भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) बुधवारी सतीश धवन अवकाश केंद्रातून ‘रिसोर्ससॅट २ ए’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
श्रीहरीकोटा- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) बुधवारी सतीश धवन अवकाश केंद्रातून ‘रिसोर्ससॅट २ ए’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी पीएसएलव्ही सी ३६ या प्रक्षेपकाद्वारे ‘सॅट २ ए’ उपग्रह आकाशात सोडण्यात आल्याची माहिती इस्त्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी दिली.
या उपग्रहाचे वजन १, २३५ किलो असून हा उपग्रह जमिनीतील साधनांची माहिती घेणार आहे. पृथ्वीवरील वनसंपदा, जलसंसाधने आणि खनिजे या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्त्रोतांची माहिती मिळणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर हा उपग्रह फिरत राहणार आहे. जगातील अनेक देशांना या उपग्रहाच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येणार आहे. यापूर्वी २००३ मध्ये रिसोर्ससॅट १ आणि २०११ मध्ये रिसोर्ससॅट २ हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते. आता त्यांची जागा रिसोर्ससॅट २ ए घेणार आहे. रिसोर्टसॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह आहे. अंतराळ मोहिमेतील भारताची ही सर्वात मोठी कामगिरी आहे.