मराठी भाषकाला बोलताना वा लिहिता-वाचताना एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही, तर तो काय करेल? सोप्पं आहे, तो जाऊन वीरकरांची किंवा सोहोनींची ‘डिक्शनरी’ पाहील.


या वाक्यावरून तुमची नजर अगदी सहज फिरली, बरोबर? काहीसुद्धा खटकलं नाही ना? नाहीच खटकणार. मराठी भाषकाला अर्थ पाहायचा असेल, तर तो इंग्रजी शब्दाचाच ही धारणा आपल्या डोक्यात इतकी पक्की आहे, की त्याला मराठी शब्दही अडू शकेल किंवा त्याला मराठी शब्दाबद्दलही उत्सुकता असू शकेल हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही. तसं कुतूहल कुणी दाखवलंच, तर त्यासाठी आपल्याकडे मराठी-मराठी कोश असणं दुरापास्त. मग त्या शब्दाचा अर्थ पाहणं, योग्य लेखन पाहणं, वाक्यातला उपयोग तपासणं हे सगळं दूरच. मध्यंतरी चाऊस यांचा मराठी-इंग्रजी कोश बाजारात आला, तेव्हा त्या कोशाची बरीच जाहिरात करण्यात आली होती. तो कोश आहेही चांगला. पण त्या कोशात मराठी शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द बघताना अनेकांची पंचाईत होते - शब्द शोधायचा कसा? आम्हांला इंग्रजी वर्णमाला पाठ असते, पण मराठी वर्णमाला? मग अ, ब, क या क्रमानुसार शब्द शोधायचा की क, ख, ग, घ... यानुसार - असा एक प्रश्न. ऋकार किंवा अनुस्वार असलेला शब्द आल्यावर तर पुरती तारांबळ. कारण शास्त्रीय वर्णमाला शिकतो कोण नि कशाला?

असा सगळा आनंदीआनंद मराठी कोशांच्या बाबतीत आहे. पण ‘मराठीतून पाट्या लावा’ अशी घोषणा करून देवनागरी अक्षरांवर कृतकृत्यता मानणे, यापलीकडे जाणारी आस्था आपल्याला आपल्या भाषेबद्दल असेल; तर कोशांकडे याहून अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.

मुळात आपल्याला आपल्या भाषेतली वर्णमाला पाठ हवी. A,B,C,D कशी सगळ्यांना तोंडपाठ असते? साहजिक आहे. आपण ऊठसूट जिकडे-तिकडे A,B,C,D चा वापर करतो. तुकड्या पाडायच्या आहेत? अ, ब, क, ड, ई, फ, ग. श्रेण्या द्यायच्या आहेत? अ, ब, क. साधी क्रमवारी लावण्यासाठी अक्षरांचा वापर करायचा आहे? तिथेही आपल्याला अ, आ, इ, ई आठवत नाही. अ, ब, क हाच अक्षरक्रम आठवतो. गणिताच्या पुस्तकात नावं वापरायची आहेत, अ आणि ब. बीजगणितात पदं वापरायची आहेत? अ२ – ब२. ही उसनवारीची मानसिकता कधी संपेल तो सुदिन. वास्तविक आपली वर्णमाला आपल्या डोळ्यांसमोर पुन्हापुन्हा यावी, वापरली जावी, डोक्यात ठसावी यासाठी अशा वापराहून दुसरा उत्तम उपाय शोधून सापडणार नाही. जे स्वरमालेचं, तेच व्यंजनमालेचंही. मराठीतली वर्णमाला अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं रचलेली आहे. ती पाठ असेल, तर कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिकं आणि अनुस्वारयुक्त शब्द, उच्चारानुसार पडलेले वर्णांचे गट या सगळ्या गोष्टी सहजी आत्मसात होतील. पण एकदा अंकलिपीची साथ सुटल्यावर वर्णमाला विसरून जायची असते; असं आपण झापडबंदपणे ठरवून घेतलेलं आहे खरं.

ही मराठीतली स्वरमाला :

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, अ‍ॅ, ऐ, ओ, ऑ, औ

होय, ऋ आणि लृ हे स्वर आहेत. शिवाय ऍ आणि ऑ याही स्वरांचा समावेश आपल्या स्वरमालेत आहे.

