचे वेगवेगळ्या प्रकारे संगोपन करावे लागते. आता हेच उदाहरण पहा ना... सध्या वाघांची संख्या कमी झाली आहे म्हणून " वाघ वाचवा " ही मोहीम सरकार आणि इतर अनेक संस्थांनी हाती घेतलेली दिसते. आता वाघांबरोबरच अनेक झाडे आणि अनेक लहान जिवांचीसुद्धा संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, पण त्याकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. किबहुना याची कल्पनाच नसते. अन्नसाखळीमध्ये वाघ महत्त्वाचा आहे आणि तो वाचवलाच पाहिजे. पण त्याचबरोबर झाडे-झुडपे, नदी-नाले, डोंगर-दऱ्या यांचेसुद्धा संगोपन करणे तितकेच जरुरीचे आहे. कारण हे कुठल्या ना कुठल्या तरी प्राणी किंवा पक्षांचा उत्तम अधिवास (HABITAT) असू शकतो. त्यामुळे आपल्या नकळतच आपण एखाद्याचा अधिवास नष्ट करत असतो किंवा रक्षण करत असतो. आता हेच पहा ना एखादे जुने वाळलेले झाड. आपल्या दृष्टीने पाहायला गेलं तर निरुपयोगी आहे, पण त्यातच कितीतरी प्रकारचे कीटक आणि मुंग्या आपली वस्ती करून असतात. याच मुंग्यांवर आणि कीटकांवर अवलंबून असणारे काही पक्षी आणि सरपटणारे प्राणी त्यांच्या अवतीभवती असतात. आपण जर हे वाळलेले झाड तिथून काढून किंवा जाळून टाकले असते, तर या सर्वांच्या वस्तीवरच घाव बसला असता. सांगायची गोष्ट एवढीच की, निसर्गातल्या या छोट्याछोट्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत. आपल्या आसपासच्या, घराजवळच्या पाणथळ जागा, बागेतील एखादा मोठा वृक्ष किंवा झुडूप, जुने वाडे यांसारख्या अनेक जागा अनेक जिवांची वसतिस्थाने असू शकतात. मनुष्य सोडून इतर सर्व प्राणी आणि पक्षी आपापली कामे अगदी नेमून दिल्यासारखी करत असतात. बदकं, कोंबडे असे काही पक्षी अंडी उबवण्याची आणि नंतरच्या संगोपनाची सर्व जबाबदारी माद्यांकडे सोपवतात. तर काही जातीमध्ये नर ही सर्व जबाबदारी स्वीकारतो. त्यांच्यामध्ये राग-लोभ असं काही नसतं. कुठलेही मतभेद होत नाहीत. हे सगळं आपल्या डोळ्यादेखत रोजच होतं असत; पण आपण कुणी त्याची दखल घेत नाही. किंबहुना आपल्याला हे दिसतच नाही. अशा बारीकसारीक घडणाऱ्या गोष्टी जेव्हा दिसायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण निसर्ग वाचवू शकतो. सध्या तरी या सर्वांचा समतोल राखणं तर दूरच, आपण सगळेच निसर्ग संपत्तीचा विनाश आणि प्रदूषण यावरच लक्ष देत आहोत. आपण वास्तविक नैसर्गिक संपत्तीचा उपयोग फारच कौशल्याने करायला हवा. निसर्गाचं सखोल ज्ञान मिळवावं लागेल; तरच उंचावणारी जीवनशैली आपणास राखता येईल, असे मला वाटते. 

- अमोल बापट
[email protected]