शाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संतोषनगर

ता. रोहा, जि. रायगड

 प्रयोग : बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे...

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. त्यातही काही भागांत आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत.  आदिवासी पाड्यावर असलेल्या शाळांमध्ये प्रमाणभाषेची अडचण मोठ्या प्रमाणात जाणवते. अध्ययन-अध्यापनात जर प्रमाणभाषा वापरली जात असेल, तर विद्यार्थी शाळेत येण्यास निरुत्साही दिसतात. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षक गजानन जाधव यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू केला. जिल्हा परिषदेच्या शाळेत इ.1लीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर पुस्तकातील आणि शिक्षकांच्या तोंडी असलेल्या प्रमाणभाषेचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. मुले शाळेत येण्यास निरुत्साही दिसू लागली. शिक्षक त्यांना आपले वाटत नव्हते. हे लक्षात घेऊन जाधवसरांनी कातकरी बोलीभाषेचा अभ्यास केला. सुरुवातीला दैनंदिन वापरातील कातकरी शब्द शिकून घेतले. अशा 100 शब्दांचा शब्दकोश त्यांनी तयार केला. कातकरी भाषेत शिक्षकांना बोलता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आपलेपणा वाटू लागला, त्यांच्यातील संवाद वाढला. त्यामुळे मुलांची शाळेतील उपस्थिती वाढू लागली. आता गरज होती मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याची. त्यासाठी पुन्हा जाधवसरांनी कातकरी भाषेचा अभ्यास सुरू केला. इ.1लीची मराठी, गणित विषयाची जवळजवळ संपूर्ण पुस्तके कातकरी भाषेत भाषांतरित केली. चालीवर कविता म्हणणे, चित्रकथा वाचणे, संवाद साधणे असे उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली. आपल्या भाषेत शिक्षण मिळू लागल्यावर मुले अधिक आनंदी व उत्साही दिसू लागली. या बदलानंतर प्रत्येक वर्षी नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना पहिले सहा महिने बोलीभाषेतून शिक्षण मिळू लागले. त्यानंतर हळूहळू प्रमाणभाषेकडे मुलांना वळवण्यात आले. जाधवसरांनी घेतलेल्या या कष्टांमुळे आदिवासी मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यास मदत झाली. भाषेचा अडसर दूर झाल्याने विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया वाढल्याने गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेले हे प्रयत्न अत्यंत कौतुकपात्र आहेत.

जाधवसर एवढ्यावर थांबले नाहीत. या उपक्रमांचा  फायदा महाराष्ट्रातील इतर आदिवासी भागातील शिक्षकांना व्हावा यासाठी त्यांनी या सर्व साहित्याची पी.डी.एफ. फाईल तयार केली आणि ती वितरीत करण्यास सुरुवात केली. तसेच व्हॉटसअॅपवरही या पी.डी.एफ. फाईल्स मागवण्याची सोयही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक आदिवासी पाड्यांवरील शाळेत झाला तर, तेथील प्रत्येक मूल शाळेत येईल, टिकेल, शिकेल आणि प्रगत होईल आणि त्याच वेळी गजानन जाधव यांनी तीन वर्षे सातत्याने अमलात आणलेल्या या प्रयोगाला व्यापक यशही मिळेल.

संपर्क : गजानन जाधव 9923313777

शाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,

ढाणकेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली

प्रयोग : ई-लर्निंग शैक्षणिक साहित्याची निर्मिती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढाणकेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली या शाळेतील शिक्षक प्रविण डाकरे यांनी आनंदायी शिक्षणासाठी एक वेगळा प्रयोग केला.

मुलांनी शाळेत रमावे, त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे; यासाठी त्यांनी संगीतमय बाराखडी, मुळाक्षरांची ऑडिओ व व्हिडिओ निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी इ.1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील मराठी व इंग्रजी कविता स्वत: संगीतबद्ध केल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या शाळेतील दोन विद्यार्थिनींचा सहभाग आहे. या सर्व कवितांची ऑफलाईन अॅप्स निर्मितीही त्यांनी केली आहे.

आपल्या प्रयोगाविषयी सांगताना प्रविण डाकरे म्हणाले, ‘मुलांना शिकवताना ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्सचा प्रभावी वापर होतो. कविता ऐकण्यासाठी विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. 2012पासून मी सुरुवात केली.  सुरुवातीला हा प्रयोग माझ्या शाळेत केला. आता अनेक शाळेत याचा वापर होतो. जून 2016पासून मी ऑफलाइन अॅप्सची निर्मिती सुरू केली. यासाठी शिक्षक, विद्यार्थांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.’

प्रविण डाकरे यांनी निर्माण केलेले सर्व शैक्षणिक साहित्य pravindakare.blogspot.in उपलब्ध आहे. ‘शिक्षणाची वारी 2016’चे गीतही प्रविण डाकरे यांनी संगीतबद्ध केले आहे. शैक्षणिक साहित्याबरोबरच लेजीम मार्गदर्शनाचे व्हिडिओही त्यांनी तयार केले आहेत.

संपर्क : प्रविण डाकरे 9423309214