अं आणि अ: हे स्वर नसून स्वरादी आहेत.

मग व्यंजनमाला :

क्, ख्, ग्, घ्, ङ्

च्, छ्, ज्, झ्, ञ्

ट्, ठ्, ड्, ढ्, ण्

त्, थ्, द्, ध्, न्

प्, फ्, ब्, भ्, म्

य्, र्, ल्, व्, श्

ष्, स्, ह्, ळ्

ही स्वरमाला आणि व्यंजनमाला मिळून आपली वर्णमाला तयार होते. क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरं असली, तरी प्रथा म्हणून त्यांचा वर्णमालेत म्हणून समावेश केलेला आहे.

आता या वर्णमालेच्या क्रमानुसार कोशात शब्द कसा शोधता येईल? उदाहरणार्थ, आपल्याला ‘कुरूप’ हा शब्द कोशात पाहायचा आहे. तर कोणत्या क्रमाने शोधत जावं लागेल?

आपल्याला ‘कु’पासून सुरू होणारे शब्द आधी पाहावे लागतील. मग कु-अ, कु-आ. अशा क्रमानं येत कु-भ, कु-म, कु-य हे टप्पे सोडून देत कु-र इथपर्यंत आपण पोचू. एकदा ‘कु-रू-प’पर्यंत आलात, की शब्द सापडला!

जर ‘क्रूर’ हा शब्द शोधायचा असेल, तर? बरोबर. ‘कौ’ने सुरू होणारे शब्द संपल्यानंतर ‘क्’सोबत जोडून तयार होणारी जोडाक्षरं आणि त्यांची बाराखडी सुरू होईल. (अर्थात ‘क्’सोबत ‘र’च्या आधीची अक्षरं जोडून होणार्‍या जोडाक्षरांसह सुरू होणारे काही शब्द अस्तित्वातच नसल्यामुळे ‘क्रू’ची पाळी तशी लवकर येईल!)

थोडक्यात काय, तर वर्णमाला पाठ असेल, तर मराठी शब्द कोशात शोधणं अगदी चुटकीसरशी करता येण्यासारखं आहे.

आता इंग्रजीतल्या कोशवाङ्मयाकडे एक नजर टाकून पाहा. काय वैविध्य आहे, बाप रे! शब्दार्थकोश आहेत, समानार्थी शब्दकोश आहेत, विरुद्धार्थी शब्दकोश आहेत, निरनिराळ्या शब्दांच्या व्युत्पत्ती आणि वापराची वारंवारिता दाखवणारे कोश आहेत, सचित्र शब्दकोश आहेत, लेखनकोश आहेत आता तर त्यात विलोमकोश (Reverse  Dictionary) नामक प्रकाराची भर पडली आहे. बरं, हे तर प्रकार झाले. नुसता शब्दार्थकोश घ्या, त्यात किती वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केलेली सापडते. मोजक्या मूलभूत शब्दयादीच्या साहाय्यानं दिलेला अर्थ-उच्चार-वचन-लिंग-व्याकरणिक रूपं, त्या शब्दाच्या निरनिराळ्या जाती, त्या जातींनुसार निरनिराळे अर्थ, त्या अर्थांनुसार वाक्यात करून दाखवलेला उपयोग, त्याखेरीज त्या-त्या शब्दाचा वाक्प्रचारामध्ये झालेला वापर नि बदलत्या वाक्प्रचारानुसार बदलणारे अर्थ, त्यांचे पुन्हा वाक्यात केलेले प्रयोग, त्या शब्दाची व्युत्पत्ती, साधारण जन्मकाल, त्या शब्दाचा बदलता वापर वा अर्थात कालानुसार होत गेलेला बदल, त्या-त्या शब्दावरून आठवण व्हावी असे इतर कोणते शब्द पाहावेत त्यांची नोंद, त्या शब्दाच्या चुकीच्या लेखनासाठी पुरवलेला सावधगिरीचा इशारा, क्वचित रेखाटन एक ना दोन! इंग्रजी कोशांमधलं वैविध्य, एकेका प्रकारांमधली मांडणीची श्रीमंती आणि या सगळ्या कोशांच्या अद्ययावत आवृत्त्या निघण्याचा वेग - हे सगळं पाहिल्यावर क्वचित त्यांच्या भाषाप्रेमाचा आणि भाषिक समृद्धीचा हेवा वाटतो खरा. पण खरी दाटून येते ती खंत.

