विद्यार्थी मित्रांनो,

नमस्कार! 

 


विज्ञानासंबंधी माहिती आपल्या सगळ्यांना हवी असते ना म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी देत आहोत. ही खास माहिती यातून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरेदेखील तुम्हाला यातून मिळू शकतील. सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तो म्हणजे ... विज्ञान म्हणजे काय?

     क्रमबद्ध आणि तर्कशुद्धरीतीने, आपल्या सभोवतालच्या विश्वाबद्दलचे ज्ञान एकत्र करून मिळणाऱ्या माहितीला पडताळून बघता येतील असे नियम आणि सिद्धांत तयार केले जातात आणि या एकत्र करण्याच्या प्रक्रियेला 'विज्ञान' असे म्हणतात

     हे विज्ञान आपण का बरं शिकतो ? मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, प्रश्न निर्माण करणे हा गुण मानवात जन्मजात असतो. जसे लहान मुलेसुद्धा अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आजूबाजूला आढळणाऱ्या गोष्टीबद्दचे असलेले अज्ञान दूर व्हावे अशी उत्सुकता प्रत्येकाला असते. या उत्सुकतेपोटीच अनेक प्रश्न तयार होतात. हे असेच का ? आणि असे का नाही ? या शंकेचे निरसन करण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करू लागतो.

     वरील गोष्टींचा किंवा शंकांचा शोध घेत असतानाच आपल्याला नवी-नवी माहिती मिळू लागते आणि नवीन तंत्रांचा विकास होऊ लागतो. नव्या माहितीच्या आधाराने आणखी आणखी नवीन प्रश्न तयार होतात आणि हे विज्ञान विकासाचे कार्य अविरतपणे चालूच राहते.

     हा विज्ञानाचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी अनेक वैज्ञानिक शाखांची विभागणी केलेली आहे. ही विभागणी आपण पुढीलप्रमाणे लिहू शकतो.

त्यात विज्ञानाचे दोन विभाग निसर्ग विज्ञान आणि समाज विज्ञान.  निसर्ग विज्ञानाचे दोन विभाग पदार्थविज्ञान आणि जीवशास्त्र; तसेच या दोन विभागांमधील पदार्थविज्ञानांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भुगर्भशास्त्र, खगोलशास्त्र हे चार विभाग आहेत. जीवशास्त्रमध्ये वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र  हे दोन विभाग प्रामुख्याने आहेत. 

सदर मालिकेत आपण वेगवेगळ्या विज्ञान शाखेतील अनुभवास येणाऱ्या अनेक शंका, प्रश्न व त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.

भौतिकशास्त्र ही  निसर्गविज्ञानातील एक पुरातन शाखा आहे. यामध्ये गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत, चुंबकशास्त्र, अनुभौतिक कनकशास्त्र, उर्जा शास्त्र, अंतराळविज्ञान, वातावरणशास्त्र अश अनेक शाखांचा समावेश होतो.

     पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा, तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. पृथ्वीला निळा ग्रह असेही संबोधले जाते. अशी ही एकमेव जागा आहे की, ज्याठिकाणी जीवसृष्टी आढळून येते. 

     पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा असून तिचे सूर्यापासून अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि.मी. एवढे आहे.

     पृथ्वीचा उपग्रह साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी तिच्याभोवती प्रदक्षिणा घालू लागला. त्यालाच आपण चंद्र म्हणतो.

     पृथ्वीला स्वत:भोवती एक प्रदक्षिणा  पूर्ण करण्यास २४ तास लागतात आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवस लागतात हे तुम्हाला माहिती असेलच.

     पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहोचण्यासाठी साधारण ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता, तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यांमुळेच तिच्यावर जीवसृष्टी निमार्ण झाली असावी.

     संशोधनाद्वारे आता असे आढळून आले आहे की, पृथ्वी ही स्वत: एक चुंबक आहे.  या  वातावरणामध्ये तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक असे जंबूकिरण (अल्ट्राव्हायोलेट किरण) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकत नाहीत.

     या पृथ्वीची माहिती खूपच उद्बोधक आणि विस्मयकारकसुद्धा आहे. या पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पती व उत्क्रांती याचा परिचय करून घ्यायला आवडेल ना तुम्हाला? मग थोड थांबा आणि वाट बघा पुढील माहितीची! 

-    सुनीती भागवत

-    [email protected]