मुलांनो, आपण या लेखात आरोग्यदिन साजरा करणार आहोत. कसा माहीत आहे का? आपल्या आरोग्याची आपणच  काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊन! आई-बाबा तर काळजी घेतातच; पण आपणसुद्धा स्वतःची काळजी घ्यायला शिकू या.

पोषण देणारा आहार, नियमित खेळ आणि चांगली मानसिकता या गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तर आधी पाहू की, चांगल्या आहारात आपण काय बरे घेऊ शकतो? छान आरोग्य जपण्यासाठी रोज प्रथिनेयुक्त आहार, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आता प्रथिने कशातून मिळतील बरे? वरण-भात, उसळ-पोळी, अंडे अशा पदार्थांत पुष्कळ प्रथिने मिळतात. म्हणून रोज एक तरी उसळ खाणे, रोज वरण-भात-तूप-लिंबू खाणे अतिशय चांगले आहे. डब्यामध्ये पोळी-भाजीबरोबर रोज एखादी उसळ नेली, तर जास्त प्रथिने मिळतील. दूध, दुधाचे पदार्थ यांमधून प्रथिने, कॅल्शिअम मिळतात.

आता अजून एक गरजेची गोष्ट म्हणजे जीवनसत्त्वे आणि खनिजे. ही शरीराला जरी अल्प प्रमाणात लागत असली, तरी अत्यंत गरजेची आहेत आणि हे सर्व आपल्याला फळे खाऊन नक्की मिळवता येईल. सर्व फळे खायची. त्या त्या मोसमात जी फळे येतात ती सर्व खायची. पोळी, भाकरी, भात, वरण, आमटी, उसळ, पालेभाजी, फळभाजी, फळे हे सर्व वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपात जर रोज पोटात गेले, तर आपण तंदुरुस्त राहतो.

हे सगळे आजारी न पडण्यासाठी तर खायचेच, पण आपला अभ्यास नीट होण्यासाठीदेखील या आहाराची नितांत गरज असते. ती कशी काय? असा प्रश्न पडला ना! बघा, कधी कधी अभ्यास नको वाटतो, अभ्यासच काय काहीच नको वाटते किंवा कुठेच लक्ष केंद्रित होत नाही किंवा गोंधळ होतो स्वतःचा; असे जाणवते ना कधी कधी. हा! तर आपल्या शरीरात जीवनसत्त्वे, प्रथिने, कॅल्शिअम यांची कमतरता असल्याचे हे लक्षण असते. आपण किंवा आपले पालक, शिक्षकदेखील बुचकळ्यात पडतात की,का हा अभ्यास करत नाही? पण ते कारण अयोग्य आहारात दडलेले असते. आता परत जर असे जाणवले ना, तर काय कराल तुम्ही? तेव्हा असे करायचे - रोज दूध, कडधान्य उसळी, अंडी, फळे हे पदार्थ जास्तीत जास्त खायचे. सुका मेवा खायचा.

आता तुम्ही म्हणाल की,‘मग नुसतं कायम घरीच खायचं का? आम्हाला आवडतं बाहेर खायला..’  पण, बाहेर कमी खाल्लेलेच जास्त उत्तम. त्यातही बाहेरचे चायनीज पदार्थ टाळणे उत्तम. कारण त्यात ‘अजिनोमोटो’ हा घातक पदार्थ खूप जास्त प्रमाणात मिसळतात. बाहेर कधी खाल्लेच, तर गरम पदार्थ खाणे जास्त चांगले. गार सॅन्डविच, बर्गर या पदार्थांतून चटकन संसर्ग होतो. शिवाय मैदा हा शरीरासाठी वाईटच. मग आता तुम्ही म्हणाल, ‘वडा गरम असतो ना बाहेरचा!’ हो ना! वाटले ना असे! पण मुलांनो, तो ज्या तेलात तळतात ना, ते खराब असते, परत परत वापरलेले असते, ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. मग वडाच खायचा, तर तो वडा घरीसुद्धा खाता येईल. शिवाय बाहेरचे पाकीटबंद पदार्थ; म्हणजे कुरकुरे, चिप्स हेदेखील खाऊ नयेत. त्याऐवजी घरी नाचणी, बटाटा, ज्वारीचे पापड तळून खाता येतील.

आता आरोग्यात अजून एक महत्त्वाचा भाग येतो तो व्यायामाचा. रोज सायकल चालवणे, एखादा खेळ नियमित खेळणे हे खूप चांगले आरोग्य देते. त्यामुळे आपले शरीर तर तयार होतेच, परंतु चांगले व नियमित खेळ खेळण्याची सवय ही चांगले मानसिक आरोग्यदेखील देते. आपली एकाग्रता वाढते.

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी अजून एक छान गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे आपल्या आवडीचा छंद जोपासणे. मग तो कोणताही असो. एखादी कला आपल्याला अवगत असणे, यासारखा मोठा आनंद नाही. कलेमुळे आपली अभिरुची बदलते. आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. कला आत्मसात करता करता आपली चिकाटी, एकाग्रता वाढते आणि त्याअनुषंगाने आपला आनंद वाढतो. आपण मनातून आनंदी असलो की, मग कोणतेही काम हे छान होते, मग तो कठीण परीक्षेचा अभ्यास का असेना.

आपले मन निरोगी असले की, आरोग्य उत्तम राहते, नैराश्य येत नाही. जीवनात कधी निराश व्हायचे नाही. प्रयत्न करत राहायचे. दुसर्‍या व्यक्तिशी तुलना न करता आपल्याला काय चांगले करता येईल, ते करत राहायची मानसिकता बाळगली की, नैराश्य येत नाही.

पुस्तक वाचनाची आवड प्रत्येक विद्यार्थ्याने जोपासावीच. त्याने जीवनाचा मार्ग मिळतो. म्हणूनच उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी उत्तम आहार घेणे, रोज व्यायाम करणे, खेळ खेळणे, आपली मानसिकता सकारात्मक ठेवणे, चांगले छंद जोपासणे, कला आत्मसात करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

मग लगेच आजपासून काय काय करायला सुरुवात करणार, मला सांगा बरे का मुलांनो! मी वाट पाहतेय तुमच्या उत्तराची.

- श्रुती देशपांडे, (आहारतज्ज्ञ)