हे सगळं वैभव मराठीपाशी नाही का? आहे ना. हे सगळेच्या सगळे विशेष मराठी भाषेकडे आहेत. खेरीज इंग्रजीहून निराळी अशी खास तिची अशी काही वैशिष्ट्यं आहेत. पण या वैशिष्ट्यांसह मांडणी झालेला एकही परिपूर्ण मराठी-मराठी कोश आज उपलब्ध नाही. कारण अशा कोशाची गरज आपण मराठी भाषक कधी नोंदवतच नाही. वास्तविक कोश हे भाषेच्या समृद्धीचं एक महत्त्वाचं लक्षण असतं.

कोशात एक शब्द पाहण्यासाठी माणूस डोकावतो खरा. पण तेवढ्या एका शब्दाचं लेखन पाहून कोश मिटला जात नाही, व जाऊ नयेही. सहज त्या शब्दाच्या मागेपुढे नजर फिरवावी. त्या शब्दाच्या अनुषंगाने येणारे इतर शब्द चाळावेत. असं करताना, आपण मुळात जो शब्द पाहायला कोश उघडलेला असतो, तो सोडून एखाद्या निराळ्याच शब्दाकडे लक्ष वेधलं जाईल. त्याबद्दल काहीतरी गमतीदार तपशील सापडतील. आपल्या भाषेच्या ज्ञानात भर पडेल. क्वचित आपल्या वापरातली चूक किंवा अपुरेपणा ध्यानी येईल. शब्दाचा अर्थ वा लेखन यांबद्दल मार्गदर्शन करणं हे तर कोशांचं प्रमुख काम आहेच; पण अवांतर शब्दज्ञान वाढवणं, भाषेच्या वापराबद्दलचं भान पुरवणं, सहज जाताजाता भाषकाला सज्ञान करून जाणं ही कोशांची खासियत आहे.

आता भाषेचा डिजिटल वापरही मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. फेसबुकपासून ते मराठी संस्थळांपर्यंत अनेक ठिकाणी मराठीचा भरपूर वापर होताना दिसतो. पण तिथेही अचूक लेखनाबद्दल आणि वापराबद्दल अनास्थाच दिसते. बरं, ऑनलाईन लिहिणार्‍या माणसानं कोश पाहावा तरी कुठे? इंग्रजी कोशांच्या अनेक विनामूल्य आवृत्त्या ऑनलाईन उपलब्ध असतात. एका टिचकीसरशी शब्दाची सगळी कुंडली सामोरी येते. पण मराठी भाषकाला मात्र मोल्सवर्थ या साहेबानं कधीच्या काळी करून ठेवलेला एक कोश काय तो ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यातही शब्दाचा तत्कालीन अर्थ सापडतो. पण मराठीतल्या लेखननियमांच्या आधारे केलेलं लेखनही त्यात उपलब्ध नाही, मग चुकीच्या लेखनाबद्दल सावध करणं दूर राहिलं. अरुण फडके यांच्या लेखनकोशामध्ये सामान्यरूपाप्रमाणे बदलणारे र्‍हस्व-दीर्घ उकार आणि इकार हा प्रकार पाहायला मिळतात. पण ही सोय ऑनलाईन आवृत्तीत कुठून उपलब्ध असायला? मग मराठी शुद्धिचिकित्सक उर्फ स्पेलचेकर वापरण्याची बात दूरच.

कोशांबद्दल बोलताना नन्नाचा पाढा लागला खरा. पण आंधळ्या भाषाभिमानापोटी भाषेच्या आरत्या गायच्या आणि तिचे खरे अलंकार जे कोश, त्यांच्या दारिद्र्याकडे मात्र दुर्लक्ष करायचं, असा दुटप्पीपणा करणं झालं नसतं. म्हणून हा आढावा घेतला. त्यातून कोश कसा पाहावा, त्याबद्दल कुणी सज्ञान झालं तर उत्तमच; पण कोशवाङ्मयात भर पडावी अशी आस कुणाला लागली, तर अधिक उत्तम.

- मेघना भुस्कुटे