भाषा शिकण्याची क्षमता जन्मापासूनच

पर्ल झू नावाची एक लेखिका आपल्या ‘थिंकिंगेअर’ नावाच्या पुस्तकात म्हणते, “भाषा शिकणं म्हणजे एक नवी खिडकी उघडण्यासारखं असतं. ही खिडकी  आपल्याला जगाकडे अधिक जवळून बघायला शिकवते”.

“मुलांना वयाच्या कितव्या वर्षापासून परकीय भाषा शिकवायला सुरुवात करावी?”, असा प्रश्न मला एक भाषातज्ञ म्हणून नेहमी विचारला जातो. त्याला माझं उत्तर “त्यांच्या जन्मापासून” असं असतं. एक भाषाशिक्षिका म्हणूनच नव्हे, तर एक आई म्हणूनसुद्धा मी तेच सांगेन. जितक्या जास्त भाषा आणि जितक्या आधीपासून मुलांच्या कानावर पडतील, तितकं मुलं त्या लवकर ग्रहण करतात, हे मी स्वानुभवावरुन सांगू शकते. घरात जर कुणी मातृभाषेव्यतिरिक्त इतर कुठल्या भाषेचा जाणकार असेल, तर जसं आपण मुलांना भरवताना काऊ-चिऊच्या गोष्टी सांगतो, तसंच त्यांना इतर भाषांमधली गाणी ऐकवायलाही काही हरकत नसते.

     पहिली एक-दीड वर्ष मुलांचा स्वभाव फक्त ऐकण्याचा असतो. त्यात जी भाषा त्यांच्या जास्तीतजास्त कानावर पडेल, त्याच भाषेतील शब्द अगदी नैसर्गिकरित्या त्यांच्या तोडून बाहेर पडतात. याचं एक कारण असं सांगता येईल, की मुलं अनुकरणप्रिय असतात. “आई जे बोलतेय, ते व्याकरणदृष्ट्या बरोबर की चूक” हा विचार करण्याची त्यांची मानसिक व बौद्धिक क्षमता नसल्याने. ती हुबेहूब आईची नक्कल करतात. दोन वेगळ्या भाषा स्वतंत्रपणे ओळखायलाही मुलं लगेच शिकतात. या बाबतीतला एका फ्रेंच भाषा शिक्षकाचा अनुभव फार बोलका आहे.

आपण लहान मुलांना पाण्याला ‘पापा’ म्हणायला शिकवतो. फ्रेंच भाषेत ‘पापा’ या शब्दाचा अर्थ इंग्रजीप्रमाणेच वडील असा आहे. त्यामुळे “पापा कुठे आहे?”, असा प्रश्न आपल्या दहा महिन्याच्या मुलीला त्याने विचारला असता, ती पाण्याकडे बोट दाखवत असे. मात्र तोच प्रश्न फ्रेंचमध्ये विचारला असता, तिचं बोट आपसूक बाबाकडे जाई. दोन वेगळ्या भाषा आणि त्यातल्या एकाच शब्दाचे दोन वेगळे अर्थ ओळखण्याचं वरवर पाहता कठीण वाटणारं काम त्या बाळाला सहज जमलं होतं. याचं कारण तिच्या कानावर ती भाषा बाबाच्या, त्याच्या मित्रांच्या तोंडून सतत पडत होती.

     आमच्या घरात कुणीही परकीय भाषेचा जाणकार नाही. अशा वेळी आम्हाला काय करता येईल?” असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात येतो. ‘इंटरनेट’ हा अशा वेळी आपला आधार ठरू शकेल. एखाद्या भाषेच्या जाणकाराकडून त्या भाषेतली बडबडगीतं आपल्याला मुलांना ऐकवता येतील. बऱ्याचशा पाळणाघरामध्येही आजकाल परकीय भाषांचे छोटे छोटे उपक्रम सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ४ ते ८ आणि ८ ते १२ अशा दोन वयोगटांमध्ये विविध ठिकाणी मुलांसाठी भाषावर्ग चालवले जातात.

     नासोम चॉम्स्की हा एक प्रसिद्ध भाषातज्ञ म्हणतो, “भाषा म्हणजे शब्द नव्हेत. संस्कृती, प्रथा, समाज, इतिहास या सगळ्यांना एकसंध राखण्याचं साधनं म्हणजे भाषा. परकीय भाषेचं व्याकरण, उच्चार, वाक्यरचना, साहित्य, त्या त्या देशांची संस्कृती, चालीरीती, इतिहास या गोष्टी ऐकतांना कितीही मनोरंजक वाटत असल्या, तरीही त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याची आवड असावी लागते. अगदी लहान वयात मुलांना परकीय भाषेची ओळख करून देणं हे जितकं योग्य आहे. तितकंच ‘त्याची आवड भाषेकडे नाही’ हे ओळखून कुठलाही जबरदस्ती न करता, त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्यांना निवडू देणं हेही योग्य आणि आवश्यक आहे.

     ‘तुझ्या मुलाला भाषा शिकवण्याबाबतच्या तुझ्या भविष्यातील योजना काय?’ असा प्रश्न मला जेव्हा लोक विचारतात, तेव्हा मी हेच सांगते, की माझा मुलगा आता फक्त ५ वर्षांचा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याच्याशी छोटी छोटी वाक्यं स्पॅनिश, बंगाली अशा विविध भाषांत बोलत आले आहे. आणखी काही वर्ष मी त्याला  स्पॅनिश बोलायला जरूर शिकवेन: पण शास्त्रीदृष्ट्या ती भाषा शिकायची किंवा नाही, हे त्याचं त्यानेच ठरवायचं आहे. ‘शेवटी त्यातून आनंद मिळणं'  हेच जास्त महत्त्वाचं, नाही का ?

-    सृजना मुळे – कथळकर

[email protected]

(स्पॅनिश भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण लेखिकेने घेतले आहे. सध्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात परदेशी भाषा विभागात अध्यापनाचे काम करीत आहे.)