भूगोल - अवकाशीय वेधशाळा
दिंनाक: 21 Jan 2017 14:47:32 |
पृथ्वीपासून कितीतरी मैल दूर असणार्या चंद्र, सूर्य, मंगळ अशा अनेक ग्रह-तारे यांविषयी असणार्या उत्सुकतेपोटी आजवर या विषयात संशोधन झाले आहे आणि होत आहे. या कुतूहलातूनच मानवाने चंद्र, मंगळ या ग्रहांवर पाऊल ठेवले. विश्वाची रचना नेमकी कशी आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील खागोलशास्त्रज्ञ सतत करत आहेत. या संशोधनाचाच एक भाग म्हणून विविध उपग्रह अवकाशात सोडले जातात.
भारतानेही खगोलीय संशोधनसाठी २८ सप्टेंबर रोजी ‘अॅस्ट्रोसॅट’ उपग्रह अवकाशात सोडला. पृथ्वीच्या कक्षेत स्थापीत करण्यात आलेला हा उपग्रह म्हणजे एक वेधशाळाच आहे. ‘अॅस्ट्रोनॉमी’ सॅटेलाइटवरून ‘अॅस्ट्रोसॅट’ असे याला नाव देण्यात आले. २८ सप्टेंबर रोजी अॅस्ट्रोसॅट वेधशाळेने ‘इस्त्रो’च्या धुव्रीय उपग्रह प्रक्षेपक (पी.एस.एल.व्ही.) मार्फत अवकाशात झेप घेतली. अवघ्या २२ मिनिटांमध्ये ६५० किलोमीटरचा प्रवास करून अॅस्ट्रोसॅट तिच्या ठरावीक कक्षेत स्थापीत केली गेली. १६ हजार ५१३कि.ग्रॅ. एवढे अॅस्ट्रोसॅटचे वजन असून, त्यावर अनेक उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. पुढील पाच वर्षे अॅस्ट्रोसॅट कार्यरत राहणार आहे आणि दिवसाला पृथ्वीच्या १४ प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. अॅस्ट्रोसॅटबरोबर अमेरिकेच्या चार, इंडोनेशियाच्या एक, कॅनडाच्या एक अशा एकूण सहा कृत्रिम उपग्रहांचेही प्रक्षेपण केले. अॅस्ट्रोसॅटच्या या तांत्रिक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अॅस्ट्रोसॅट संपूर्णत: भारतीय बनावटीची वेधशाळा आहे.
अॅस्ट्रोसॅट वेधशाळेची तांत्रिक माहिती तर मिळाली, पण अॅस्ट्रोसॅट अवकाशात नेमके काय करणार असा प्रश्न पडला ना! तर या वेधशाळेमुळे आपल्याला खगोलीय घटना व खगोलीय वस्तूंची सखोल माहिती मिळू शकणार आहे. एकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्ट्याचे निरीक्षण करणे यामुळे सहजसोपे होणार आहे. दृश्य, अतिनील, मृदू आणि कठीण क्ष-किरण अशा विविध तरंगलहरींमध्ये अंतराळातील वस्तूंचा वेध अॅस्ट्रोसॅटद्वारे घेता येणार आहे. जगभरातून खगोलीय अभ्यासाठी अनेक उपग्रह, दुर्बिणी पृथ्वीभोवती सोडलेल्या आहेत, पण अॅस्ट्रोसॅटची निरीक्षण क्षमता या सर्वांपेक्षा अधिक आहे आणि हेच भारताच्या या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे.
जागतिक पातळीवर खगोलशास्त्रीय संशोधनात पाऊल पुढे टाकत भारतीय शास्त्रज्ञानांनी एक नवी सुरुवात केली आहे. यामागे भारतीय शास्त्रज्ञांची २० वर्षांची मेहनत आहे. १९९६ साली अॅस्ट्रोसॅटची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. त्यावर सखोल अहवाल सादर केल्यानंतर २००४ साली केंद्र सरकारने या मोहिमेला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर १५ वर्षांच्या कालावधीत भारतीय शास्त्रज्ञांच्या अतोनात मेहनतीने ही मोहीम पूर्णत्वास आली. त्यामध्ये भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्था (टी.आय.एफ.आर.) इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे (आयुका), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स बेंगळुर (आय.आय.ए.), रामन रिसर्च संस्था, बंगळूर (आर.आर.आय.) आणि इस्त्रो या संस्थांचा समावेश आहे.
भारताच्या या यशस्वी मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या पाठोपाठ अवकाशाच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा भारत चौथ्या क्रमाकांचा देश ठरला आहे. या मोहिमेतून भारतीय शास्त्रज्ञांना नवीन माहिती मिळेल. त्याचा खगोल संशोधनाला नक्कीच फायदा होईल, संशोधनाचे नवे मार्ग सापडतील. शास्त्रज्ञांनी हाती घेतलेल्या या मोहिमेला सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आहेतच.
- रेश्मा बाठे
- [email protected]