प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी अशा सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रवृत्त करायला हवे. विद्यार्थ्यांना खूप येते, हे मोठ्यांनी मान्य करायला हवे आणि पारंपरिक  पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीही वापरायला हव्यात. तशीच ही एक पद्धत ­-

पूर्वीपासूनच शिक्षक आपली कामे करताना, विद्यार्थ्यांना काहीतरी काम देऊन गुंतवून ठेवतात. त्यामध्ये पाढे लिहा, बाराखडी लिहा, हे दोन उपक्रम कायमस्वरूपी असतात. तेच तेच लिहून; म्हणजे बाराखडी व पाढे लिहून विद्यार्थी कंटाळतात. नाईलाजाने लिहितात. त्यात त्यांना रस वाटत नाही. आनंदही मिळत नाही. शिक्षकांनी किंवा मोठ्यांनी सांगितले; म्हणून ते हा अभ्यास करतात. या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीत अनेक बदल करणे आवश्यक आहे. आताची पिढी चलाख व हुशार आहे. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी काही प्रयोग हे उपक्रम म्हणून करता येतील.

एकदा मी इयत्ता दुसरीच्या वर्गात गेले. त्यांना मी म्हटले, ‘मुलांनो, आज आपण एक खेळ खेळू या. तुम्ही कोणतेही एक अक्षर सांगा.’ मुलांनी ‘क’ हे अक्षर सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘क’ या अक्षराने सुरू होणारे, तयार होणारे अनेक शब्द आहेत. विद्यार्थी ‘हो’ म्हणाले. ‘मग ‘क’ने सुरू होणारे दोन अक्षरी शब्द तुम्हाला आठवतील तेवढे एकएकाने सांगायचे. एकदा सांगितलेला शब्द पुन्हा सांगायचा नाही. ही अट आहे.’, असे म्हटल्यावर प्रत्येक जण आठवू लागला व प्रत्येकाने आपला शब्द सांगितला. प्रत्येकाने आपला शब्द वेगळा व अर्थपूर्ण असेल, याची काळजी घेतली, तरीसुद्धा एका मुलाने ‘कळस’ हा शब्द सांगितला. इतर मुलांना विचारले, ‘हा शब्द बरोबर आहे का?’ मुले म्हणाली, ‘नाही.’ ‘का रे?’ ‘बाई, हा तीन अक्षरी शब्द आहे. आपण दोनच अक्षरी शब्द शोधत आहोत,’ असे सांगितले. नंतर एकाने ‘खत’ हा शब्द सांगितला. पुन्हा मी म्हटले, ‘शब्द बरोबर आहे का?’ मुले म्हणाली, ‘नाही.’ ‘का रे?’ तेव्हा एक मुलगी म्हणाली, ‘बाई, खत हा शब्द ‘ख’ या अक्षराने सुरू होतो. ‘क’ने नाही.’ त्या मुलाच्याही लक्षात आले. त्याने लगेच ‘कान’ हा शब्द सांगितला. अशा प्रकारे मुलांनी चुरशीने, चातुर्याने ‘क’ने सुरू होणारे दोन अक्षरी शब्द सांगितले. ते पुढीलप्रमाणे :

कण, कड, काम, कप, क्रौर्य, कंस, कुंभ, कोट, काळा, कस, कडा, कसा, केर, क्रोध, कंद, कृपा, कोर, काढ, कास, कडी, काव, केस, कार्य, कुंद, कीव, कोप, काठ, कर, कडे, काप, कैदी, कोब्रा, कूट, किती, कोन, काल, करू, कडू, कात, केळं, कीर्ती, कुंडी, केव्हा, कांदा, काळ, कवी, कर्म, काना, कोळी, केंद्र, कंप, कसे, काठी, कक्ष, कणी, कशी, काटा, कुत्रा, कर्क, कुंडा, कुठे, काया, काजू, कमी, कफ, काक, कप्पा, कल्प, कूस, कोणी, कृषी, काडी, कधी, करा, काका, कोटी, कल्ले, कंदी, काही, क्रीडा, कौल, कढी, केतू, काकी, किडा, कृष्णा, कांडी, किस, कच्चा, कोय, कटू, कीड, काकू, कोठी, कर्ण, कोंडा, किस्सा, कुंज, क्रूर, कथा, कुटी, काढ, कूंकू, कीर्द, किल्ला, कट्टा, क्रम, क्रांती, कष्ट, कन्या, काच, कोटा, कात्री, किल्ली, काजे, कब, किंवा, कोच, कंठ, कान, कुस्ती, कृती, कोल्हा, कॉफी, कट, कला, कर्ज, कल, काझी, कर्‍हा, काशी

मुलांनी सांगितलेले शब्द फळ्यावर लिहिले. ते एकूण १३१ होते. ही शब्दसंख्या पाहिल्यावर मलाही आश्‍चर्यच वाटले. मी सर्वांना शाबासकी दिली.

त्यांनतर मी अनेकांना विचारले, ‘तुम्ही ‘क’ने सुरू होणारे किती शब्द सांगू शकता?’ त्यांनी विचार करून १०, १२, १५, २०, २५, इत्यादी शब्दसंख्या सांगितली. परंतु ९०, १०० ही शब्दसंख्या कोणीही सांगू शकले नाही; १३१ तर नाहीच नाही. यावरून मुलांची बुद्धिमत्ता किती वाखाणण्याजोगी आहे हे लक्षात आले.

याप्रमाणे ‘क’ने सुरू होणारे तीन, चार, पाच अक्षरी शब्द विद्यार्थी सांगतात. तसेच, दुसरे कोणतेही अक्षर देऊन हा मजेचा खेळ विद्यार्थ्यांना आनंदाने खेळता येतो. या खेळात विद्यार्थी रममाण होतात, कार्यमग्न होतात. अनेक शब्द आठवून ते लिहू शकतात. या खेळामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते. गटपद्धतीनेही हा खेळ विद्यार्थी खेळतात. त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. फावल्या वेळेत शैक्षणिक खेळ म्हणून हा खेळ विद्यार्थी आवडीने खेळतात आणि आनंद मिळवतात, यात शंका नाही.

टीप – याकरिता अक्षरासंख्येप्रमाणे शब्द देणारे कोशही उपलब्ध आहेत.