‘भारतमाता मुक्त जाहली,

ध्वजा ङ्गडकली विजयाची!

प्रणाम त्या वीरांना,

ज्यांनी दिली आहुती प्राणांची!’


सहस्रावधी नरवीरांनी आपल्या जीवनाचा होम केला आणि मातृभूमीच्या पायातील परदास्याच्या शृंखला तोडून टाकल्या. अशा रणमर्दांपैकी एक तेजस्वी वीर म्हणजे हुतात्मा बाबू गेनू.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीला वसलेलं एक छोटं गाव म्हणजे महाळुंगे-पडवळ तिथल्या सैदवाडी वस्तीवर गेनबा आणि कोंडाबाई या दांपत्याच्या पोटी जन्माला आली चार मुलं - भीमा, कुशाभाऊ, बाबू आणि नामी. त्यातल्या बाबू यांचा जन्म 1908 सालचा.

घरी कोरडवाहू शेती. उत्पन्न अगदी जेमतेम. त्यामुळे घरी अठराविश्‍वे दारिद्य्र. त्यातच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मामा आणि चुलत्याप्रमाणे नशीब काढण्यासाठी कोंडाबाई आपल्या मुलांना घेऊन मुंबईत आल्या. त्या काळी असे ग्रामीण भागातून आलेले हजारो तरुण कुठे गिरणी कामगार, कुठे डबेवाले, तर कधी गोदीमध्ये हमाल म्हणून मोलमजुरी करून पोट भरत होते.

बाबू गेनू मुंबईत परळला राहात होते, तो काळ साधारण 1920 चा. हा काळ भारतीय समाजजीवन अस्वस्थ करणारा. जालियनवाला बाग आणि लोकमान्य टिळकांचा मृत्यू या घटनांनी देश हादरला होता. त्याच वेळी महात्मा गांधी या आश्‍वासक नेतृत्वाचा क्षितिजावर उदय झाला होता. टिळक-गांधीजींच्या स्वदेशीचा वापर आणि परकीय मालावर बहिष्कार या दोन सूत्रांनी तरुणांना भारावलं होतं. आपण परकीय सत्ता घालवू शकत नाही, पण बाजारात गेल्यावर काय खरेदी करायचं हे तर आपलं स्वातंत्र्य आहे. जर भारतीयांनी त्यांच्या वस्तू घेतल्याच नाहीत, तर त्यांना इथं राज्य करण्यात काहीच रस उरणार नाही. म्हणून स्वदेशीचा वापर हे केवळ व्रत नव्हते तर ब्रिटिशांशी लढण्याचं ते एक प्रभावी शस्त्र होतं.

बाबू गेनू जरी गरीब घरातून आलेले आणि कसाबसा उदरनिर्वाह करणारे असले तरी त्यांची राष्ट्राशी बांधिलकी पक्की होती. त्यातच त्यांना प्रल्हाद राऊत, शंकर आवटे असे मित्र भेटले. ते काँग्रेस चळवळीत सहभागी झाले. प्रल्हाद मुंबई काँग्रेसमध्ये पदाधिकारी बनले. मग बाबू गेनू कसे मागे राहतील? तेही काँग्रेसच्या स्वयंसेवक क्रमांक 8194 झाले. त्यांनी इतर तरुण घेऊन काम सुरू केेले. त्यांच्या गटाचं नाव होतं तानाजी पथक.

सायमन कमिशन भारतात आल्यावर सायमन गो बॅकच्या सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू झाले. बाबू गेनू यांनी वडाळा येथे मीठ सत्याग्रहात भाग घेतला. लाठीमार सहन केला. त्यात त्यांना तुरुंगवासही झाला. याच काळात त्यांच्या मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र ही वार्ता कळताच बाबू गेनू उद्गारले, ‘आता मी माझ्या मोठ्या आईची... भारतमातेची सेवा करण्यास मुक्त झालो.’

बाबूंच्या अंतःकरणातील समर्पणाची ज्वाला अशी धगधगत असतानाच तो दिवस उगवला. दिनांक 12 डिसेंबर 1930 या दिवशी परकीय माल अडवण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरले होते. त्यात तानाजी पथकावर ही मोठी जबाबदारी होती. मुलजीशेठ मार्केटमधून इंग्लंडच्या मँचेस्टरच्या गिरणीचे कापड घेऊन ट्रक येणार होते. सकाळी सत्याग्रहींच्या टोळ्या काळबादेवी रोडवर जमू लागल्या. मि. ङ्ग्रेजर या पोलीस अधिकार्‍याला गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस बोलावले. वातावरणात तणाव वाढला. पोलिसांची सशस्त्र ङ्गौज बघताच सत्याग्रही आणखी पेटून उठले.

विदेशी मालाने भरलेला ट्रक निघालेला बघताच सत्याग्रही त्याला आडवे आले. हातात तिरंगा आणि तोंडाने भारतमातेचा जयजयकार करत ते वीर पाय रोवून उभे होते. पोलिसांच्या लाठीमाराला ते घाबरणार नव्हते. पोलिसांनी रुद्रावतार धारण केल्यावर बाबू गेनू चित्त्यासारखे झेपावले आणि  ट्रकसमोर आडवे झोपले. आता नाइलाजाने ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवला. ते पाहताच पिसाळलेल्या ब्रिटिश सार्जंटने ट्रक पुढे नेण्याचा हुकूम सोडला. पण किती झालं तरी तो ड्रायव्हर भारतीय होता. त्याने नकार देताच गोर्‍या सार्जंटने त्याला खाली खेचले. तो स्वत: ड्रायव्हर  सीटवर बसला आणि भरधाव वेगाने ट्रक पुढे जाऊ लागला.

 

आता ट्रक आणि बाबू गेनू यांच्यामधलं अंतर इंचाइंचानं कमी होत होतं. ट्रकच्या भीतीने बाबू गेनू घाबरून पळून जातील अशी गोर्‍या साहेबाला खात्री होती. सारा समुदाय डोळे विस्ङ्गारून पाहात होता आणि.. आणि.. तुङ्गान वेगाने येणारा ट्रक बाबू गेनूंच्या अंगावरून गेला. देह चिरडला गेला. रक्ताच्या  चिळकांड्या उडाल्या. काय हे भयंकर! सारेच स्तब्ध झाले. भयाण सन्नाटा पसरला.

बाबू यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. पण व्यर्थ! सायंकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि राक्षसी वृत्तीच्या इंग्रजांबद्दल संतापाची लाट पसरली.

सार्‍या मुंबईत उत्स्ङ्गूर्त हरताळ पाळण्यात आला. बाबू गेनू यांची भव्य अंतयात्रा निघाली. त्यात कन्हैय्यालाल मुंशी, लीलावती मुंशी, वीर नरीमन, युसुङ्ग मेहेरअली, शेठ जमनादास असे नेते आणि हजारो कामगार साश्रू नयनांनी सहभागी झाले.

बाबू गेनू मरण पावले. स्वदेशीच्या मूल्यासाठी या 22 वर्षांच्या युवकाने हौतात्म्य पत्करले. आपल्या पराक्रमाने स्वतःचे आणि गावाचे नाव अजरामर करणार्‍या या बहाद्दरास शतशः प्रणाम!

‘जे राष्ट्रासाठी मेले

      ते अमर हुतात्मे झाले..!’

-मोहन शेटे

9850425851